मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७४ वा

स्कंध १० वा - अध्याय ७४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८३३॥
निवेदिती शुक परीक्षिताप्रति । वदला कृष्णासी धर्मराज ॥१॥
देवा, ब्रह्मादीही इच्छिती त्वदाज्ञा । पाळिसी वचना आमुच्या तूं ॥२॥
भेदभाव ऐसा भासे तुझ्याठाई । नसेचि तो पाही परी सत्य ॥३॥
उदयास्तादिकीं सारखाचि सूर्य । असूनिही भेद भासे जेंवी ॥४॥
भक्तही सदैव भेदभावशून्य । तुजसी कोठून स्पर्शे भेद ॥५॥
वासुदेव म्हणे धर्म ऐशापरी । वर्णितो थोरवी श्रीकृष्णाची ॥६॥

॥८३४॥
कृष्णानुमोदनें योजूनि ऋत्विज । अधिकार त्यांस अर्पी धर्म ॥१॥
व्यास, भरद्वाज, सुमंतु , गौरम । वसिष्ठ, च्यवन असित, कण्व ॥२॥
मैत्रेत्म कवष, त्रित, विश्वामित्र । सुमति, वामदेव, पैल ऋतु ॥३॥
जैमिनी, अथर्वा, पराशर, गर्ग । धौम्य तैं कश्यप परशुराम ॥४॥
आसुरि तैं वीतिहात्र मदुच्छंदा । वीरसेन तथा आकॄत्तवृत्त ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसे महामुनि । ऋत्विज होऊनि बसले तेथें ॥६॥

॥८३५॥
भीष्म, द्रोण, कौरवादि । यज्ञ पहावया येती ॥१॥
विप्र, क्षत्रियादि जन । अवलोकिती यज्ञस्थान ॥२॥
कनकनांगरानें विप्र प्रथम नांगरिती क्षेत्र ॥३॥
पुढती घेई यज्ञदीक्षा ।विधियुक्त धर्मराजा ॥४॥
यत्रपात्रें सुवर्णाचीं । जेंवी वरुणयज्ञामाजी ॥५॥
होती, तैसीचि या स्थानी । येती देवादि तैं मुनि \।६॥
वासुदेव म्हणे ऐसा । वरुणासम यज्ञ साचा ।\७॥

॥८३६॥
सोमवल्लीरससमयीं कोणासी । पूजावें सभेसी प्रश्न येई ॥१॥
अग्रपूजामान माधवासी द्यावा । ऐसें सहदेवा प्रथम वाटे ॥२॥
म्हणे सर्व विश्व नटलासे हाचि । यास्तव सर्वांसी पूजाई तो ॥३॥
अनुमोदन त्या देती हर्षे विप्र । सभासद सएर्व मानिती तें ॥४॥
तदा युधिष्ठिरें पूजिलें कृष्णासी । स्वर्गातूनि वृष्टि सुमनांची ॥५॥
वासुदेव म्हणे उचलूनि हस्त । दमघोषपुत्र तदा बोले ॥६॥

॥८३७॥
शिशुपाल म्हणे वर्णिती जें वेद । कालाचें महत्व सत्यचि तें ॥१॥
कालाधीन होती ज्ञातेही ते मूढ । अग्रपूजापात्र कोण पहा ॥२॥
अल्लड हा पोर सहदेव । एथें थोर थोर ज्ञते मुनि ॥३॥
अग्रपूजामान गौळ्याच्या पोरासी । क्षत्रियकुळासी लांछन हें ॥४॥
मतिहीन, स्वैर, कुल-शीलहीन । आचरी अधर्म अपात्र हा ॥५॥
वासुदेव म्हणे ययातीचा शाप । पळपुटया दुष्ट म्हणे कृष्ण ॥६॥

॥८३८॥
वेदाध्ययनाचा गंधही न जेथें । सागरीं लोकांतें लुटुनि जाती ।\१॥
लपूनियां तेथें छळिती लोकांसी । चोर्‍याही करिती ध्यानी घ्यावें ।\२॥
राया, ऐशापरी निंदा होतां हरि । दुर्लक्षचि करी स्वसामर्थ्य ॥३॥
सज्जन तैं कानी घालुनियां बोटें । मरण दुष्टातें म्हणती येवो ।\४॥
पुण्यक्षयभयें त्यागिती ते स्थान । क्रोधाकुल जाण पांडवांदि ॥५॥
मत्स्य, केकय तै सृंजयही खडग -। घेऊनियां सिध्द दुष्टवधा ॥६॥
वासुदेव म्हणे तदा शिशुपाल ।  सिध्द प्रतिकार करावया ॥७॥

॥८३९॥
इतुक्यांत कृष्ण चिंती निज मनीं । पार्षद हा जनीं अजिंक्यचि ॥१॥
पराजय याचा अन्यासी न शक्य । वधील सर्वास उपेक्षितां ॥२॥
करुनियां ऐसा विचार, चक्रानें । क्षणीं छेदियेलें शिर त्याचें ॥३॥
पलायन तदा करिति तत्पक्षीय । प्रवेशलें तेज कृष्णमुखी ॥४॥
प्रत्यक्ष तें दृश्य पाहती समस्त । गेला वैकुंठास भाग्यशाली ॥५॥
वासुदेव म्हणे हिरण्यकशिपु । अन्य रामरिपु, तृतीय हा ॥६॥

॥८४०॥
पुढती धर्मानें करुनियां दानें । सज्जनांचीं मनें तोषविली ॥१॥
अवभृथस्नान करुनि तोषला । समाप्त जाहला राजसुय ॥२॥
कांही दिवसांनी द्वारकेसी कृष्ण । निरोप घेऊन जाई सौख्यें ॥३॥
प्रशंसीत यज्ञा, तेंवी श्रीकृष्णातें । जाती स्वस्थळातें देवादिक ॥४५॥
दुर्योधन कुलांगारचि जो कलि । कष्टला अंतरी राजसूयें ॥५॥
नृपाळांची मुक्ति, शिशुपालवध । राजसूयमख वर्णील जो ॥६॥
ऐकेल जो किंवा पापमुक्ति त्याची । वासुदेव वंदी श्रीकृष्णातें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP