दमयंती स्वयंवर - पृष्ठ १४

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

"गांठ्याळ जो ह्रदय सांद्र न होय ज्याचे । नामेचि देवनळ. कार्य नसे तयाचे ॥

धत्तूरही कनक नाम सदा धरीतो । होईल काय रसिके कनकापरी तो?" ॥१३१॥

ते बोलति युवति- "लाज मनी दडाली । होती. तुवा विघरता मन ते उडाली ॥

आता वरू नळवरासि तुला नवाजू । वाजू तुझी स्तुति करोनि; कशास लाजू? ॥१३२॥

पद

नळ नवरा मी नोवरी । मज तो वरी । काय होईल ऐसे? ॥ विरह दुःसह तोवरी ।

कोण सावरी? । आता करावे कैसे? ॥ युगसम होय विभावरी । घर वोवरी । स्मरबाणविलासे ॥

मार करु तो नावरी । तरि या वरी । एक शयन-निवासे ॥धृ०॥

हे वनभूमि मनोहरी । सुमनोभरी । शुककोकिळवृदे ।

करिती कलरव बंभरी । उदरंभरी । अरविंदमरंदे ॥ चिंतित कांत निरंतरी । हरिदंतरी । निरखोनि न मंदे ॥

भीम जया कुसुमाकरी ॥ स-सुमा करी । माळ घालू आनंदे ॥१॥

भीमनृप स्तुतिवाचकी । कवियाचकी । स्तविला बहुधा जो ॥ या वसुधेवरि राजकी । वरराज की । सुरराज बुधा जो ॥

म्यां सुमनोमयमंचकी । मृदु कंचुकी । निषधेंद्र हिरा जो ॥ बैसविला सुखदायकी । त्याच नायकी । चित्त माझे विराजो ॥

तो रघुनाथसम क्षमातनयासमा । होय मी तरि तारा ॥२॥

वीरसेनसुत चंद्रमा । ज्यासि सांद्र मा । कोण त्याविण थारा ॥ तो हरि त्यास मनोरमा ।

जाहले रमा । ऐसे समज उदारा ॥ रूपभरे ह्रदयंगमा । नभसंगमा । येथे न करि विचारा " ॥३॥१२३॥

मालिनी

परिसुनि पद ऐसे जे इने गाइजेले ।

पतगकुलवतंसे अंतरी ध्याइजेले ॥

परवशह्रदया हे नैषधे राजहंसे ।

म्हणुनि समजता हे बोलिजे राजहंसे ॥१३४॥

दण्डी

"जसी रंजलीस तू निषधभूपी । तसा तोही रंजला तुझ्या रूपी ॥

दैवघतिते अन्योन्य व्हाल सोपी । तुम्ही नांदाल सत्य मी निरोपी ॥१३५॥

कोण योजावी नोवरी नळाला । ब्रह्मदेवे हा जै विचार केला ॥

तुझा नामाक्षरसंघ घेइजेला । असे भासते माझिया मनाला ॥१३६॥

मालिनी

नळरहित वरासी तूज योजूनि पाहे ।

तरि मग विधिऐसा कोणता मूढ आहे? ॥

अचतुर नर तोही जाहल्या जेविता की ।

सळमिसळ करीना सर्वथा खीर ताकी ॥१३७॥

दण्डी

कशाला हे बोलणे काय येणे । तुवा वरिला नळराज, तूहि तेणे ।

सफल माझे हे येथवरी येणे । राजकन्ये, निरोप मला देणे ॥१३८॥

चतुर सुंदर तो तरुण निषधराजा । तुवा राजी केलाच तू घरा जा ॥

धन्य वैदर्भी, दैवयोग तूझा । बोल मानी यथार्थ मनी माझा ॥१३९॥

मालिनी

करुनि मज रवाना राजसे तूजसाठी ।

नृपति निरखि माझी वाट आरामवाटी ॥

बसवुनि निजपाठी तूज नेईन तेथे ।

परि चुकुर तुझे हे लोक होतील येथे" ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP