श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पाचवा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधार ॥१॥
पित्याचा वियोग, मृत्यूचे दर्शन । मातेचे ते कर्तव्यदक्ष मन । मौजीबंधन गुरुगृही प्रयाण । वर्णिले चवथ्या अध्यायी ॥२॥
शंकराची अपूर्व स्मृति । गुरुचरणी नम्र वृत्ति । प्रसन्न गुरु जे जे शिकविती । सहज करी आत्मसात ॥३॥
दोन वर्षांचा अल्पकाळ । न्याय सांख्य योगशास्त्र । सर्व वेदविद्या पारंगत । परोक्ष ज्ञानी झाला शंकर ॥४॥
विद्याव्रतीचे आचरण । नित्य करणे भिक्षाटन । फक्त तीन वेळा उच्चारण । एका द्वारी मंत्राचे ॥५॥
पाच घरी भिक्षा मागून । भिक्षेत मिळेल जे अन्न । गुरुसी करुनि अर्पण । गुरु देईल ते खाणे ॥६॥
भिक्षेसाठी यावा शंकर घरी । वाट पाहती सुवासिनी दरी । उत्तम अन्न आपापल्या परी । वाढण्यास्तव आसुसती ॥७॥
परी वारंवार एकाच घरी । भिक्षा मागणे नाही रीति । भिक्षेसाठी सर्वत्र फिरती । शंकर आणि इतर बटु ॥८॥
एके दिवशी असाच शंकर । भिक्षेसाठी गाठी ब्राह्मण घर । भिक्षा मंत्राचा करी उच्चार । ‘ ॐ भवति भिक्षां देही ’ ॥९॥
करील ब्राह्मणपत्नी काय । भिक्षा देण्याची इच्छा तीव्र । परी दारिद्र्य घरी अतीव । नाही धान्याच्या एक कण ॥१०॥
शंकर करी मनी विचार । नसेल पडला कानी मंत्र । गृहिणीस सांभाळणे किती तंत्र । पुन्हा उच्चारी भिक्षामंत्र ॥११॥
गृहिणी मनी अस्वस्थ । बटु जाईल परतून । भिक्षेवीण माझे दारातून । गृहस्थाश्रमास लागेल डाग ॥१२॥
लगबग धावे दाराकडे । परंतु मनी पडले साकडे । जाऊनि आता बटुपुढे । वाढू कोणती भिक्षा मी ॥१३॥
अधेर झाला शंकर बाळ । लागली काना चाहूल । परी कळले अडले पाऊल । माय अडखळे मध्यावरी ॥१४॥
शंकरासी ग्रासे खिन्नता । कैसी या मातेची अवस्था । देण्याची इच्छा तीव्र असता । मिळे ना कां कांही हाता ॥१५॥
उच्चारिता तीनदा मंत्र । जावे लागेल रिक्त हस्त । माता होईळ अपमानित । मार्ग कैसा काढावा ॥१६॥
गृहिणी पाहे इकडे तिकडे । नजर जाता वर शिंक्याकडे । एक आवळा दृष्टीस पडे । घेऊनि धावे दारापुढे ॥१७॥
अत्यंत मंद स्वरांत । शंकर उच्चारी भिक्षामंत्र । गृहिणि बोले गद्गद स्वरात । थांब्रे मी आले बाळा ॥१८॥
आनंदे शंकर झोळी पसरे । परी गृहिणी मनी बावरे । तुच्छ भिक्षा वाढू कशी रे । होई कावरी बावरी ॥१९॥
प्रेमादरे बोले शंकर । माय गे वाढ ना भिक्षा आता । आश्वस्त झाली बोल ऐकता । घाली आवळ्याची भिक्षा ॥२०॥
पाहे शंकराच्या नेत्रात । अर्थपूर्ण आदर भाव । आनंदोर्मिंचा अंतरी उद्भव । वाटे भेटला साक्षात देव ॥२१॥
शंकर वळला माघारी । मनी सतत विचार करी । लक्ष्मी होईल प्रसन्न जरी । आधार सदा गृहिणीसी ॥२२॥
भिक्षा अप्रुनि गुरुसी । शंकर जाऊनि एकांतवासी । अनन्यचित्ते महालक्ष्मीसि । विनवी आर्त भक्तिभावे ॥२३॥
महालक्ष्मी तुझे ऐश्वर्य महान । ब्राह्मणपत्नी तर धनहीन । दोघीहि मज मातेसमान । दोन टोके कां दोघींची ? ॥२४॥
मनांत दाटे कारुण्यभाव । म्हणे ‘ लक्ष्मी तूं माझी माय । ब्राह्मणपत्नी कां दयनीय । करी काही योग्य उपाय ’ ॥२५॥
आर्तस्वर उमटे कंठातून । काव्यशक्ति होई जागृत । म्हणे होई गे कृपावंत । जगन्माते महालक्ष्मी ॥२६॥
विद्याव्रती शंकराचे वागणे । स्वतःसाठी नाही मागणे । परी श्रेष्ठाघरी धरी धरणे । हरण्या दुःख दीनांचे ॥२७॥
नव्हते जाणणे केवळ शास्त्र । शास्त्राचाराचे करुनि शस्त्र । जीवन जगणे यथार्थ । सुसंस्कारित राहो चित्त ॥२८॥
बाल शंकराचे शुद्ध चित्त । न मागे स्वतःसाठी वित्त । महालक्ष्मी होऊनि मोहित । म्हणे माग वरदान ॥२९॥
झालीस महालक्ष्मी प्रसन्न । म्हणसि माग वरदान । मागणे इतुकेच वरदान । ब्राह्मणपत्नीस दे अपार धन ॥३०॥
भिक्षेसाठी जाता दारी । होते नव्हते जे घरी । आवळ्याची भिक्षा पदरी । कैसी गे ती उदार माय ॥३१॥
शंकराची मधुर वाणी । महालक्ष्मीची अगाध करणी । ब्राह्मणपत्नीची धर्मकहाणी । कनकवृष्टीनें पूर्ण होई ॥३२॥
सुवर्ण आवळ्यांचा पाऊस । पडला ब्राह्मणाचे अंगणात । लोक झाले आश्चर्यचकित । म्हणति काय चमत्कार ॥३३॥
शंकराने गाईले जे स्तोत्र । कनकधारा नामे प्रसिद्ध । पठण करील जो सश्रद्ध । होईल जीवनी धन्य धन्य ॥३४॥
बाह्यतः हा चमत्कार । जाणावया हवे त्यातील मर्म । सावधचित्ते श्रवणकर्म । करुन जाणावे पुढील अध्यायी ॥३५॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । पाचवा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३६॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP