मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय चोविसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
वाद सभातून सर्वां जिंकून । सर्वज्ञ पीठावर आरोहण । कामकोटी पीठाचे व्यवस्थापन । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
बाल वयाचा चरणेन्द्र सरस्वती । शिष्य भाव जागता मनी । चरित्र वृत्तान्त विचारुनि । अंतःकरणाचा ठाव घेई ॥३॥
म्हणे “ अहो गुरुवर्य । शंकराचार्य हीच पदवी । प्रत्येक मठाधिपती लावी । आपली ओळख मग कशी व्हावी ? ” ॥४॥
शंकराचार्य सांगती हासून । “ कशास हवी ओळखण्या खूण । ओळखावे आपणास आपण । हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान ॥५॥
आले होते हस्तामलक । त्यांना विचारले मी, ‘ तूं कोण ’ । म्हणती ‘ नित्योपलब्धी आत्मा जाण ’ । तीच त्यांची होती खूण ॥६॥
होतो तुझ्या एवढा लहान । गुरु गोविंद यती पुसती ‘ तू कोण ’ । ‘ शिवोऽह्यं मी ’ सांगितले जाण । तीच माझी ओळख ॥७॥
बाह्य नाम, बाह्य वेष । पदवी अथवा सत्तास्थान । ही नव्हे रे अंतरीची खूण । नित्य जाणावे चिदानंद रुप ” ॥८॥
बालस्वामी घाली वाद । ‘ प्रत्येकास कसा होईल बोध । आणि घेणार तरी कैसा शोध । हवी मुळात विद्वत्ता ’ ॥९॥
इतुक्यात आला एक शिष्य । म्हणे “ थोडक्यात सांगा आत्मबोध । नको कटकटीची शोधाशोध । आपण साक्षात् असताना ” ॥१०॥
आचार्य हासुनि पुसति त्यास । ‘ सांग बाळा प्रकाशवी कोण ’ । शिष्य म्हणे, ‘ सोपा प्रश्न । दिवसा सूर्य, रात्री दीप ’ ॥११॥
पुन्हा विचारिती आचार्य । ‘ जेव्हां नाही दिवा, नाही सूर्य । कसे पाहसी दृश्य । सांग जरा त्वरा करुन ’ ॥१२॥
शिष्य तत्काळ तत्परतेने । ‘ माझे डोळ्यांनी ’ देई उत्तर । आचर्य पुसति सत्वर । ‘ डोळे मिटता मग कोण ? ’ ॥१३॥
सांगे शिष्य विचार करुन । ‘ गुरुजी, मनःचक्षु सदा जागृत ’ । आचार्य हासून पुसत । ‘ कोण उजळिते मनबुद्धिस ’ ॥१४॥
शिष्य समजला पूर्ण । म्हणे ‘ मीच की हो आचार्य । मी मूळ चिदानंदमय । झाला सोपा आत्मबोध ’ ॥१५॥
बालस्वामी होते ऐकत । संवाद दोघांचा समस्त । म्हणती होऊन आनंदित । ‘ किती सारभूतसा आत्मबोध ॥१६॥
आता करा ना शिष्यबोध । बसलो धरुनि हीच आस । मज निमित्ते सर्व शिष्यांस । द्यावा साधनेसंबंधी उपदेश ’ ॥१७॥
सहज सोपी प्रासादिक । रचना केली ‘ उपदेशपंचक ’ । वस्तुतः ते ‘ साधनपंचक ’ । रचिले शंकराचार्यांनी तत्काल ॥१८॥
संन्यासी वा गृहस्थाश्रमी । असो कोणी भक्त वा ज्ञानी । त्या सर्वासी मार्ग दावूनी । सहाय्यभूत साधनेस ॥१९॥
नित्यनेमे करिता पठण । अर्थाए करिता मनन । संसारतापाचे सर्वथा शमन । मिळेल शांती परमानंद ॥२०॥
शंकराचार्यांचे ऐसे शिकविणे । साधकाचा अधिकार ओळखून । योग्यतेनुसार मार्ग दावून । प्रत्येकास करणे उन्नत ॥२१॥
शिकत होते बालस्वामी । पीठाधीश म्हणून पावावे मान्य । यासाठी आचार्यांचा प्रयास । काळाचा विचार वेगळा ॥२२॥
आला आला जवळी काळ । म्हणे ‘ संपविणे आता खेळ । माझ्यासह तूं हि चल । स्वधामी पोचणे तुज आता ’ ॥२३॥
आचार्य वदति त्यास । ‘ असे मित्र तूं माझा प्रिय । उगाच कां दाविसी भय । आली कां आता वेळ ? ’ ॥२४॥
काळ सांगे ‘ आत्ता नाहीं । सूचना देण्यास आलो पाही । पराभूत दोनदा तुझ्या पायी । आता मात्र जिंकेन ’ ॥२५॥
आचार्य विचारती काळास । ‘ पराभवाची अजून बोच । कां बाळगिसी उगाच । जन्मापासून सखा तूं ॥२६॥
काळा तुझे चक्र फिरते । म्हणून जन्ममरणाचे फेरे । जन्ममृत्यूच्या मध्यांत बा रे । राहते ते जीवन ॥२७॥
कालातीत केवळ ब्रह्म ’ । बोल ऐकतां मृत्यू फजित । ज्ञानापुढे तो सदा लज्जित । ज्ञानेच मिळे मुक्ति ॥२८॥
आचार्य जाणती मनोमनी । काल कोणी दुजा नाही । तमोशक्ति भगवान महेशाची । संहारशक्ति वा विष्णूची ॥२९॥
उत्पत्ति तेथे लय निश्चित । लयापूर्वी उत्पत्ति निश्चित । म्हणून शोधणे अनादि तत्त्व । जन्ममृत्यूरहित परब्रह्म ॥३०॥
जेथून आलो, तेथे जाणे । त्यासाठी साधन होणे । सदैव जीवासंगे राहणे । मृत्यूसारखा नाही मित्र ॥३१॥
आचार्यांसी न देता आलिंगन । काळ गेला अन्यत्र निघून । जाता म्हणे, ‘ पुन्हा येईन । तेव्हांच मित्रा आलिंगेन ’ ॥३२॥
काळाच्या भेटीनें आचार्य प्रसन्न । म्हणती झाले कार्य संपन्न । प्रतिष्ठा पावले वेदान्त ज्ञान । अनायासे जाईन स्वस्वरुपास ॥३३॥
कधी बसून शांत मौन । ऐकती स्तोत्रे शिष्य मुखांतून । स्वतःहि गाती आवर्जून । ‘ मृत्यूंजय मानस पूजा ’ ॥३४॥
पूर्वीच केलेल्या असंख्य रचना । प्रसंगानुरुप ऐकविती भक्तांना । क्कचित् करिती रचना । छोटीसी परी यथार्थ ॥३५॥
ब्रह्मानंदी सदा मग्न । खाण्यापिण्याचे नुरले भान । कधी शिवाचे गाती भजन । मुखी सदैव ‘ आनंद - आनंद ’ ॥३६॥
शरीरास पडले सदा कष्ट । कसे रहावे धष्टपुष्ट । परी मनी सदा संतुष्ट । सर्वथा दिसती तेजःपुंज ॥३७॥
शरीराभोवती तेज फाकले । मृदु ताम्र दिसती पाऊले । स्निग्ध वात्सल्य दृष्टीत भरले । आचार्यांचे रुप वर्णनातीत ॥३८॥
दर्शनास येती असंख्य जन । मुग्ध होती घेता दर्शन । वाटे कृतार्थ झाले जीवन । भवार्णवी भेटे भगवंत ॥३९॥
आनंदे जयघोष निरंतर । ‘ जय जय शंकर - आदि शंकर ’ । भवतापाचा पडे विसर । दिसो लागे जगचि सुंदर ॥४०॥
प्रेमळ मधुर शब्दांत । ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार । आचार्य सांगती अल्पसे सार । ‘ वैदिक धर्मातील तत्वांचे ॥४१॥
भासमान ते तात्कालिक । ज्यावरी भासे ते चिरकाल । जो नित्यानित्य जाणेल । त्याचे षड्रिपु शमतील ॥४२॥
भासमान तेचि असत्य । ज्यावरी भासे ते सत्य । जाणावे अंतरी सत्यासत्य । संपावे जरी सुखदुःख ॥४३॥
मायावरणा दूर सारिता । प्रत्यय येईल आनंदाचा । ब्रह्म कंद जो आनंदाचा । अभ्यासाने अनुभव घ्यावा ॥४४॥
चित्तशुद्धि हे करुनि साधन । दूर करावे मायावरण । हृदयी प्रकटे ब्रह्मज्ञान । सार्थचि होईल जीवन ’ ॥४५॥
आचार्यांच्या वाणीमधून । प्रकटत राही तत्वज्ञान । श्रोत्यांचे मन होई लीन । वाटे कृतार्थ जीवन ॥४६॥
आत्मबलाची होई जाणीव । दीन - हीनता जाई संपून । स्वस्वरुपाचे येई भान । करु लागती नेटे साधन ॥४७॥
संपत आला जीवनाध्याय । शिष्यांसी कोणते नेमले कार्य । सामान्यांसी कथिले काय । जाणावे पुढील अध्यायी ॥४८॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । चोविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४९॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP