श्री शंकराचार्य वंदना - अध्याय नववा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
केली मातेची व्यवस्था नीट । मायलेकरांची ताटातूट । निघे गुरुस्तव शंकर धीट । वर्णिले आठव्या अध्यायी ॥२॥
दक्षिण सोडूनि उत्तरेकडे । चालता शंकर घेई धडे । भोवताली जे प्रत्यक्ष घडे । ते ते देई शिकवण ॥३॥
निसर्गाचे रुप उदार । दावी कधी क्रोध अनावर । परी सदा सृष्टीवर । सौंदर्याची उधळण ॥४॥
फळे मुळे करिती क्षुधा शांत । तृष्णा शमविण्या उदक स्रोत । रंगांची सर्वत्र बरसात । नेत्रा देई परमानंद ॥५॥
कैसे फिटेल निसर्गाचे ऋण । आहे कां कोठे शास्त्रवचन । नातेसंबंध सांगेल कोण । निसर्ग आणि मानवाचा ॥६॥
शंकराच्या मनी उपजे कोडे । केव्हां कैसे कोण उलगडे । अनुभवाने ज्ञान वाढे । पदोपदी शंकराचे ॥७॥
रौद्र रुप भयानक । निसर्ग दाखवी अचानक । मृत्यूचे थैमान एकटक । शंकर पाही साक्षित्वे ॥८॥
आधार सदैव श्रद्धेचा । मुखोद्गत केलेल्या मंत्राचा । वेदातील मूळ ऋचांचा । प्रसंगानुरुप घेई शंकर ॥९॥
मार्गात दिसता मंदिर । बाल शंकर होऊन अधीर । न हालवता आपुले अधर । मानसपूजा करी सादर ॥१०॥
कैसा चालतो व्यवहार । माणसामाणसात परस्पर । रुढीचे किती गैरप्रकार । मार्गी अनुभवे शंकर ॥११॥
शांतीमंत्राचा त्यावर घोष । करिता शंकरासि संतोष । ऐकणार्‍याचा विरे रोष । श्रोते होती गंभीर शांत ॥१२॥
शंकराचे सदा गूढ चिंतन । मी करेन पण मी कोण । शरीर इंद्रिय अथवा मन । कोणते माझे सत्य रुप ॥१३॥
प्रवास चालला उत्साहात । प्रवेशला नर्मदेच्या प्रदेशात । कानावर येई वृत्तान्त । हळूंहळूं श्री गोविंदयतींचा ॥१४॥
गुहेत लावून समाधी । बैसली शांत पवित्र मूर्ती । सरल्या कित्येक दिन राती । परी बाहेर कां न येती ॥१५॥
पसरली कीर्ति दूरवर । शिष्य भक्तांचा वाढता परिवार । गोविंदयतींचे नयन आतुर । कोणासाठी कळेना ॥१६॥
पूर्वाश्रमींचे चंद्रशर्मा नाम । श्री गौडपादांचे शिष्योत्तम । ज्ञानभक्तिचा जेथे संगम । तेच हे श्री गोविंदयती ॥१७॥
गौडपादांनीहि पाहिली वाट । केव्हां घडेल शिष्याची भेट । घेऊन चंद्रशर्म्याची परीक्षा नीट । सोपविले त्या ज्ञानभांडार ॥१८॥
चंद्रशर्मा म्हणजेच गोविंदयती । गौडपाद गुरु घेता निवृत्ति । त्यास गुह्य समजाविती । शिष्योत्तमासच ज्ञानदान ॥१९॥
म्हणून यतीश्वर वाट पाहती । सर्वोत्तम शिष्याच्या भेटीची । सोपवुनि पुंजी शास्त्राची । स्वस्वरुपी जाणे आपणही ॥२०॥
गौडपादाद्वारे पातंजल योग । शुकमुनिद्वारे वेदान्त । तत्वज्ञान सगळे आत्मसात । गोविंदयतींनी केलेले ॥२१॥
अपूर्व ठेवा हा ज्ञानाचा । शिश्योत्तमास द्यावयाचा । योग परी केव्हां यावयाचा । सुवर्णक्षण तो मुक्ततेचा ॥२२॥
वास्तव्यास्तव बदरिकाश्रम । नर्मदाकाठि अमरान्तक आश्रम । स्थपौनि रक्षण्या वेदान्तधर्म । सदा राहती कार्यमग्न ॥२३॥
शिष्यपरिवार जरी मोठा । परंपरा सांभाळेल ऐसा पठ्ठा । केव्हां येईल नर्मदाकाठा । वाट पाहति रात्रंदिन ॥२४॥
राखावया मन शांत । जाऊनि नर्मदाकाठी गुहेत । बैसले सविकल्प समाधीत । गोविंदयति सद्यःकाली ॥२५॥
ऐकून सारा वृत्तांत । श्म्कर झाला आनंदित । नर्मदातिरीच्या गुहेत । सद्गुरु भेट निश्चित ॥२६॥
झपझपा मार्ग चालत । पोचला गुहेच्या दारांत । भक्त शिश्य किती तिष्ठत । यतिवर्यांच्या दर्शनार्थ ॥२७॥
ते सर्वचि झाले विस्मित । पाहुनि बालशंकरा दारांत । तेजस्वी रुप नयन आर्त । सर्वा भासे अलौकिकत्व ॥२८॥
पुसति कोठून येणे इकडे । जाणता पूर्णेपासून नर्मदेकडे । हे कैसे बालवयात घडे । अपूर्व दृढ निष्ठेवीण ॥२९॥
शंकर पुसे नम्रभावे । गुहेमाजी कैसे जावे । दर्शन मज कैसे घडावे । काय पद्धत येथली ? ॥३०॥
म्हणति बाळा यतिदर्शना । मनाई नाही येथे कोणा । कोण येईल अधिकारविना । हवी येथे शुद्ध भावना ॥३१॥
शंकर झाला अधीर । अंतरी गुरुदर्शनाचा झंकार । अष्टसात्विक भावांचा पूर । गुहेत जाई भावविभोर ॥३२॥
देह धरुनि अस्थिमय । गोविंदयति दिसती ज्योतिर्मय । शंअक्र झाला तन्मय । गुहा कोष आनंदमय ॥३३॥
गुरुशिष्यांची सिद्ध भेटी । लहरी उठल्या वातावरणी । दोघांच्याहि नेत्रज्योति । आपोआप विस्फारित ॥३४॥
गुहा पूर्ण प्रकाशित । दोघेहि परस्परा पाहत । शब्द उच्चारिती नकळत । ‘ ॐ नमः शिवाय ’ ॥३५॥
पडता कानी मंत्रोच्चार । सर्वामुखी आश्चर्योद्गार । गोविंदयति आणि बालशंकर । हळूंहळूं येती गुहेबाहेर ॥३६॥
लौकिकरुप देण्या भेटीस । गोविंदयति पुसती शंकरास । बाळा सांग तुझा वृत्तान्त । कोण तूं दे ओळख ॥३७॥
प्रश्न जरी वाटे सामान्य । गुरु शिष्य दोघे असामान्य । उत्तर होते ज्ञानजन्य । ‘ चिदानंदरुपः शिवऽहं शिवोऽहम् ’ ॥३८॥
वेदान्तधर्माचे नेमके सार । बाल शंकराचे हे उत्तर । शब्दांत दडला अर्थ गंभीर । जाणावा पुढील अध्यायी ॥३९॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । नववा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४०॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP