श्री शंकराचार्य वंदना - अध्याय तिसरा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
शिवगुरु आर्याम्बेचे अनुष्ठान । शिवाने केली कामना पूर्ण । कैसे फळले तपाचरण । वर्णिले द्वितीय अध्यायी ॥२॥
अगणित भक्तांचे चार प्रकार । आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी । त्यातही श्रेष्ठ भक्त ज्ञानी । निर्णय हा भगवंताचा ॥३॥
ज्ञानी नव्हे शास्त्री वा पंडीत । ब्रह्मज्ञानाने ज्ञानी मंडित । दावी जनासि मार्ग जो निश्चित । आपुले निजरुप जाणण्याचा ॥४॥
ज्ञानमार्गाचा आदि गुरु । श्री शिवशंकर जगद्गुरु । दक्षिण देशी घेई अवतारु । तोचि श्री दक्षिणामूर्ती ॥५॥
आदि नारायण तोचि शंकर । ब्रह्मदेव वसिष्ठ शक्तृ पराशर । व्यास शुक गौडपाद । शिष्य परंपरा क्रमे मानिती ॥६॥
गौडपादांचे शिष्य गोविंदयति । नर्मदाकाठी वेदांसि जपती । अधीरपणे वाट पाहती । सत् शिष्य केव्हां भेटेल ? ॥७॥
वेदांताची परंपरा थोर । वाटे जणू होईल लुप्त । म्हणुनि तिजला ठेवुनि गुप्त । कोणी पाहती सांभाळु ॥८॥
तेणे लोक झाले वंचित । निर्माण झाले पंथोपपंथ । भेदांना ना उरला अंत । रुढी माजल्या अतोनात ॥९॥
सूज्ञ करिती मनी खंत । केव्हां येईल भगवंत । पुनरपि स्थापेल वेदान्त । करुनि सर्वांचा समन्वय ॥१०॥
जेव्हां येणे तेव्हां यावा । मूळ ग्रंथांचा त्या लाभ व्हावा । पोथी ग्रंथांचा जपति ठेवा । गोविंदयति अति आदरे ॥११॥
व्यास मुनी तर चिरंजीव । वास त्यांचा असे सर्वत्र । परी निवडीले बदरी क्षेत्र । वैदिक धर्माचे आशयस्थान ॥१२॥
कुमारील भट्टांचे कार्य थोर । जैन मतांचे करुनि खंडन । मीमांसक तत्वांचे यथार्थ मंडन । यज्ञसंस्था केली प्रतिष्ठित ॥१३॥
आपापल्या परी निष्ठापूर्वक । प्रयत्न करिती सर्व साधक । होऊनि वैदिक धर्माचे रक्षक । वाट पाहती अवताराची ॥१४॥
नव्हता मोठा राजाश्रय । कैसी व्हावी साधकांची सोय । जनांस कळेना करावे काय । कोण टिकवेल परंपरा ॥१५॥
अवतारापूर्वीची ही स्थिती । गुंग होई सर्वांची मति । परी मनी जाणती वेदान्ती । अवतरेल जगद्गुरु ॥१६॥
निर्गुणासि होणे सगुण । ज्ञानाज्ञानापल्याडचे तेज । साकार होण्यास्तव अधीर । अवतारार्थ शोधी उपाधी ॥१७॥
शिवगुरु आर्याबेचे शुद्धचित्त । कैलासपति झाला मोहित । दोघांचे शुभ मीलनांत । प्रवेशला जीवरुपे ॥१८॥
आर्याम्बेस झाली जाणीव । उदरांत वाढतो गर्भ कोणी । प्रसन्न झाला शूलपाणी । शिवगुरु जाणती मनोमनी ॥१९॥
प्रकटेल साक्षात् शंकर । जीवमात्रासि कल्याणकर । दुःखाचा करुनि परिहार । शाश्वत सुख देईल ॥२०॥
नवमास भरले पूर्ण । रात्रंदिन शिवाचे स्मरण । वैशाख शुद्ध पंचमीचा दिन । मध्यान्ही पुत्र प्रसवला ॥२१॥
मध्यान्हीचा प्रखर सूर्य । शिवगुरुंच्या पवित्र कुटीत । आर्याम्बेच्या स्निग्ध कुशीत । प्रसन्नतेने हासला ॥२२॥
शिवगुरु पाहती न्याहाळूण । शिरी चक्र भाळी नेत्रचिन्ह । स्कंधावरी शूलचिन्ह । निश्चये झाला शिवावतार ॥२३॥
पुत्राचे मुख अवलोकिता । धनदान भूदान गोदानादि । संकल्प सोडले नानाविधी । आनंद हृदयी मावेना ॥२४॥
पुत्राचे करणे नामकरण । सर्वज्ञा साजेलसे नाम कोण । चंद्रमौलिश्वराचे फेडावे ऋण । नाव ठेविले शंकर ॥२५॥
ध्यानी मनी मुखी शंकर । चित्ति येई आनंदाचा पूर । जन्माचे जणू सार्थक थोर । कृतकृत्य झाले मायबाप ॥२६॥
जन्मकुंडली झाली तयार । ग्रह सांगती झाला अवतार । सर्वज्ञताच जणू साकार । परी अल्पायुषी होणार ॥२७॥
शिवगुरुंसी वाटले धन्य । हक्क अग्रहाराचा आधीच मान्य । कुलात झाले साकार ज्ञान । जणू पूर्णत्वा पावले जीवन ॥२८॥
पूर्णेच्या कांठी पूर्णत्व प्रकटे । बालशंकर हळूंहळूं वाढे । परी बुद्धीतेज अतीव गाढे । संस्कारापूर्वीच व्यक्त झाले ॥२९॥
शिवगुरुंचे श्रेष्ठ गुरुकुल । क्षणोक्षणी वेदवाणी ऐके मूल । पाठ होई मंत्र तत्काळ । अपूर्ण मेधा शंकराची ॥३०॥
लागले भगवंताचे पाय । सज्जन म्हणती कालडीचे भाग्य । सामान्य जन करिती आश्चर्य । कैसा शिवगुरुचा पुत्र अपूर्व ॥३१॥
श्रेष्ठांच्या मते थोर वेदान्ती । कोणी म्हणती साक्षात् भक्ती । कोणास भासे कर्ममूर्ती । पहाता शंकर गुंगे मति ॥३२॥
शंकराच्या बाललीला । भक्तिज्ञानाचा अपूर्व मेळा । सदैव लोक भोवती गोळा । प्रत्येकासी भेटे आनंद ॥३३॥
आधीच बाल्यावस्था मनोहर । त्यातून हा ज्ञानी शंकर । चरित्रकथा सहज सुंदर । संतोषवील श्रोतृगणास ॥३४॥
कैसा वाढे शंकर बाळ । कैसा हो त्याचा प्रतिपाळ । शिवगुरु घरी हर्षाचा सुकाळ । जाणावे पुढील अध्यायी ॥३५॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । तिसरा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३६॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP