मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७० वा

स्कंध १० वा - अध्याय ७० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७९९॥
निवेदिती मुनि दिनक्रम आतां । कथितो कृष्णाचा यथाक्रम ॥१॥
सकल स्त्रियांच्या मंदिरी अच्युता । शयन करितां निद्रा येई ॥२॥
सुप्रभाती होई कुक्कुटांचा शब्द । मंदारवनांत मंद वायु ॥३॥
मधुपानास्तव गुंजती मधुप । कोटरी चिलबिल करिती पक्षी ॥४॥
जणुं त्या गीतांनी जागृती कृष्णासी । पाहूनि स्त्रियांसी खेद होई ॥५॥
सान्निध्य कृष्णाचे सर्वदा घडावें । यास्तव पक्ष्यातें शिव्या देती ॥६॥
वासुदेव म्हणे ब्राह्य मुहुर्तासी । उठूनि श्रीपति त्यागी शय्या ।\७॥

॥८००॥
हस्तपाद प्रक्षाळूनी करी आचमन ।
सच्चिदानंदकंदाचे करी मग ध्यान ॥१॥
सुस्नात होऊनी मग शुध्दोदकें, वस्त्र ॥
परिधान करुनियां उरकीं आन्हिक ॥२॥
काण्वशाखाविधीसम उरकूनि होम ॥
तिग्मरश्मि उदयापूर्वी जपासी बैसून ॥३॥
उपस्थान सूर्योदय होतांचि तो करी ।
देव-ऋषि-पितरांचें तर्पण आंवरी ॥४॥
वृध्द आप्त तेंवी विप्रपूजन पुढती ।
करुनियां सालंकृत धेनु बहु अर्पी ॥५॥
वासुदेव म्हणे तिळ, अजिनें, कौशेय ।
वस्त्रेही अर्पितो प्रेमें विप्रांसी केशव ॥६॥

॥८०१॥
गो, विप्र देवता, वृध्द, गुरु भूतें । वंदूनि अच्युतें अत्यादरें ॥१॥
मंगल वस्तूंसी करुनियां स्पर्श । ल्यावे अलंकार अनुलेपनें ॥२॥
घृतामाजी तेंवी पाही आदर्शात । आपुलें प्रतिबिंब शास्त्राज्ञेनें ॥३॥
धेनू, वृषभ तैं देवतादर्शन । संतुष्ट करुन सकलांप्रति ॥४॥
विप्र, मित्र, मंत्री, स्तियांसी पुढती । माला, तांबुलादि स्वयें अर्पी ॥५॥
अर्पित तयांनी स्वीकारुनि स्वयें । सज्ज तो कार्यातें पुढती होई ॥६॥
वासुदेव म्हणे सिध्द करी रथ । इतुक्यांत दारुक दक्षतेनें ॥७॥

॥८०२॥
प्रमाण करुनि तिष्ठे तो दारुक । अत्यादरें तेथ पुढिल कार्या ॥१॥
उध्दव- अक्रूरासह तदा कृष्ण । विराजे जाऊन रथामाजी ॥२॥
सलज्ज कृष्णासी पाहती तैं स्त्रिया । वियोग न तयां सहन होई ॥३॥
वियोगें आपुल्या दुःखित स्त्रियांसी । कृष्ण अवलोकी स्मितहास्यें ॥४॥
सुधर्मा सभेसी जाई एकरुपे । परिवार तेथें नित्य सिध्द ॥५॥
वासुदेव म्हणे सुधर्मा सभेची । महती कथिती मुनिराय ॥६॥

॥८०३॥
क्षुधा, तृषा, शोक, मोह, मृत्यु जरा । बाधे न त्या स्थळा येती त्यांसी ॥१॥
सभेमाजी तया बैसतांचि कृष्ण । विनोदार्थ जन पुढती येती ॥२॥
हास्यविनोदें ते रंजविती चित्त । करिताती नृत्य नट, हर्षे ॥३॥
वीणा, मृदंग तैं मुरली, सारंगी । शंख वाजविती साथिस्तव ॥४॥
ताल-सुरावरी गाती वारांगना । स्तोत्रें गाती नाना मागधादी ॥५॥
करिताती पूज्य विप्र वेदघोष । कथा पुराणोक्त निवेदिती ।\६॥
वासुदेव म्हणे नित्यक्रम ऐसा । होता भगवंताचा यथाशास्त्र ॥७॥

॥८०४॥
एकदां अपूर्व येई कोणी दूर । सुधर्मासभेत एकाएकीं ॥१॥
जरासंध कारागारीचें जे नृप । तयांचा निरोप दूर कथी ॥२॥
वीससहस्त्र तैं अष्टशत संख । कारागारी नृप कोंडियेले ॥३॥
विनविती प्रभो, राव ते तुजसी । तव दर्शनाची उत्कंठा त्यां ॥४॥
प्रार्थिती ते देवा, भक्तसंरक्षका । रक्षी भयग्रस्तां, शरण आह्मीं ॥५॥
कामनिकां लाभे दु:ख स्वाभाविक । आह्मीं एकनिष्ठ असतां दु:खी ॥६॥
वासुदेव म्हणे विनविती नृप । कृष्णा, तूं समर्थ सकल कार्या ॥७॥

॥८०५॥
दुर्जनसंहार, भक्तांचें रक्षण । हेतु हा धरुन अवतरती तूं ॥१॥
जरासंधादिक उल्लंघिती आज्ञा । म्हणसील प्राक्कर्मा उपाय न ॥२॥
परि सत्य न ते वाटातें आह्मांसी । साह्य तूं भक्तांसी होतां प्रभो ॥३॥
राज्यसुखईच्छा दु:खासी कारण । मायेचें बंधन दूर करीं ॥४॥
मदोन्मत्त दशसहस्त्र कुंजर- । शक्तीचा, नृपाळ जरासंध ॥५॥
मेष आह्मीं कृष्णा, तया सिंहाप्रति । अशक्यचि मुक्ति स्वपराक्रमें ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वभावें नृप । शरण प्रभूस विनयें येती ॥७॥

॥८०६॥
बहुवार कृष्णा, जिंकूनि त्या दुष्टा । अंती लीलेनें त्या दिधला जय ॥१॥
शेफारुनि तेणें गेला तो दुर्जन । दे आतां दर्शन आह्मांप्रति ॥२॥
देवा, तव मार्गप्रतीक्षा करितों । आदरें जोडितो तुजसी कर ॥३॥
वासुदेव म्हणे यापरी निरोप । कथीतसे दूत नम्रभावें ॥४॥

॥८०७॥
इतुक्यांत सभेमाजी सूर्यासम । येई कांतिमान ब्रह्मसुत ॥१॥
आदरें तयासी वंदिलें कृष्णानें । पुशिलें प्रेमानें कुशल तया ॥२॥
वृत्तांत जनांचा कथूनियां नित्य । विप्रश्रेष्ठा, तोष देसी म्हणे ॥३॥
पांडवांचे वृत्त कथावें मजसी । इच्छा पुरवावी म्हणे कृष्ण ॥४॥
ऐकूनि नारद स्तवूनि कृष्णासी । अज्ञात तुजसी न म्हणे कांही ॥५॥
परी नररुपें पुशिसी म्हणोनि । आश्चर्य न मनी वाटे मज ॥६॥
वासुदेव म्हणे वृत्त पांडवांचें । कथितो कृष्णातें मुनि ऐका ॥७॥

॥८०८॥
सार्वभौमपद इच्छी धर्मराज । राजसूय मख करुनियां ॥१॥
मान्यता तयासी असावी सर्वथा । साह्य यदुनाथा होई तया ॥२॥
इंद्रादिक तदा येतील दर्शना । संतोष तयांना देई देवा ॥३॥
लीला तव प्रभो, ऐकतां वर्णितां । त्यापरी चिंतितां सकलां पुण्य ॥४॥
चांडाळही होई त्यायोगें पावन । पुनित दर्शन कां न करी ॥५॥
विख्यात त्रिलोकीं लीला तव देवा । मंदाकिनी स्वर्गा पुनित करी ॥६॥
भोगावती तारी पाताळीं जनांसी । गंगा हे भूलोकी उध्दारक ॥७॥
चरणस्पर्शे हा अधिकार येई । कृष्ण तदा पाही उध्दवासी ॥८॥
वासुदेव म्हणे उध्दवाचें मत । पुशी यदुनाथ तयाकाजी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP