मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय सव्विसावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सव्विसावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय सव्विसावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥बाल स्वामींचे शंका निरसन । काम केले बौद्धांचे खंडन । वेदान्तधर्माचे प्रतिपादन । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥आचार्य जेव्हां ध्यानमग्न । त्यांचे विषयी स्वानुभव । शिष्य आपल्या स्मरणांतून । सांगती अहमहमिकेने ॥३॥एक शिष्य म्हणे आवर्जून । स्मरणशक्तिचे आचार्या वरदान । प्राप्त असावे जन्मापासून । राजशेखराचे घ्या उदाहरण ॥४॥राजशेखर साहित्यप्रिय । लिहिले त्याने एक नाटक । वाचून दाविले आचार्यास । कोण्या एके काळी ॥५॥तदनंतर गेले आचार्य । धर्मप्रसारार्थ प्रांती इतर । दुर्दैवे पीडिला राजशेखर । नाटक झाले भस्मसात ॥६॥कालांतराने भेटता आचार्य । राजशेखर झाला शिष्य । ऐके शास्त्रचर्चा दिव्य । मनी धरुनि शरणभाव ॥७॥सांगा मजसि राजशेखर । मधेच पुसति आचार्य । साहित्य रचना नवीन काय । राजासि सुचेना उत्तर ॥८॥अखेर सांगे मनोगत । आता नाही मन रमत । साहित्य, कला क्षेत्रांत । नाटक गेले अग्नीत ॥९॥स्वर झाला सद्गदित । अश्रु उभे नयनात । शब्द पुढे उमटेनात । राजशेखर दिसे म्लान ॥१०॥करुणालयचि शंकराचार्य । वात्सल्य ओतप्रोत नयनांतून । वदति किंचित् हासून । “ स्मरते तुझे नाटक ” ॥११॥राजा कांहीसा भांबावला । म्हणे “ मलाहि स्मरते तैसे । परी मूळ लिखाणा जैसे । कैसे आता होईल ? ” ॥१२॥आचार्य सांगती, “ लेखणी उचल । लिहून घे सांगतो तैसे । नंतर सांग योग्य की कैसे । होईल जे लिखाण ” ॥१३॥किंचित् थांबुनि करिती स्मरण । राजशेखर घेई लिहून । बघता संपले सांगून । जैसे होते तैसेच ॥१४॥हर्षाला नुरला पारावर । स्मरणशक्तिचे अपूर्व दर्शन । राजा धरी आचार्य चरण । केवढी कृपा मजवर ॥१५॥आचार्य म्हणति “ उठ राजा । होऊ दे आनंदित सारी प्रजा । नाटकाचा प्रयोग करी, जा । संधी उत्तम कलाकारा ” ॥१६॥राजा विचारी होऊन शांत । “ कैसे राहिले सर्व स्मरणांत । आपणासी तर व्याप अनंत । नाटक त्यापुढे अति क्षुद्र ” ॥१७॥आचार्य सांगती समजावून । “ ध्यानांत घे नीट पंचीकरण । कळेल कैसे घडते स्मरण । शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण ॥१८॥कशाचेहि करिता श्रवण । आपमहाभूताचे स्निग्धत्व । चित्तवृत्तिशी करी निगडीत । परी हवा अभ्यास ॥१९॥पृथ्वी महाभूताचे स्थिरत्व । अस्मिता होऊनि जागृत । ठसा उमटे अंतःकरणात । धारणाशक्ति प्रत्येकाची ॥२०॥आठवा वेदपठनाची रीति । एकाग्र मनानें ध्यानस्थिती । त्या योगे वाढे स्मरणशक्ति । परी हवा अभ्यास ॥२१॥तुझे पूर्वी ऐकता नाटक । विषय होता वेदान्ताशी निगडीत । सामान्यासहि करी आकर्षित । म्हणोनि राहिले स्मरणात ॥२२॥परमेश्वाचे खरे इच्छित । तूं, मी तर निमित्तमात्र । त्यासी हवे ते घडे निश्चित । म्हणून स्मरले नाटक ” ॥२३॥ऐकता नाटकाची कथा । दुसरा शिष्य सरसावला । म्हणे “ असाच आहे बोलबाला । पद्मपादाचार्यांच्या चतुःसूत्रींचा ” ॥२४॥जमलेले भक्त शिष्य । आतुरतेने विचारती त्यास । सांगावे त्याही प्रसंगास । जरी स्वतः अनुभविला ॥२५॥सुरु झाली दुसरी कथा । केरळ यात्रेत आचार्यांच्या । आश्चर्यकारक प्रसंग घडला । महाशूर नामक तीर्थक्षेत्री ॥२६॥एके दिवशी अकस्मात । भेटीस आले पद्मपदाचार्य । आनंदे पुसति शंकराचार्य । आहे ना सर्व क्षेमकुशल ॥२७॥पद्मपादांचे मन उचंबळे । टपटपा अश्रूंची धार गळे । गुरुचरणांशी खिळले डोळे । शब्द उमटेना मुखांतून ॥२८॥उठविती आचार्य शिष्यास । वात्सल्यभावे कुरवाळीत । आपुल्या हाते नेत्र पुसत । वदति सांग काय घडले ॥२९॥आचार्यांचा हात फिरता । दुःखावेग दूर झाला । सांगू लागले कर्मकथेला । ‘ कर्मकांडी मामाने घात केला ॥३०॥ब्रह्मसूत्र भाष्यावर । ‘ विजयडिंडिम ’ नामे टीकाग्रंथ । लिहून झाला साद्यंत । मामाने तो पाहिला ॥३१॥मज वाचावयाचा म्हणून । घेतला माझी स्तुती करुन । मी परतलो यात्रेहून । म्हणे नष्ट झाला अग्नीत ॥३२॥अद्वैत मतापुढे नाही टिकाव । मामाच्या मनी उपजला वैरभाव । वरी वई दाखवून प्रेम भाव । विषप्रयोगहि केला मजवर ॥३३॥आतां काय करु मी आचार्य । पुन्हां कैसी ती रचना घडेल । केली होती टीका सखोल । अभ्यास मननाचा परिपाक ’ ॥३४॥जगद्गुरु म्हणति, “ पद्मपादा । सोसल्यास तूं अनंत आपदा । विजयडिंडिम ही ग्रंथसंपदा । नाही झाली पूर्ण नष्ट ॥३५॥ब्रह्मसूत्रांतील पहिल्या चार । सूत्रांवरची तुझी टीका । पूर्वीच दाविली नव्हतीस कां । स्मरणांत आहे ताजी माझ्या ॥३६॥तुझी टीका बहारदार । म्हणून कोरली स्मृतीपटलावर तेवढीच करील तुला अमर । उचल लेखणी सांगतो मी ” ॥३७॥आचार्य क्षणैक स्तब्ध बसले । पद्मपाद तयार झाले । लेखणी घेऊन सरसावले । चतुःसूत्री टीका यथापूर्व ॥३८॥झाले विस्मित सर्वजण । म्हणती कैसे हे अगाध स्मरण । शिष्यकृतीचे पुन्हां उद्धरण । पद्मपाद पावले समाधान ॥३९॥ऐकता ऐशा रम्यकथा । म्हणती धन्य झाली भारतमाता । युगांती अवतार ऐसा लाभता । कैसे ज्ञान लोपेल ? ॥४०॥ध्यानावस्था संपता उठोन । आचार्य पाहती सर्वास । पुसति चालला कशाचा प्रयास । काय साधले जमुनि ? ॥४१॥लहानगा एक निष्पाप बटु । ‘ सांगे ऐकतो तुमची कीर्ति । सर्वत्र पसरली ख्याति । आपुल्या स्मरणशक्तिची ’ ॥४२॥आचार्य सांगती सर्वा स्पष्ट । “ होऊ नये उगाच भाट । वाढवूं नये गुरुचा थाट । मूळ कार्यास लागे नाट ॥४३॥कीर्तन हे तर भक्तीसाधन । कशास करावे ईश्वरावाचून । तत्वाचे करावे चिंतन । वाढवूं नये व्यक्तिमाहात्म्य ॥४४॥हे आहे कामकोटी पीठ । सर्वदा व्हावे सर्वज्ञ पीठ । प्रत्येकाने आणावी ज्ञान वीट । ज्ञानमंदीर उभारावे ॥४५॥होवोनिया अतीव धीट । मार्ग चालू नये धोपट । करुनिया विचार श्रेष्ठ । मार्ग चालावा पुढील ॥४६॥ठेवण्या ज्ञानदीप तेवता । हवी अभ्यासाची दृढता । क्षणही उसंत न घेता । साधकाने करावा शास्त्रार्थ ॥४७॥ऐसे जरी घडेल । तरीच ज्ञान ना लोपेल । वेदान्तधम्र फोफावेल । प्रत्येका आनंद लाभेल ” ॥४८॥श्री शंकराचा ज्ञानावतार । सर्वास करी योग्य बोध । वेळोवेळी करुन सावध । सर्वत्र तेणे आनंद ॥४९॥परी ज्याने केला देहधारण । त्यास होणे देहमुक्त । मिळते कां कांही इतिवृत्त । जाणावे पुढील अध्यायी ॥५०॥इति श्री आदि शंकर लीलामृत । सव्विसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५१॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP