मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ८३ वा

स्कंध १० वा - अध्याय ८३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९०६॥
शुकमहामुनि कथिती रायातें । बोधिलें गोपींतें ऐशापरी ॥१॥
धर्मादि आप्तांसी कुशल पुढती । पुशितां कृष्णासी वंदिती ते ॥२॥
पांडव बोलले ध्यान-कीर्तनाची । वर्णावी महती काय कृष्णा ॥३॥
चरणकमळीं होऊनियां लीन । चरित्रगायन एकदांही ॥४॥
करितील तव तयांही सद्गति । लाभेल, भक्तांसी काय भय ॥५॥
वासुदेव म्हणे पांडव कथिती । अज्ञाननिवृत्तीस्तव वेद ॥६॥

॥९०७॥
श्रुतिवचनांचें करिती मनन । अवस्था-बंधन तयां नसे ॥१॥
चिन्मयज्ञानाची प्राप्ति तयां होई । अबाधित पाहीं वेद्ज्ञान ॥२॥
दुर्धरचि परी प्रभाव कालाचा । दाढेंतूनि त्याच्या सुटे कोण ॥३॥
सनातन धर्मबोधकही वेद । गिळिले बहुवार क्रूर काळें ॥४॥
परी त्या त्या वेळी घेऊनि अवतार । वेदांचा संभार रक्षिलासी ॥५॥
निर्विकार नित्यानंदचि तूं देवा । भक्तालांगी ठेवा तूंचि देसी ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी पांडव । करी आह्मांवर म्हणती कृपा ॥७॥

॥९०८॥
यादव-पांडवस्त्रिया त्याचि वेळीं । सकल मंडळी कथा गाती ॥१॥
रुक्मिण्यादिकांसी पुशिती, कृष्णानें । वरिलें तुह्मांते केंवी कथा ॥२॥
रुक्मिणी बोलली शिशुपालाप्रति । वरावें मी ऐसी मगधइच्छा ॥३॥
यास्तव घेऊनि सैन्य ते पातले । परी तुडविलें कृष्णें तयां ॥४॥
द्रौपदी, पुढती वरुनि कृष्णातें । मनोरथ माझे पूर्ण झाले ॥५॥
वासुदेव म्हणे अहर्निश इच्छा । रुक्मिणीसी, सेवा घडो हेचि ॥६॥

॥९०९॥
भामा म्हणे मज द्यावें अन्यासीच । ऐसा पूर्वी बेत ठरला होता ॥१॥
परी योगायोग वर्णावा तो काय । स्यमंतकास्तव प्रभुचा लाभ ॥२॥
कथूनि पुढती स्यमंतककथा । विवाहवृत्तांता कथी भामा ॥३॥
जांबवंती म्हणे कृष्णे, या कथेसी । संबंधित माझी वार्ता ऐकें ॥४॥
स्यमंतक माझ्या पित्यानें आणितां । शोधार्थ तयाच्या कृष्ण येई ॥५॥
पित्यासवें द्वंद्व जाहले तयाचें । रामचि कृष्णातें मानी पिता ॥६॥
अर्पूनि यास्तव मण्यासवें मज । जाहला कृतार्थ ऋक्षराज ॥७॥
वासुदेव म्हणे सेवा हे मजसी । कथी जांबवती ऐशा भाग्यें ॥८॥

॥९१०॥
कथी कालिंदी तपानें । जोडियेलें मी कृष्णातें ॥१॥
पार्थासवें जगन्नाथ । प्रेमें येऊनि सन्निध ॥२॥
केला अंगिकार माझा । भाग्यासी न कांही तोटा ॥३॥
मित्रविंदा म्हणे बाई । सकलां जिंकूनि या ठायीं ॥४॥
आणियेलें मज कृष्णें । चरण सदा हे लाभावे ॥५॥
सत्या म्हणे वृषभराज । जिंकूनियां पुरतां हेत ॥६॥
मज पित्यानें अर्पिली । वेळ भाग्याची हे आली ॥७॥
वासुदेव म्हणे वृत्त । कथिती ऐका तें समस्त ॥८॥

॥९११॥
भद्रा म्हणे प्रेम ओळखूनि माझें । अर्पिलें कृष्णातें तातें मज ॥१॥
कृष्णचरणांचा ध्यास लागो सदा । हेतु हाचि आतां उरला एक ॥२॥
द्रौपदीप्रमुख पांडवस्त्रियांसी । लक्ष्मणा निवेदी वृत्त ऐका ॥३॥
नारदमुखानें कृष्णाचे वर्णन । ऐकूनियां मन जडलें तेथें ॥४॥
परी मत्स्ययंत्र योजिलें पित्यानें । अवघड होतें बहुतचि तें ॥५॥
द्रौपदीवो, तव विवाही जो मत्स्य । होता त्याहुनि तो कठीण वेध ॥६॥
वासुदेव म्हणे अदृश्य मत्स्यातें । केवळ प्रतिबिंबे वेध होता ॥७॥

॥९१२॥
अद्वितीय मत्स्यवार्ता ते ऐकूनि । क्षत्रिय धांवूनि आले बहु ॥१॥
प्रत्यंचाही कोणा जोडितां न आली । कोणी ते जोडिली परी व्यर्थ ॥२॥
चेंगरले कोणी उचलिती चाप । जरासंधादिक अडले सर्व ॥३॥
शिशुपाल, कर्ण, दुर्योधनादिकां । वेध न मत्स्याचा करितां येई ॥४॥
पार्थाचाही बाण चाटूनियां गेला । परी न साधला मत्स्यवेध ॥५॥
पुढती कृष्णानें लीलेनें तो मत्स्य । वेधूनियां मज धन्य केलें ॥६॥
अभिजित्‍ मुहुर्ती वाद्यानाद झाला । देवांही वाटला परमानंद ॥७॥
वासुदेव म्हणे पुढती द्वेष्टयातें । जिंकूनियां केलें पूर्ण कार्य ॥८॥

॥९१३॥
लक्ष्मणा म्हणे वो द्रौपदी, आमुचें । भाग्य उदयातें आले ऐसें ॥१॥
पूर्वजन्मार्जित लोकोत्तर पुण्य । तेणे आह्मीं धन्य निश्च्यानें ॥२॥
षोडश सहस्त्र एक शत स्त्रिया । कथिती आपुल्य़ा वृत्तांतासी ॥३॥
भौमासुरवध करुनि आह्मांसी । वरितां, मोक्षश्री तुच्छ वाटे ॥४॥
इच्छितों एकचि आतां हे चरण । त्रैलोक्यपावन सर्वकाल ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णसंगति । सदा जे इच्छिती तेचि धन्य ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP