श्री शंकराचार्य वंदना - अध्याय अकरावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
गोविंदयति आणि शंकर । गुरुशिष्यांची जोडी अमर । परस्परांवर प्रेम अपार । वर्णिले दहाव्या अध्यायी ॥२॥
शंकरास प्रेमे आलिंगिले । हृदयी त्या दृढ धरिले । हृदयीचे गुह्य प्रकट केले । उपदेशती प्रसन्नपणे ॥३॥
कमंडलुत नर्मदा लीन । नास्तिकादि वादांचे खंडन । अद्वैत मता दे उच्चस्थान । करावा सर्वत्र संचार ॥४॥
गौडपादे जी विद्या दिधली । ती सर्व तुज शिकविली । सांग कांही आहे कां उरली । जिज्ञासा एखादी तुझ्या मनी ॥५॥
मी जाणतो रे शंकरा । अवतरलास तूं चंद्रमौलिश्वरा । अद्वैताची दीर्घ परंपरा । उजळण्या आलास भूवरी ॥६॥
लौकिकातील व्यवहार । करुनि घे प्रसन्न विश्वेश्वरास । तसेच माता भवानीस । आतां गाठावे काशीक्षेत्र ॥७॥
जरी तुज कांही विचारणे । विचार बा निःसंकोचपने । आता आहे मजसि जाणे । निजधाम ते गाठणे ॥८॥
शंकर बोले गद्गद स्वरानें । गुरुवर्यांची धरुनि चरणे । कशाचे काय मागणे । तुम्ही दिधले अपार ॥९॥
पितृऋण तसेच गुरुऋण । आहे मज फेडणे पूर्ण । दाखविला जो मार्ग आपण । चालेन त्यावर आयुष्यभर ॥१०॥
परी मनी एक आशा । भेटतील का मज गौडपाद । देतील कां मज दर्शन । जगद्गुरु व्यास बादरायण ॥११॥
संतोषले गुरु गोविंदयति । म्हणती कैसा हा शुद्ध मति । जा बाळा तूं काशीक्षेत्री । लाभेल तुज जे वांछिसी ॥१२॥
आलास एकटा नर्मदेपाशी । शिष्यांसह जावे गंगेपाशी । तेथून पुढे बदरीक्षेत्री । ज्ञानयज्ञाची पूर्णाहुते ॥१३॥
मनी साठवून गुरुमूर्ति । त्यांच्याच आज्ञेची कराया पूर्ति । जनमनी स्थापण्या वेदमूर्ति । शंकराचार्य निघाले काशीस ॥१४॥
मार्गी असती जरी काटे । कधीही ना त्या भय वाटे । वेद - स्तोत्रे गाता स्वर दाटे । प्रवास सुरु भल्या पहाटे ॥१५॥
लोकास वाटे कौतुक । वाढत चालला लौकिक । मार्गांत भेटती अनेक लोक । वैदिक धर्माचे अभिमानी ॥१६॥
मनांत म्हणति चालला कोण । नास्तिक मतांच्या कल्लोळात । वेदान्ताचा महिमा गात । मिळाला आम्हा आधार ॥१७॥
आला कालडी गांवातून । नर्मदाकाठी संन्यास घेऊन । ऐकता म्हणति हसून । आमुच्यातील आमुचा हा ॥१८॥
रक्षावया नास्तिकांच्या हल्ल्यांतून । उत्तरेतील कित्येक ब्राह्मण । पूर्वी गाठति दिशा दक्षिण । त्यांच्यातील हा धर्मरक्षक ॥१९॥
शंकराचार्य घेती अनुभव । जनमानसाचा कैसा स्वभाव । नास्तिकांचा करण्या पराभव । आहे कां समाज समर्थ ? ॥२०॥
जाणत, नाहीत हे समर्थ । परी अंतरी भाव यथार्थ । व्यक्त करिती इच्छितार्थ । वैदिकधर्म व्हावा सुस्थापित ॥२१॥
प्रार्थिती लोक देवतास । घ्यावे आता अवतारास । वेदान्तध्वजा उभारण्यास । समर्थ ज्याचा ज्ञानाभ्यास ॥२२॥
अल्पहि सामर्थ्य दिसता । आशादीप मनी तेवता । सहाय्यास उभारुनि हाता । स्वेच्छेने पुढे येतात ॥२३॥
शक्तिसंपत्तीच्या जोरावर । इतरांचा करणे पराभव । मार्ग उद्भवला हा अभिनव । परी वेदान्त्या तो अमान्य ॥२४॥
अनुभूतीसह आत्मज्ञान । हेच वापरुन साधन । वैदिक घेती जिंकून । परमवाद्यांचे अंतःकरण ॥२५॥
त्यासाठी वादभिक्षा मागून । अशास्त्रीय मते खंडून । शास्त्रीय मतांचे मंडन । वेदधर्माचे प्रस्थापन ॥२६॥
परी ऐसा ज्ञानसूर्य । केव्हा प्रगटेल भूतलावर । जगद्गुरुंचा व्हावा अवतार । मनी आतुर हे सर्वजण ॥२७॥
ऐसी वेदनिष्ठा जाणून । शंकराचार्य देती आश्वासन । करील श्री विश्वेश्वर पूर्ण । मनोरथ तुम्हां सर्वांचे ॥२८॥
प्रवास करिता ऐसा नित्य । आचार्य समजले यथातथ्य । कां धाडिती मज गुरुवर्य । करण्या दीर्घकाल देशाटन ॥२९॥
विखुरलेले वेदाभिमानी । कोणते स्वप्न राहति धरुनि । याविषयी मी अज्ञानी । होतो राहिलो गुरुगृही ॥३०॥
सुरु करिता देशाटन । सरत चालले अज्ञान । प्रत्यक्ष भेटता विविध जन । अनुभव कक्षा विस्तारल्या ॥३१॥
जरी सर्वसम्मत मूळ वेद । अर्थान्तरे होती मतभेद । वाढले किती हे पंथोपपंथ । हवा साधाया समन्वय ॥३२॥
ऐसी परिस्थिती पाहुनि । वादविवादांचे मर्म जाणुनि । पराजित करणे पंथाभिमानी । भेद नाशुनि ऐक्य साधणे ॥३३॥
जरी कोणी करील वितंड । आपणास साधणे संवाद । मान्यता पावेल अद्वैतवाद । समत्वाचे तेच मूळ ॥३४॥
काशीत कित्येक विद्वान । भेटतील अनेक पंडीत । आपापल्या पंथाचे महंत । त्यांच्याहि वादाचा हवा अनुभव ॥३५॥
कैशा होतात वादसभा । कैसा चालतात वादविवाद । कैसी ठरते हारजीत । न्यायाधीश बनते कोण ? ॥३६॥
सहयात्रींचे मनोगत । जाणून घेत शंकराचार्य । गोविंदयतींची आज्ञा शिरोधार्य । मानून प्रवेशति काशीत ॥३७॥
कैसा झाला काशीवास । मिळाली कां दिशा जीवनास । गंभीर गहन लीलाचरित । जाणावे पुढील अध्यायी ॥३८॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । अकरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३९॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP