मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५२ वा

स्कंध १० वा - अध्याय ५२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६२६
निवेदिती शुक कृष्णाप्रति सव्य । घालुनियां राव वंदी प्रेमें ॥१॥
पुढती बाहेरी पातला गुहेच्या । अवलोकी तदा सकल क्षीण ॥२॥
पशु, पक्षी, वृक्ष, लताही निर्बल । पाहूनियां काल कलिचा जाणे ॥३॥
मग उत्तरेसी जाऊनि तपासी । गांठिला हिमाद्रि अत्यानंदे ॥४॥
गंधमादनीं तो त्यागूनि विषय । चिंतूनि केशव करी भक्ति ॥५॥
वासुदेव म्हणे कृपेवीण ऐसी । आवडी भक्तीची नुपजे कोणा ॥६॥
॥६२७॥
इकडे यवना जिंकूनि श्रीहरि । लुटूनि सत्वरी धन त्याचें ॥१॥
लादुनियां गोण्या द्वारकेची वाट । धरी मार्गी तोंच जरासंध ॥२॥
घेऊनियां येई प्रचंड सैन्यासी । पाहूनि तयासी राम-कृष्ण ॥३॥
त्यागूनियां धन सामान्यांसमान । पाय़ींच पळून जाती दूर ॥४॥
पाहूनि तें हर्ष पावे जरासंध । करी पाठलाग सैन्यासवें ॥५॥
वासुदेव म्हणे जरासंध मूढ । लेखी हा गोविंद सामान्यचि ॥६॥
॥६२८॥
श्रांत राम-कृष्ण अंत प्रवर्षण - । पार्वती, लपून बसले दोघे ॥१॥
नित्य त्या पर्वती पर्जन्यवर्षाव । शोधी तयां राव परी व्यर्थ ॥२॥
अंती पर्वतासी लावूनियां अग्नि । बैसला देऊनि गिरिसी वेढा ॥३॥
ठोकूनि उडडाण परी राम-कृष्ण । सैन्याही लंघून क्रमिती मार्ग ॥४॥
गांठूनि द्वारका राहिले आनंदे । मानिलें दैत्यानें दग्ध दोघां ॥५॥
वासुदेव म्हणे मगधाधिराज । आनंदें गृहास निघूनि गेला ॥६॥
॥६२९॥
रायाप्रति मुनि कथिती ’ रैवत ’ । आनर्ताधिराज रेवतीसी ॥१॥
बलिरामाप्रति अर्पी, हें कथिलें । पूर्वीचि आठवे काय पहा ॥२॥
आतां श्रीहरीचा विवाह ऐकावा । आनंद लुटावा भक्तिप्रेमें ॥३॥
विदर्भदेशाचा नृपाळ विख्यात । नाम ज्या ’ भीष्मक ’ जनां प्रिय ॥४॥
रुक्मि, रुक्मरथ, रुक्मबाहु तेंवी । रुक्मकेश पाहीं रुक्मशाली ॥५॥
ऐसे पंच पुत्र, कन्या त्या रुक्मिणी । सदगुणांची खाणी रुपवती ॥६॥
वासुदेव म्हणे अंश ती लक्ष्मीचा । योग्यचि विवाहा होत असे ॥७॥
॥६३०॥
उपवर वधु वरही शोधिती । योग्य आपणासी पति-पत्नी ॥१॥
योग्य वधुवरां वर्णिताती आप्त । येई योगायोग तेंचि घडे ॥२॥
येतील जे कोणी नृपाच्या भेटीसी । अनुरुप पति वर्णिती ते ॥३॥
उत्सुक रुक्मिणी ऐके तो वृत्तांत । वर्णिती कृष्णास द्वारावासी ॥४॥
सौंदर्य, विक्रम, गांभीर्य, औदार्य । ऐकूनि वैभव श्रीकृष्णाचें ॥५॥
आकृष्ट रुक्मिणी होऊनियां तोचि । पति लाभो ऐसी धरी इच्छा ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णातेंही कोणी । म्हणती रुक्मिणी तुजसी योग्य ॥७॥
॥६३१॥
अलौकिक बुध्दि मनोहर रुप । तेंवी सुजनत्व आदि गुण ॥१॥
ऐकूनि श्रीहरि इच्छी निजांतरी । पट्टराणी व्हावी रुक्मिणीच ॥२॥
रुक्मीविण सर्व बांधवांची इच्छा । शालक द्वारकाधीश व्हावा ॥३॥
परि रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधु रुक्मि । वैर करी मनीं श्रीकृष्णाचें ॥४॥
शिशुपालाप्रति अर्पावी रुक्मिणी । ऐसा हेतु मनी धरिला तेणें ॥५॥
वासुदेव म्हणे बंधुचें तें कृत्य । नाहीं रुक्मिणीस रुचलें मनीं ॥६॥
॥६३२॥
पाचारुनि एका विप्रा पत्रिका देऊनि ।
गुप्तपणीं द्वारकेसी पाठवी रुक्मिणी ॥१॥
द्वारपाळ पाहूनिया तया ब्राह्मणासी ।
भेट करुनियां देती द्वारकाधीशाची ॥२॥
पाहूनि विप्रासी कृष्ण त्यागूनि आसन ।
सुवर्ण आसनीं विप्रालागीं बैसवून ॥३॥
षोडशोपचारें पूजा करुनि तयाची ।
श्रम निवारुनि अर्पी प्रेमें भोजनादि ॥४॥
वासुदेव म्हणे मग चुरुनि चरण ।
आदरें कुशल मग पुशी तया कृष्ण ॥५॥
॥६३३॥
कृष्णभगवान म्हणे द्विजश्रेष्ठा । चालतों कीं तुझा योगक्षेम ॥१॥
पुरातनधर्म होती कीं सुलभ । यदृच्छेनें तोष पावसी कीं ॥२॥
ऐशा संतुष्टांचे आचाएर निर्विघ्न । होती तरी जन सुखी होती ॥३॥
विप्रांचा महिमा, संतोषें अगाध । इंद्रातेंही वंद्य संतोष ते ॥४॥
असंतोषें देवां सर्वदा भ्रमण । असूनि निर्धन विप्र सुखी ॥५॥
वासुदेव म्हणे सर्वदा सर्वत्र । संतुष्ट जो विप्र ईश्वर तो ॥६॥
॥६३४॥
यद्दच्छासंतोष, प्राणिमात्रीं प्रेम । देहाचा अभिमान नसे तयां ॥१॥
संयमादि गुणें पूज्य ते मजसी । तेणीं मी तयांची करितों पूजा ॥२॥
शीलवंता, राव देतसे कीं सुख । प्रजाहितदक्ष राव असो ॥३॥
विप्रश्रेष्ठा, हेतु कायरें भेटीचा । निवेदी तें चित्ता रुचे तरी ॥४॥
विदित करावी आज्ञा मजप्रति । विप्र तदा कथी सकळ वृत्त ॥५॥
वासुदेव म्हणी अर्पितां पत्रिका । कृष्ण त्याचि विप्रा वाचीं म्हणे ॥६॥
॥६३५॥
भुवनसुंदरा अच्युता, सामर्थ्य । रुप अद्वितीय, सद्‍गुणही ॥१॥
ऐकूनियां तव, जाहलें आकृष्ट । ईश्वरा, मच्चुत्त तुझ्याठायीं ॥२॥
लोकलाज आतां राहिली न मज । नसें अमर्याद निर्लज्जही ॥३॥
गुणानेंचि तुझ्या पावलें ही स्थिति । दोष न मजसी तेणें कांहीं ॥४॥
अन्यत्र जे रुप, गुण असतील । तुच्छ ते सकल तुझ्यापुढें ॥५॥
दर्शन वा तव गुणांचे श्रवण । घडेल ज्यां धन्य तेचि जनीं ॥६॥
श्रवणें त्वद्‍गुण प्रवेशूनि चित्ती । त्रिविध तापांसी हरिती क्षणीं ॥७॥
वासुदेव म्हणें रुक्मिणी आनंदें । साक्षात्‍ दर्शनाचें भाग्य वर्णी ॥८॥
॥६३६॥
अवलोकितां तुझे रुप । सकल सौंदर्य प्रत्यक्ष ॥१॥
त्रैलोक्याचें पुढती ठाके । तेणें सार्थक नेत्रांचें ॥२॥
ऐसें ऐकिलें मी देवा । तेणीं उत्कंठा हे जीवा ॥३॥
आतुरता हे पाहून । कांही न मानावें न्यून ॥४॥
कुलशीलवती कोणी । अन्यही जे विवेकिनी ॥५॥
ऐसीचे ते उतावीळ । तव गुणांनीं होईल ॥६॥
कुल, शील, रुप, ज्ञान । अविच्छिन्न तें तारुण्य ॥७॥
अमर्याद धन, कांति । निरुपम तव लोकीं ॥८॥
वासुदेव म्हणे तेणें । अवस्था हे वधु म्हणे ॥९॥
॥६३७॥
कमललोचना मनें वरिलें तुजसी ।
देह हा तुझाचि आतां चिंता न मनासी ॥१॥
पाणिग्रहण यास्तव करावें येऊनि ।
नीचस्पर्श नच व्हावा इच्छा हेचि मनीं ॥२॥
वापी, कूपादिक धर्म तेंवी अनुष्ठानें ॥
पूर्वजन्में सुवर्णादि बहुविध दानें ॥३॥
तीर्थ चांद्रायणादि वा नियम पाळिले ।
असतील, किंवा देव ब्राह्मणां पूजिलें ॥४॥
असेल, तरी त्या पुण्यें भगवंतलाभ ॥
घडो, शिशुपालाचा न येवोचि संबंध ॥५॥
वासुदेव म्हणे जरी विवाहनिश्चय ।
जाहला , परी न झाला म्हणे ती विवाह ॥६॥
॥६३८॥
पूर्वदिनीं देवा, येई गुप्तरुपें । विदर्भदेशातें सैन्यासवें ॥१॥
शिशुपाल - जरासंधादि जिंकून । विक्रमें हरुन नेई मज ॥२॥
बंधुवधावीण कैसें हे साधावें । ऐसें न म्हणावें दयावंता ॥३॥
नगराबाहेरी अंबिकादर्शन । पूर्वदिनी जाण कुलरीति ॥४॥
समयीं त्या माझे करावें हरण । अंबेचें दर्शन घडतां मम ॥५॥
ब्रह्मा शंकरादि लाभावया ज्ञाण । चरणधूलिस्नान इच्छिताती ॥६॥
प्रभो, ऐसा तव प्रताप या जनीं । सय होऊनि तारी मज ॥७॥
ऐसें न घडता आचरुनि व्रतें । झिजवूनि देहातें त्यजीन प्राण ॥८॥
जोंवरी स्वीकार करिसी न मम । असंख्यात जन्म करिन हेंचि ॥९॥
विप्र म्हणे कृष्णा, जाणूनि हें मर्म । योग्य ते वर्तन करी आतां ॥१०॥
वासुदेव म्हणे विप्र निजकार्य । करुनिया आर्य स्वस्थ होई ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP