दमयंती स्वयंवर - पृष्ठ ९

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


पद

'बाळे हे सोडि सोडि चाळे । देइज तुज वाळे । धरीन उरी माळेपरी ॥धृ०॥

लाखी हे शाल घे, निलाखी मणिही, स्नेह राखी, इयेने मन माखी आता ॥१॥

वेणिवरिल बहु लेणीहि लेशिल । देणी हे थोडी जाण एणीक्षणे ॥२॥

कोणी सांगावे तुज, कोणी बैससि काय, राणी हो पुरवि सिराणी माझी ॥३॥

ये कांते लौकरि सये कांतवदने । येकांत करू दोघे एकांतरे ॥४॥

येळील नको करू । केळीच तुझे ऊरू । केळीच उर धरू केली करू ॥५॥

इंद्रादि नुतपद इंद्रावरज मी चंद्रान्वयास धणी चंद्रानने ॥६॥

गाथा हे असो; रघुनाथादिनुत मज नाथास वरि होय माथा वरि ॥७॥८१॥

वसंततिलका

'येणेपरी भ्रमुनि मी युवतीस बोले । माझा असा भ्रम न तू परि तीस बोले ॥

राखोनि गौरव करी मज नोवरी ते । तू बोलसी तरि कसी इतरां वरीते? ॥८२॥

दण्डी

भला माझा तू 'गडी' हंसराया । विरहदुस्तरविस्तार निस्तराया ॥

चित्त नेघे मज तूज जा म्हणाया । तेचि वाहन तरि तू करि फिराया' ॥८३॥

असे बोलोनी नळे रंजवीला । अंजुळीमाजी हंस बैसवीला ॥

गमे चंपककुसुमौघहार झेला । पाठवाया युवतीस सज्ज केला ॥८४॥

'त्वरित पुनरागम असो तुझा येथे । झेप घाली सुखरूप गगनपंथे ॥

नको विसरू आम्हांसि असे तेथे । वदुनि गंहिवर धरिजेत महीनाथे ॥८५॥

'बरे येतो म्हणोनि हंस बोले । उडुनि जाता बहु शकुन तया जाले ।

पवनचंचळ मधुबिंदु मुखी आले । वामभागीहि उभय गरुड गेले ॥८६॥

उडत होते खग वायसादि जाणा । तया भासला हंस हा ससाणा ॥

नभा मानूनी निकष-पाऽषाणा । स्वर्ण लेखा ते तेज मना आणा ॥८७॥

असो तो हंस नभामाजि धांवे । तया विदर्भदेश झेऽपावे ॥

तेथे कुंडिननगरास दिठी पावे । महाप्राकार-गोपुरी विसावे ॥८८॥

शा०वि०

निजप्राकारी जे चरिस धरि कोरीव विवरी ।

चरी चक्राकारी, पद फिरवि, थारी रविपरी ॥

विलासे उल्लासे खगपति निवासे तिजवरी ।

करी काळेमाळे निरखित नृपाळेंनगरी ॥८९॥

मालिनी

खग मग नगरीचे गोपुरी झेप घाली ।

मृदुपवनगवाक्षी बैसता झोप आली ॥

तदुपरि जवशाली वेंघला चंद्रशाला ।

निरखि विततशाला राजधानी विशाला ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP