मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७३ वा

स्कंध १० वा - अध्याय ७३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८२८॥
विशंति सहस्त्राधिक अष्ट शत नृपाळ दुःखित कारागृही ॥१॥
अवमान हेंचि अन्नोदक त्यांसी । अस्थिपंजरचि उरले होते ॥२॥
देह-वस्त्रावरी पुटेचि मळाची । नव्हतेचि त्यांसी लवही स्वास्थ्य ॥३॥
दुष्टांचे हनन जाहले, दर्शन येईल श्रीकृष्ण, हाचि मोद ॥४॥
’ गिरिद्रोणी ’ नामें बंदिवासांतूनि । तयां सोडवूनि भेटे कृष्ण ॥५॥
चतुर्भुज मूर्ति पाहून साजिरी । राजांची हरली क्षुधा-तृषा ॥६॥
प्राशनचि जणुं करिती तें रुप । वाटे चाटितीच जिव्हेनें कीं ॥७॥
वासुदेव म्हणे सकल इंद्रियें । पावन त्या रुपें होती त्यांची ॥८॥

॥८२९॥
प्रार्थिती कृष्णातें तदा सकलही राजे
देवा, आतां भवमुक्त करावें आह्मांतें ॥१॥
राज्य हरुनियां आह्मां टाकिलें बंदीत ॥
जरासंधाचे हे देवा, उपकार श्रेष्ठ ॥२॥
दर्शनें तुझ्या मायेचा भ्रम दूर झाला ॥
ऐश्वर्यमदहि सर्व विलयासी गेला ॥३॥
विस्मृति न होवो कदा तव चरणांची ॥
इच्छा हीच एक आतां, तुच्छ स्वर्ग तोही ॥४॥
वासुदेव म्हणे कृष्ण, प्रार्थना ऐकूनि ॥
नृपांप्रति बोध करी संतुष्ट होऊनि ॥५॥

॥८३०॥
कृष्ण म्हणे भक्ति करा निरंतर । याचितां तो वर योग्य असे ॥१॥
ऐश्वर्यमदानें नर होई धुंद । येतांचि उन्माद नष्टचर्य ॥२॥
सहस्त्रार्जुनही नहुष तो वेन । दशकंठ, भौम नष्ट झाला ॥३॥
क्षणभंगुर हें मानूनियां सर्व । करा प्रजाकार्य सध्दर्माने ॥४॥
कर्ता-करविता ईश्वर जाणूनि । अलिप्त राहूनि राज्य करा ॥५॥
वासुदेव म्हणे सायुज्वतालाभ । घडल गोविंद कथी येणें ॥६॥

॥८३१॥
अभ्यंगादि सर्व व्यवस्था पुढती । करुनि नृपांसी सौख्य देई ॥१॥
भोजनही तयां घालुनि सुग्रास । अर्पूनि तांबुल तोषविलें ।\२॥
वस्त्रलंकारही अर्पूनि तयांसी । मधुर शब्देसी गौरवी त्यां ॥३॥
मग रथांमाजी बैसवूनि त्यांसी । धाडिलें स्वदेशीं करुणाकरें ॥४॥
वर्णित हरीच्या लीला ते नृपाळ । गांठीती सकळ निजगृहें ॥५॥
बोध श्रीहरीचा धरुनियां ध्यानी । स्वधर्मे वागूनि करिती राज्य ॥६॥
वासुदेव म्हणे इंद्रप्रस्थीं वीर । जावयासी सिध्द भीमादिक ॥७॥

॥८३२॥
जरासंधपुत्र सहदेव प्रेमें । सन्मानी तयांतें अत्यादरें ॥१॥
इंद्रप्रस्थीं वीर हर्षभरें जाती । शंख फुंकिताती समीप येतां ॥२॥
ऐकूनि तो शब्द धर्माप्रति बोध । जरासंधवध निश्चयानें ॥३॥
आनंदाश्रु तदा धर्माच्या नयनी । येती शंखध्वनि ऐकूनियां ॥४॥
वासुदेव म्हणे संकटविमुक्त । होतां कां न भक्त स्मरे ईशा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP