मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७१ वा

स्कंध १० वा - अध्याय ७१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८०१॥
शुकमहामुनि निवेदिती राया । जाणूनि आशया श्रीहरीच्या ॥१॥
उध्दव तयासी वदला केशवा । प्राप्तचि पांडवां साह्य होणें ॥२॥
बंदिस्थ रावही सोडविणें प्राप्त । योग्य त्या कार्यास एक भीम ॥४॥
सैन्यबळ त्याचें अनिवार देवा । द्वंद्वाचि जाणावा मार्ग त्यासी ॥५॥
सान्निध्यांत तुझ्या होईल हें कार्य । सान्निध्येंचि विश्व रची माया ॥६॥
वासुदेव म्हणे ऐका उध्दवोक्ति । जेणें कृष्णभक्ति दृढ होई ॥७॥

॥८१०॥
कारागृहींचे जे नृप । तयां धीर तूंचि एक ॥१॥
कांता तयांच्या सदनीं । काय वदती घे ऐकूनि ॥२॥
बाळा, रडूं नको कृष्ण । दाखवील भाग्यदिन ॥३॥
गोपी शंखचूडवध । ऋषि गजेंद्राचा मोक्ष ॥४॥
दशकंढवधगीत । गाती ज्यापरी सर्वत्र ॥५॥
गातों आह्मीं तुझे गुण । तेंवी राजस्त्रिया दीन ॥६॥
आशा धरुनियां पोटीं । देवा, सोडवी पतीसी ॥७॥
वासुदेव म्हणे श्रध्दा । रक्षी संकटांत भक्तां ॥८॥

॥८११॥
जरासंधवधें कार्यत्रय साधे । विघ्न पांडवांचे दूर होई ॥१॥
सत्कीर्तीही तव पसरेल लोकीं । नष्ट शिशुपालादि स्वाभाविक ॥२॥
फलोन्मुख आतां जरासंधपाप । नृपांचें सुकृत जाहलेसें ।\३॥
तेंणें नष्टचर्य संपले नृपांचें । दुष्टांच्या पापाचे भरले घट ॥४॥
यास्तव मान्य हें होईल तुजसी । कथी उध्दवोक्ति वासुदेव ॥५॥

॥८१२॥
युक्तियुक्त ऐसी उध्दवाची वाणी । मान्य झाली मनीं श्रीकृष्णासी ॥१॥
वडिलांची आज्ञा घेऊनि तत्काळ । निज परिवार पुढती धाडी ॥२॥
स्त्रिया-पुत्रातेंही पाठवी पुढती । मग दारुकासी पाचारण ॥३॥
चतुरंग सेनेसवें जाई रथ । पर्रिवार समस्त मागोमाग ॥४॥
सेवकांच्या स्त्रिया वारांगनाआदि । शकट वृषभादि करिती सज्ज ॥५॥
वासुदेव म्हणे उष्ट्र तैं गर्दभ । खेचरादि मार्ग आक्रमिती ॥६॥

॥८१३॥
रथ-अश्वशब्दें कोंदलें गगन । अवाढव्य सैन्य सिंधु भासे ॥१॥
राजदूतासवें तोषला नारद । साधतां उद्दिष्ट क्रमिती मार्ग ॥२॥
गिरिव्रजपुरीं जाऊनियां दूत । कथी सर्व वृत्त नृपाळांसी ॥३॥
ऐकूनियां नृप आनंदें कृष्णाची । प्रतीक्षा करिती, हर्षभरें ॥४॥
वासुदेव म्हणी संकटविमुक्ति । कल्पनाचि अति सौख्यप्रद ॥५॥

॥८१४॥
आनर्त, सौवीर मरुदेशांतूनि । गेला चक्रपाणी कुरुक्षेत्रीं ॥१॥
ओलांडूनि नद्या, पर्वत, बहुत । दृषद्वतीतीर गांठी प्रभु ॥२॥
पुढती लंघुनि सरस्वतीप्रति । पांचालदेशासी प्राप्त होई ॥३॥
मत्स्यदेशांतूनि येई इंद्रप्रस्थीं । सामोरा तयासी धर्मराज ॥४॥
उपाध्याय-मित्रांसह येई हर्षे । सुमंगल वाद्यें भरलें नभ ॥५॥
वासुदेव म्हणी पाहूनि कृष्णासी । युधिष्ठिर पोटीं गहिंवरे ॥६॥

॥८१५॥
वारंवार धर्मे आलिंगिले कृष्न्दा । पूर तैं लोचनां प्रेमाश्रूंचा ॥१॥
ठाकले रोमांच उरलें न भान । स्थिति तेचि जाण भीमादींची ॥२॥
पुरोहिताप्रति बंदी जगजेठी । धर्म-भीमांप्रति पुढती वंदी ॥३॥
आलिंगन देई पार्थासी प्रेमानें । वंदिती प्रेमानें माद्रीसुत ॥४॥
वाद्यनाद, मंत्रघोष तेंवी नृत्य । हर्षे समारंभ ऐसा होई ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसे नगरांत । अच्युतासमेत सकल येती ॥६॥

॥८१६॥
सुगंधित जलें सिंचियेले मार्ग । उभारुनि ध्वज सतोरण ॥१॥
पूर्णकुंभयुक्त सालंकृत जन । मार्गी ह्र्ष्टमन नारी -नर ॥२॥
राजमार्ग पुष्पफलांनीं नटला । नगरीं कोंदला धूपगंध ॥३॥
मंदिरीं कलश लकाकत होते । हर्ष श्रीहरीतें पाहूनियां ॥४॥
उत्कंठा जनांसी कृष्ण दर्शनाची । घांदल नगरीं अनिवार तैं ॥५॥
वासुदेव म्हणे स्त्रियांचा संरंभ । अवर्णनीय तो वर्णवेना ॥६॥

॥८१७॥
केशपाश नीविबंधही गळाले । सकल त्यागिलें गृहकाज ॥१॥
वर्षिलीं सुमनें अत्यानंदें कोणी । कृष्णस्त्रिया कोणी म्हणती धन्य ॥२॥
केवढें सुकृत या भाग्यवतींचे । जगन्नाथ त्यांते लाभे पति ॥३॥
उध्दार यापरी निघती सर्वत्र । पूजिती धनाढय, मार्गी कृष्णा ॥४॥
मूर्तिमंत भाग्य ठाकलें पुढती । पाहूनि कृष्णासी वाटे जनां ॥५॥
वासुदेव म्हणे काय तो आनंद । स्मरणेंही कंठ रुध्द होई ॥६॥

॥८१८॥
राजद्वारी येतां कृष्णेसवें कुंती । आलिंगी कृष्णासी अत्यानंदें ॥१॥
कुंतीसवें तदा वडिल स्त्रियांसी । वंदी जगजेठी प्रेमभावें ॥२॥
कुशल सर्वांचे पुशी यथायोग्य । अष्ट नायिकांस पूजी कृष्णा ॥३॥
वास्तव्याची सर्व व्यवस्था पुढती । पांडव करिती सकलांचीही ॥४॥
कांही मास कृष्ण तेथेंचि राहिला । साह्य अर्जुनाला करी बहु ॥५॥
तोषवी तदाचि अग्नीतें अर्जुन । मयासुरप्रेम जडलें तदा ॥६॥
वासुदेव म्हणे मयसभालाभ । समय हा तोच म्हणती शुक ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP