मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५४ वा

स्कंध १० वा - अध्याय ५४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६५५॥
क्रुध्द जरासंधादिक धनुर्धारी । धांवले सत्वरी मागोमाग ॥१॥
बलरामादि ते प्रतिकार त्यांसी । शौर्यानें करिती दक्षतेनें ॥२॥
कृष्णसैन्यावरी शरवृष्टि होतां । भयाकुल चित्ता भीमकन्या ॥३॥
लज्जित होऊनि पाही कृष्णमुख । हांसूनि अच्युत वदे तिज ॥४॥
कमललोचने, भिऊं नको ऐसी । क्षणीं अवलोकीं शत्रुनाश ॥५॥
वासुदेव म्हणे यादववीरांनी । इतुक्यांत रणीं शौर्य केलें ॥६॥
॥६५६॥
केलें विरथ कित्येकां । बहु छेदिलें मस्तकां ॥१॥
छिन्न भिन्न होती किती । नाहीं तयांसी गणती ॥२॥
पाहूनियां ते दुर्दशा । भय वाटे मगधाधिपा ॥३॥
अंती केलें पलायन । शिशुपाल होई खिन्न ॥४॥
आशांकुर भस्मसात । होई, वीर होती भ्याड ॥५॥
वासुदेव म्हणे अंती । कथिती वेदान्त तयासी ॥६॥
॥६५७॥
शिशुपाला, खेद करुं नको मनीं । प्रतिकूल मानीं ईश्वरेच्छा ॥१॥
प्रयत्नेंही सौख्य लाभेचि न ऐसें । उलटही येतें फल यत्नां ॥२॥
जरासंध म्हणे मजकडे पाही । प्रयत्नांसी नाहीं तोड माझ्या ॥३॥
कालप्रेरणेनें जनी घडे सर्व । मानूं नयें सुख-दु:ख कदा ॥४॥
निमित्तचि आम्ही अनुकूल काल । येई तैं सफल होती यत्न ॥५॥
अंती शिशुपाल सदनासी जाई । सकल राजेही त्याचिपरी ॥६॥
वासुदेव म्हणे खवळ्दला रुक्मि । कवच लेऊनि रणी आला ॥७॥
॥६५८॥
सकलां समक्ष प्रतिज्ञा तयाची । वधीन कृष्णासी रणी ऐसी ॥१॥
घेऊनि येईन रुक्मिणीसी गृही । कुंडिननगरी त्यजीन किंवा ॥२॥
अक्षौहिणी एक घेऊनियां सेना । गांठूनियां कृष्णा हांक मारी ॥३॥
म्हणे दुष्टा, राहे उभा रणांगणीं । घेऊनि रुक्मिणी जासी कोठें ॥४॥
मंदा, काक जेंवी नेई होमद्र्व्य । तैसेंचि हें तव कृत्य वाटे ।\५॥
रुक्मिणी वा प्राण त्यजूनि जा आतां । पाही हा रुक्मीचा पराक्रम ॥६॥
वासुदेव म्हणे एकाकीच रुक्मि । पुढती धांवूनि आला होता ॥७॥
॥६५९॥
ताडितांचि तीन बाण । हांसूनियां तदा कृष्ण ॥१॥
चाप, अश्व. ध्वज, सूत, । पाडी एकाचि क्षणांत ॥२॥
अन्य चापामागें चापें । घेतां छेदिलीं अच्युतें ॥३॥
अंती परीघ, पट्टिश । शूल, गदा, तरवार ॥४॥
फेंकितांचि गदाधरें । चूर्ण लीलेनेंचि केलें ॥५॥
पुढती घेऊनियां खडग । होई वधासी उद्युक्त ॥६॥
बंधूवध निश्चयानें । जाणूनियां रुक्मिणीनें ॥७॥
धरिले श्रीहरीचे पाय । म्हणे देवा, हो सदय ॥८॥
देई यासी जीवदान । बंधु माझा हें जाणून ॥९॥
वासुदेव म्हणे तदा । कंप रुक्मिणीच्या अंगा ॥१०॥
॥६६०॥
पाहुनि अवस्था रुक्मिणीची तैसी । धरुनि रुक्मीसी बांधी वस्त्रें ॥१॥
काढूनियां पाट विरुप त्या करी । येई अंगावरी तोंचि सैन्य ॥२॥
क्षणांतचि परी यादववीरांनी । विक्रम करुनि संहारिलें ॥३॥
कृष्णाचें तें कृत्य पाहुनियां राम । रुक्मीसी सोडून वदला कृष्ण ॥४॥
संबंधी जनांसी यापरी बंधन । कदाही हें कर्म योग्य नव्हें ॥५॥
वधासमचि हें सज्जन मानिती । रुक्मिणी न चित्ती खेद पावो ॥६॥
वासुदेव म्हणे बळिराम कथी । कर्मासम गति पावे नर ॥७॥

॥६६१॥
कृष्णा, ऐशा आप्तां त्यागणें हें योग्य । वधणें हा मार्ग सुजनां निंद्य ॥१॥
स्वकर्मेचि मृत्यु पावतसे तया । लाभ वधूनियां नसे कांहीं ॥२॥
अपकीर्ति मात्र होतसे या कर्मे । रुक्मिणीवो, म्हणीं न हा दोष ॥३॥
प्रत्यक्ष बंधूही ठाकतां समरी । वघ्याचि हें धरी वीर मनी ॥४॥
ब्रह्मदेवोक्तचि धर्म हा आमुचा । कृष्णा, हे उन्मता मात्र योग्य ॥५॥
अयोग्य आपणालागी ऐसें कर्म । रुक्मिणी त्वत्कर्म अयोग्यचि ॥६॥
भूतांचे अहितकर्त्या बांधवाची । करुणा सर्वांसी अहितकारी ॥७॥
वासुदेव म्हणे बलराम ऐसें । बोले उभयांते समयोचित ॥८॥

॥६६२॥
देहासीच आत्मा मानूनियां जन । मित्र, उदासीन, म्हणती भिन्न ॥१॥
परी भिन्न भिन्न देहांमाजी आत्मा । एकचि, हे अज्ञा न कळे मोहें ॥२॥
बिबं -प्रतिबिंब असूनिया एक । भिन्नत्वें त्यां मूढ पाही जेवी ॥३॥
अहंभावचि हा अज्ञानसंभूत । संसारांत रत करी जीवा ॥४॥
तेणे आत्मरुपप्रत्यय न येई । देहसंबध्दही न कदा आत्मा ॥५॥
संयोग-वियोग न घडेचि त्याचा । देहासवें कदा ध्यानी असो ॥६॥
सकळ नेत्रांसी सूर्यचि कारण । परी नेत्रांहून स्वतंत्र तो ॥७॥
वासुदेव म्हणे आत्माही तैसाच । सर्वदा अलिप्त असूनि देहीं ॥८॥

॥६६३॥
नित्य अविनाशी अक्षय्यचि आत्मा । जन्मादि ते जाणा देहधर्म ॥१॥
अस्ति, जायते हे धर्म या देहाचे । आज्ञानें आत्म्याचे, म्हणती मूढ ॥२॥
शुक्ल-कृष्णपक्षी चंद्र जैसा तैसा । आत्मा नित्य तैसा परिपूर्ण ॥३॥
स्वप्न तें स्वप्नचि लाभतां जागृति । ज्ञानें, आभासचि सकल कळे ॥४॥
यास्तव रुक्मिणी आज्ञानमूलक । त्यागूनि शोक स्वस्थ होई ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि हा बोध । झाली स्वस्थचित्त भीमकन्या ।\६॥

॥६६४॥
रुक्मीही त्यावेळी सन्निधचि होता । परि भ्रम त्याचा गेला नाही ॥१॥
आठवूनि निज प्रतिज्ञा, मुक्तही । राहिला त्या ठाई क्रोधावेशें ॥२॥
कुंडिननगरी नाहीचि तो गेला । वसवी त्या स्थळा ’ भोजकट ’ ॥३॥
वासुदेव म्हणे कुंडिनपुरासी । न जातांचि रुक्मि वसे तेथें ॥४॥

॥६६५॥
पुढती श्रीहरी रुक्मिणीसमेत । येती द्वारकेंत अत्यानंदें ॥१॥
सविधि विवाह होई तयास्थळीं । महोत्सव होई नगरीं तदा ॥२॥
नागरिक कृष्णा अर्पिती अहेर । पातले अनेक आप्त, नृप ॥३॥
गुढ्या- तोरणांनी शृंगारलें पुर । श्रीकृष्णचरित्र गाती जन ॥४॥
ऐसा अत्यानंदें समारंभ होई । वासुदेव गाई परमानंदें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP