दमयंती स्वयंवर - पृष्ठ ८

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


पद

रूपवती ते भूपसुता । अपरूप तसी दुसरी वनिता ।

हूप धरूनि वरी तिजला । अनुरूप पयोधि जसी सरिता ॥धृ०॥

वीज अचंचल शीतळ जे । तजवीज कसी तुज हे नुमजे ।

नीज जसी तुझिया नयना । सुखबीज सपल्लव भावलता ॥१॥

सुंदरता तव तीजविणे । अति मंद गमे तरि काय जिणे ।

कुंदरदा तू मंदरधीरा । सुंदरिला वश हो करिता ॥२॥

नूतननीरजनुतमुखी । पुरुहूतवधूसि नखी निरखी ॥

दूत तुझा मी तीस सखी करवीन नृपा रघुनाथमता ॥३॥

वसंततिलका

धाता करीच करिता मृदु हे न होती । ईते करू तरि मनोमय मूस वोती ॥

तेथे भरोनि पहिला रस पूर्ण केली । वोतीव हे न घडिता कृति बोलिजेली ॥७२॥

शा०वि०

कुंभाकारकुचा महावरवधू संभावनागाहिनी ।

रंभादंभजयक्षमोरुसरलस्तंभा मनोमोहिनी ॥

रंभा काय इयेपुढे हतसमारंबा दिसे मेनका ।

जंभारातिनितंबिनी तरि गताहंभाव ते हीनका" ॥७३॥

वसंततिलका

ऐसी खगेंद्रवचने वदता तयाला । विश्रांतिही विरहखेदही फार जाला ॥

'आधार हा मज' म्हणोनि गणोनि डोले । झोले सवेच विरही नळराज बोले ॥७४॥

पद

"कैसी मज होय सखी दमयंती । रतिरूपजयंती । कै सीतरुचीस नखी नमयंती ॥

निजगुजतजविज गजबज तिजविण विजय-जनक-गज-गति कलयंती ॥धृ०॥

अधरी मधु मधुरा विजित-जपा जे । मज ह्रदय-जपा जे । उदरी वळी-भासुर कांति विराजे ।

अगणनभणननिपुणफणिमणिमुखि निज गुणगण गुणगुणयंती ॥१॥

परुषायत जीचे घनकुच केळी । ललित-लिकुचकेली । पुरुषायितसमयी झेलित केली ।

तरि मज हरिहर सुखकर तदितर सुरवरनिकरहि वरद लसंती ॥२॥

उटि लाउनि धरितां म्यां हनुवटिला । कुटिलालकनिटिला । कटिलघवशाली लज्जाकुटिला ।

धरिल निजहि मुख करिल विमुख तरि हरिल ह्रदय बरि अविरलदंती ॥३॥

भृंगावलि नीला सांद्र शिरोजी ॥ तुंगाग्र उरोजी । शृंगारुनि ये कधि ह्रदयसरोजी ।

अयनु निरखु किति, नयन सिणति बहु, अयन गमत दिन शयन भजंती ॥४॥

हंसा रघुनाथ कवींद्रनुता जे । हंसकचरणा जे । अम्सोत्तंसायितताटका जे ।

पळुनि जवळि करु, मिळुनि ह्रदयि धरु, कळुनि मदभिगति हळुच हसंती ॥५॥७५॥

वसंततिलका

वेल्हाळ ते न दिसता विरहांधकारी । चालून मी हळुच चांचपता पुढारी ॥

चक्रापरी दगदलो असता फिराया । हंसा, तुझा उदय होय सुखी कराया ॥७६॥

ध्यानी धरूनि तिजला मन हे निरीक्षी । दृष्टीपुढेचि दिसते मज ते मृगाक्षी ॥

आहे जणो जवळि हे गजराजगामी । ऐसाच भाव तव बोलतसे तिला मी ॥७७॥

'भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे । पाहूनि मानुनि तुझीच विशाल नेत्रे ॥

घालीन अंजन अशा मतिने तटाकी । कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी ॥७८॥

"कांते, विलोकुनि सुधाकर अष्टमीचा । म्यां मानिला निटिलदेश तुझाच साचा ॥

शाखाद्वये धरुनि कुंकुम कीरवाणी । लावावया तिलक लांबविला स्वपाणी ॥७९॥

जे डोंगरी उपजली पिवळी विशाळे । निंबे तशी तव घन-स्तन चक्रबाळे ॥

या तारका मदवलोकनसक्त तो की । हा निलीमाच फळला सजणे, विलोकी ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP