मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७२ वा

स्कंध १० वा - अध्याय ७२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८१९॥
एकदां त्याकाळीं धर्म कृष्णाप्रति । म्हणे इच्छा माझी एक देवा ॥१॥
राजसुययज्ञें तोषवावें तुज । साह्य होई मज सत्कर्मी या ॥२॥
सेवा, ध्यान, तव प्रभावप्रचार । करिती ते थोर मुक्त होती ॥३॥
अथवा विषयावासना तयांच्या । पूर्ण यदुनाथा, करितोसी तूं ॥४॥
जगतशिक्षणार्थ सुष्ट-दुष्टभेद । यावा प्रत्ययास सर्वत्रांचा ॥५॥
कौरवसदृश दुष्टांस्तव ऐसें । घडावेंचि तूतें विनवी हेचि ॥६॥
वासुदेव म्हणे कल्पवृक्षासम । फल इच्छेसम प्रभु देई ॥७॥

॥८२०॥
ऐकूनि धर्माचे वचन श्रीकृष्ण । देई अनुमोदन तयाप्रति ॥१॥
राजसुययज्ञें कीर्तिलाभ तुज । सकलां आनंद सज्जनांतें ॥२॥
देव, पितर तै आह्मंसम आप्त । पावतील तोष सत्कर्मे या ॥३॥
सहजचि यज्ञ जाईल सिध्दीतें । सिध्द हो नृपांतें जिंकण्यासी ॥४॥
स्वाधीन सकल करुनियां भूमि । राजसुययज्ञीं प्रवर्तावें ॥५॥
अशक्य न तुज कांही धर्मराजा । इंद्रादि देवता बंधु तव ॥६॥
दुर्लभ योग्यांसी, तो मी सदा तव । कोण लोकोत्तर भक्ता जिंकी ॥७॥
वासुदेव म्हणे कृष्ण करी कृपा । तया काय धोका त्रैलोक्यांत ॥८॥

॥८२१॥
कृष्णानुमोदनें उल्हासित धर्म । हर्षिन्नलें मन बहु त्याचें ॥१॥
भीम, अर्जुनांची करुनि योजना । पाठवी जिंकण्या अवघी भूमी ॥२॥
सृंजय सहाय्यें सहदेवाप्रति । दक्षिण दिशेसी धाडी राव ॥३॥
मत्स्यांसवें गाठीं  नकुल पश्चिम । योजिला अर्जुन उत्तरेसी ॥४॥
केकय देशीचें राजे तया साह्य । भीमाप्रति साह्या मद्रकांचे ॥५॥
वासुदेव म्हणे पूर्वेसी तो जाई । दिग्विजय होई ऐशापरी ॥६॥

॥८२२॥
अपार संपदा आणिली वीरांनीं । परी धर्म मनीं चिंताकुल ॥१॥
भीमाचे सामर्थ्य ज्ञात होतें त्यासी । परी एक चिंत्ती शंका तया ॥२॥
मगधापति जरासंधवीर । जिंकिला जाईल केंवी भीमा ॥३॥
चिंताकुल धर्मा पाहूनियां कृष्ण । अभय देऊन वदें त्यासी ॥४॥
द्वंद्वयुध्दें भीम वधील दुष्टांसी । स्वयें त्या कार्यासी सिध्द जाण्या ॥५॥
ब्राह्मणवेषानें कृष्णा-र्जुन-भीम । निश्चय करुन कांही जाती ॥६॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्ण कार्यासी । जातां कां न सिध्दि मागें धांवे ॥७॥

॥८२३॥
नगरीं जाऊनि जरासंधाप्रति । याचना करिती अतिथिवेषें ।\१॥
अदेय तें कांहीं मागणार नाही । आह्मांप्रति देई वचन राजा ॥२॥
’ अतिथींचें काम पुरवीन ’ ऐसी । उदारा, त्वदुक्ति ऐकवावी ॥३॥
असूनि समर्थ शाश्वत लौकिक । मिळवी न व्यर्थ भाग्य त्याचें ॥४॥
ऋण फेडण्यासी चांडाळसदनीं । राहिला जाऊनि हरिश्चंद्र ॥५॥
याचकार्थ प्राण कुटुंबासमेत । लेखीतसे तुच्छ रंतिदेव ॥६॥
वासुदेव म्हणे शिबि, बलिआदि । थोरांचें कथिती वृत्त वीर ॥७॥

॥८२४॥
चतुर मगधपति, देहयष्टि । प्रत्यंचा चिन्हादि स्कंधी पाही ॥१॥
निश्चयें म्हणे हे कोणीतरी वीर । द्रुपदपुरीस पाहियेले ॥२॥
असोत कोणीही, परी भयाभीत । होऊनियां विप्रवेषें येती ॥३॥
यास्तव अर्पावें यांस जें मागती । तेंचि, यश लोकी संपादावें ॥४॥
विप्रकार्यास्तव बळीसम जरी । त्यागिला न तरी देह व्यर्थ ॥५॥
वासुदेव म्हणे चिंतूनियां ऐसें । कामनापूर्तीतें सिध्द होई ॥६॥

॥८२५॥
प्राणार्पणातेंही पाहूनियां सिध्द । मागे द्वंद्वयुध्द कृष्ण तया ॥१॥
अन्नार्थी न आह्मीं युध्दार्थी क्षत्रिय । जाण मी केशव तव वैरी ॥२॥
तैसेंचि हे माझे बंधु भीमा-र्जुन । ख्यातवीर जाण जगामाजी ॥३॥
हांसूनि तैं क्रोधें बोले जरासंध । मूढहो, मी युध्द करिन सौख्यें ॥४॥
परी भ्याडा, कृष्ण तुझ्याशी लढूनि । दुर्लौकिक जनी न घडो मम ॥५॥
अशक्त हा पोर अर्जुन बापुडा । समर्थ न युध्दा माझ्यासवें ॥६॥
वासुदेव म्हणे भीमासवें युध्द । करावया सिध्द होई राव ॥७॥

॥८२६॥
बोलूनियां ऐसें वृकोदराप्रति । गदा एक अर्पी जरासंध ॥१॥
अन्य एक स्वयें घेऊनि निघाला । बाहेरी पातला नगराच्या ॥२॥
सपाट प्रदेशी येऊनियां युध्द । आरंभिलें तेथ त्याचि रानीं ॥३॥
मदोन्मत्त हत्ती भांडती त्यापरी । भयंकर होई शब्द तेथें ॥४॥
विचूर्णित होती गदा उभयांच्या । मग द्वंद्वयुध्दा प्रवर्तले ॥५॥
दिन सत्तावीस होई घोर युध्द । येई न क्षीणत्व कोणासीच ॥६॥
वासुदेव म्हणे भीम तैं कृष्णातें । निराशेनें वदे काय ऐका ॥७॥

॥८२७॥
माधवा, अशक्य याचा वध मजप्रति ॥
केशवा, करावे काया कथावें पुढती ॥१॥
अभय देऊनि कृष्ण वदे वृकोदरा ॥
चिंतिता कृष्णासी तदा आठवली जरा ॥२॥
चिरुनियां शाखा तदा दाविला संकेत ॥
तत्काळ भीमानें रणीं आपटीला नृप ॥३॥
पाय एक देऊनियां चरणीं तयाच्या ॥
टरटरां फाडियेला वस्त्रासम उभा ॥४॥
शकलें तयाची होतां हाहा:कार होई ॥
कृष्ण-पार्थ भीमालागी धरिती ह्रदयीं ॥५॥
वासुदेव म्हणे पुत्रा अर्पियेले राज्य ।
कारागृहांतील राव केले बंधमुक्त ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP