दमयंती स्वयंवर - पृष्ठ ५

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

तेथील एक कलहंस तटी निजेला । जो भागला जलविहार विशेषे केला ॥

पोटिच एक पद, लांबविला दुजा तो । पक्षी तनू लपविः भूप तया पहतो ॥४२॥

वसंततिलका

टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी । केली विजार वरि डौरहि मौन सेवी ॥

हस्ती करी वलय उंच अशा उपायी । भूपे हळूच धरिला कलहंस पायी ॥४३॥

मालिनी

कलकल कलहंसे फार केला सुटाया ।

फडफड निजपक्षी दाविलीही उडाया ॥

नृपतिस मणिबंधी टोचिता होय चंचू ।

धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू? ॥४४॥

तदितर खग भेणे वेगळाले पळाले ।

उपवन-जल-केली जे कराया मिळाले ॥

सजण गवसला जो याचपासी वसे तो ।

कठिण समय येता कोण कामास येतो ! ॥४५॥

दण्डी

न सोडी हा नळ भूमिपाळ माते । असे जाणोनी हंस वदे याते ॥

'हंसहिंसका धन्य तुझ्या हाते । स्वस्थळाते पावेन पक्षपाते ॥४६॥

पदोपदी आहेत वीर कोटी । भले जुंझार शक्ति जया मोठी ॥

तया माराया धैर्य धरी पोटी । पाखिरू हे मारणे बुद्धि खोटी ॥४७॥

वधुनि माझी ही कनकरूप काया । कटकमुकुटादी भूषणे कराया ॥

कशी आशा तुज उद्भवली राया । थोर और्दार्य थोर दयामाया ॥४८॥

शा०वि०

म्हातारी उडता न येच तिजला माता मदीया तसी ।

कांता काय वदो नवप्रसव ते सातां दिसांची असी ॥

त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे ।

हातामाजि नृपाचिया गवसलो आता करावे कसे! ॥४९॥

पद

हरहर सापडलो, सापडलो । कैसा फांसा पडलो ॥धृ०॥

इतर नदी जल-टाकी । टाकुनि आलो याच तटाकी ॥

सोडुनि मानसकेली । कापुनि घ्याया आलो शेली ॥

ठेविन तव पदि माथा । आता सोडवि गा रघुनाथा ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP