मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय एकोणिसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
कैसा झाला शास्त्रार्थ । मंडनमिश्र झाले पराभूत । पत्नी उभी करण्या वाद । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
शंकराचर्य बसुनि एकांती । केंद्रित करिती आपुली मती । लाविण्यास तत्वांची सुसंगति । उपनिषदांचे पाठ करिती ॥३॥
विसरले कांही काळापुरते । ध्येय जे साधायचे होते । नसते विघ्न अडवी मार्गाते । त्याचे निवारण आधी करणे ॥४॥
कैसी झाली सृष्टीरचना । प्रश्नोपनिषदातील वर्णना । वाचता येई स्पष्ट ध्याना । प्राण रयीचे मैथुन ॥५॥
बृहदारण्यकोपनिषदांतील । सुस्पष्ट करिती संदर्भ । ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम । कैसे घडते साहचर्य ॥६॥
हळूंहळूं उकले कोडे । उमाभारतीने कां घेतले साकडे । प्रश्न नव्हते तिचे वाकडे । उत्तरी, वेदान्ताचे मर्म ॥७॥
इथून पुढे घालता वाद । शारदेचेच धरावे पाद । नकळत उठतील अनंत नाद । मार्ग पुढील दाविण्या ॥८॥
ही नव्हे उभयभारती । साक्षात् प्रकटेल सरस्वती । कुंठित होईल माझी मति । तिच्याशी वाद घालता ॥९॥
लोकव्यवहार जपण्यास । लज्जित करावे शारदेस । हेहि संकट टाळण्यास । उपाय उरला एकमात्र ॥१०॥
ग्रंथ लिहून काढावा । उभयभारतीस अर्पावा । जाणोनिया मनीच्या भावा । स्वीकारेल ती योग्य मार्गा ॥११॥
आचार्य गढले लेखनांत । किती काळ गेला, नाही ध्यानांत । शिष्य धास्तावले मनांत । कालावधी संपत आला ॥१२॥
अखेर एकांत मोडुनि । शंकराचार्यांसमोर जाऊनि । दिलेली छाटी पुढे करोनि । म्हणति चलावे महीष्मतीस ॥१३॥
अमरक राजाच्या राज्यांतील । एकान्त होता संपणार । ‘ अमरुशतक ’ ग्रंथ कामशास्त्रावर । लिहून झाला संपूर्ण ॥१४॥
शिष्यांसहित शंकराचार्य । पोचले महिष्मती नगरांत । मंडनमिश्र करिती स्वागत । उभयभारती देई आसन ॥१५॥
सांगती उभयतांस आचार्य । ‘ अमरुशतक ’ ग्रंथ करील निर्णय । मिळतील उत्तरे यथायोग्य । कामशास्त्रीय प्रश्नांची ॥१६॥
उभयभारतीनें ग्रंथ पाहिला । विवेकपूर्ण निर्णय दिधला । ‘ आचार्य आपण जिंकला । मंडनमिश्रांनी घ्यावा संन्यास ॥१७॥
आता मंडनमिश्र शिष्य आपुले । मजसीहि आपण हरविले । माझे कार्य जणूं संपले । जाईन मीहि स्वस्थानी ’ ॥१८॥
उभयभारतीचे धरुनि पाय । आचार्य म्हणती “ सरस्वती माय । तूं जाता विद्यांचा लय । होईल या अवनीवर ॥१९॥
शृंगेरीस स्थापेन मठ । बनावे ते विद्येचे पीठ । राहावी वेदान्ताची मान ताठ । आई तुझ्या वास्तव्ये ” ॥२०॥
उभयभारती हीच सरस्वती । मनी झाली प्रसन्न अति । सांगे प्रेमे शंकराप्रती । समजावुनि परिस्थिती ॥२१॥
म्हणे “ आता देहत्याग । करणे आहे अनिवार्य । परी सांगते एक पर्याय । त्याचे करावे पालन ॥२२॥
बांधावा शृंगेरीस मठ । स्थापावे तेथे श्रीयंत्र । तेथेच मी राहीन दिवसरात्र । धारण करुनि दिव्य तेज ” ॥२३॥
अवतार संपला शारदेचा । मार्ग ठरला मंडनमिश्रांचा । शिष्य झाला आचार्यांचा । नांव ठेविले सुरेश्वर ॥२४॥
वार्ता पसरली दूरवर । मंडनमिश्र झाले पराभूत । लोक म्हणती आता निश्चित । जगद्गुरु अवतरेल ॥२५॥
भक्त शिष्यांसह शंकराचार्य । दक्षिण दिशेची वाट धरुन । निघाले महिष्मती सोडून । अनेकांना वादात जिंकीत ॥२६॥
पोचले पंचवटी क्षेत्रांत । जेथे राहिले श्री सीताराम । त्या क्षेत्री करुनि मुक्काम । जीर्णोद्धारिले राममंदीर ॥२७॥
होते करणे कार्य महान । वेदान्ताचे तत्वज्ञान । सर्वत्र रहावे भरुन । म्हणून अव्याहत प्रवास ॥२८॥
गाठले क्षेत्र पंढरपूर । परब्रह्म लिंग जेथे विटेवर । कर ठेवुनि कटीवर । राहिले उभे भक्तास्तव ॥२९॥
आचार्य न्यहाळति नीट । चंद्रभागेचा तो तट । म्हणति हे तर योगपीठ । स्फुरले स्तोत्र ‘ पांडुरंगाष्टक ’ ॥३०॥
भक्तिभाव तो आचार्यांचा । ठाव घेई अंतःकरणाचा । स्वभाव सामान्य जनांचा । वळला वैदिक धर्माकडे ॥३१॥
श्रद्धेने भेटती लोक । म्हणती करावा उपदेश । सर्वास आचार्यांचा आदेश । स्वधर्मनिष्ठा राखावी ॥३२॥
पंढरपुराहून श्री शैल । ज्योतिर्लिंगातील एक तीर्थ । कापालिकांचे जेथे प्रस्थ । तेथे पोचले आचार्य ॥३३॥
आचार्यांसी करणे शास्त्रार्थ । आपले प्रयत्न ठरतील व्यर्थ । क्रकच करी साधण्या स्वार्थ । दुष्ट हीन योजना ॥३४॥
आपल्या शिष्य उग्रभैरवास । सांगे, खोट्या नम्रभावे । आचार्यांस सेवेस लागावे । संधी साधून त्या मारावे ॥३५॥
कापालिकांत श्रेष्ठ उग्रभैरव । येऊनि आचार्यांपाशी साव । म्हणे धरुनि शरणभाव । आलो आपुल्या पायाशी ॥३६॥
सेवेचे नाटक वठवून । सर्वांची मने आकर्षून । एके दिवशी संधी साधून । रडू लागला आचार्यांपाशी ॥३७॥
म्हणे ‘ तपश्चर्या उग्र केली । त्याची पूर्तता नाही झाली । जरी आपली कृपा लाभली । तरीच होईल कार्य माझे ” ॥३८॥
आचार्य तर करुणालय । म्हणती, “ स्पष्ट सांग मनोदय । सांग बरे मी करुं काय । तुझ्या तपःपूर्तीस्तव ॥३९॥
अरे नाही कोणी आसपास । निःसंकोच होऊनि सांग बरे । काय आहे मनांत खरे । माझ्यापाशी मागणे ” ॥४०॥
कैसे सांगू म्हणे उग्रभैरव । “ मजला आदेशी साक्षात् भगवान । रुद्रहोमात हवी आहुति महान । सर्वज्ञ महात्म्याचे मस्तकाची ॥४१॥
जरी करावे मी हवन । योग्य सहाय्य कर्ते केवळ आपण । विनवितो धरुनि चरण रुद्रहोमार्थ अर्पावे जीवन ” ॥४२॥
आचार्य जाणती मनोमन । परी म्हणती हासून । “ जरी होआण्र तुझे कल्याण । अर्पिन मी माझे जीवन ॥४३॥
परी आहे मोठी अडचण । इतर शिष्य हे न मानतील । तुझ्या हेतूच्या आड येतील । गुपचुप आपण जाऊ दूर ” ॥४४॥
उग्रभैरव झाला हर्षित । म्हणे “ बोलणे आपले योग्य । अमावस्येचा साधुनि योग । नेईन तुम्हास गुपचुप ” ॥४५॥
काय घडले त्यानंतर । उग्रभैरवासह गेले कां शंकर । कथा मनासी लावी घोर । जाणावी पुढील अध्यायी ॥४६॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । एकोणीसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४७॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP