श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सोळावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगदुगुर श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
भवानीसहित शंकर प्रसन्न । काव्यशक्ति झाली उत्पन्न । भाष्य स्तोत्रे अर्थ रससंपन्न । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
मिळाला गुरुंचा आदेश । आचार्य सोडूनि वाराणशीस । पोचले बदरीक्षेत्रास । विशाल बद्रीच्या मंदिरी ॥३॥
दिसे शाळीग्राम शिळा समोर । परी कुठे ना मनोहर मूर्त । पूर्वाचार्ये जी केली प्रतिष्ठित । दिसेना चतुर्भुज नारायण ॥४॥
अस्वस्थ मनी आचार्य । सगुणोपासनेस्तव देवालय । असता घडला कोणता प्रलय । मूर्ती दिसेना मंदिरांत ॥५॥
पुजारी सांगती इतिहास । चिनी दरोडेखोरांचा त्रास । मूर्तीचा करतील विध्वंस । म्हणून लपविली कुंडात ॥६॥
मूळ मूर्ती परी सापडेना । म्हणुनि स्थापिली शिळा येथ । पूजा चालविली नित्य । मूळ मूर्तीचा शोध व्यर्थ ॥७॥
आचार्य उठले सत्वर । ध्यानमग्न, कुंडाच्या तटावर । लोक म्हणती थांबा यतीवर । प्राण गमवाल या प्रयत्नी ॥८॥
आचार्यांचा दृढ विश्वास । शोधता हाच जलाशय । नारायण हरेल प्राणभय । कुंडात उडी घेतली ॥९॥
लोक झाले भयभीत । आचार्य केव्हां दिसतील । आज आमुचे सर्वस्व जाईल । जरी ते प्राण गमावतील ॥१०॥
जोडुनि हात भगवंतास । प्रार्थना करिती रक्षावयास । मूर्तीरुपे लागावे हातास । होवोत विजयी आचार्य ॥११॥
आचार्य येती पाण्याबाहेर । हातात मूर्ती मनोहर । लोक तटस्थ काठावर । जाहले हर्षभरीत ॥१२॥
परी पाहतां निरखून । मूर्ती दिसे खंडित । आचार्य करिती विसर्जित । आणि घेती पुन्हां शोध ॥१३॥
वारंवार येई हाता । तीच मूर्ती बोटे भग्न । सर्वजण होती विचारमग्न । करावी कां प्रतिष्ठापना ॥१४॥
आकाशवाणी उठे स्पष्ट । मूर्तीस द्यावे पूर्वीचे स्थान । कलियुगी हिचेच पूजन । मान्य करी नारायण ॥१५॥
यथाशास्त्र मूर्तीचे स्थापन । मंदिरात करिती सर्वजण । अभिषेक होम हवन । सुरु झाले नित्यपूजन ॥१६॥
आकाशवाणी म्हणजे काय ? । सर्वांतरीचा सूक्ष विचार । करोनि मात रुढीवर । स्पष्ट येई ओठांवर ॥१७॥
परशक्तिचे आक्रमण । मूर्ती खंडित होण्याचे कारण । कधी न ठरावी अडचण । जीर्णोद्धार करण्यास ॥१८॥
हे असे घडणार कलियुगी । परधर्मी अनेक सत्ताधारी । वैभव लुटण्यास सर्वतोपरी । आक्रमतील भारत ॥१९॥
करतील आपल्या सत्तामदे । मंदिरे मूर्ती सारी उध्वस्त । न होता क्षणभर मोहग्रस्त । करावा सदा जीर्णोद्धार ॥२०॥
आचार्यांचा विचार प्रशस्त । आदरे सर्वदा मानिती समस्त । अनेक वेळा लुटले सोमनाथ । वैभवे प्रस्थापित स्वातंत्र्योत्तर ॥२१॥
ऐसी देऊनि इतरा दृष्टी । आचार्य जाती व्यास तीर्थी । आपली दृष्टी परमार्थी । ठेवूनी राहती ध्यानमग्न ॥२२॥
जाहला केवढा प्रवास । बालवयात अपार सायास । चिंता लागली सर्वांस । मिळेल कां आचार्यांना विश्राम ॥२३॥
ध्यान हाच ज्यांचा विश्राम । चिंतन हेच ज्यांचे काम । जेथे राहति तेचि धाम । परिव्राजकाचे हेचि जीवन ॥२४॥
जेथे जेथे करिती वास । विद्यादान करिती शिष्यास । स्पष्ट करिती योगाभ्यास । ज्यासी ज्यात रुचि असे ॥२५॥
जरी अल्पायुषी कार्य प्रचंड । चाले ज्ञानयज्ञ अखंड । मोडावयाचे नास्तिक बंड । पुन्हा वेदान्ता उच्चस्थान ॥२६॥
ध्यानांत झाले प्रकट । परात्पर गुरु गौडपादाचार्य । जाणुनि आचार्यंचे भाष्य । मांडुक्यावरील कारिकांचे ॥२७॥
संतोषे डोलविती मान । शंकरा तुझे अगाध ज्ञान । आतां तूच करी पूर्ण । प्रस्थानत्रयीवर भाष्य ॥२८॥
गीता उपनिषदे ब्रह्मसूत्र । आचार्य सांगति अर्थ गूढ । कोणीही वेदान्ती न राहावा मूढ । शब्दाशब्दावर भाष्य सुरु ॥२९॥
हिमालयातील नित्य भ्रमण । अथक चालला प्रवास । केदारधाम गाठावयास । उत्सुक शिष्य परिवार ॥३०॥
बदरीक्षेत्र ते केदारधाम । वाटेत लागे ज्योतिर्धाम । आचार्य करिती मुक्काम । राजा तेथील सेवारत ॥३१॥
होऊ लागला शास्त्रार्थ । जमू लागले अनेक साधक । तत्वचर्चा साधक बाधक । आचार्य करिती सर्वा मुग्ध ॥३२॥
भाष्याचे सुंदर विवेचन । शिष्यहि देती प्रवचन । आनंदे डोलविती मान । सामान्य वा विद्वान ॥३३॥
ज्योतिर्धामी अशी सुरवात । वेदान्ताचे प्रतिष्ठापन । पूजेत आले पंचायतन । पंचमहायज्ञ घरोघरी ॥३४॥
ज्योतिर्धाम ते केदार । प्रथम तीर्थ कल्पेश्वर । रुद्रनाथ चवथा केदार । तुंगनाथ तिसरे तीर्थ ॥३५॥
हिमालयाची विशालता । सौंदर्य पावित्र्य मधुरता । प्रत्येक स्थानी रमणीयता । मोहित करी सर्वांना ॥३६॥
द्वितीय केदार माध्यमेश्वर । ओलांडूनि गाठिती गौरीकुंड । श्रमपरिहारास्तव हे तप्तकुंड । केदारनाथाच्या पायाशी ॥३७॥
उत्तुंग शिखरी केदारधाम । त्रिकोणाकृति विस्तीर्ण पठार । भगवान महादेवाचे मंदीर । पुराणकालीही प्रसिद्ध ॥३८॥
जागृत देव केदारनाथ । भक्तांचे पुरवी सर्व मनोरथ । कृपाप्रसादाची सदैव साथ । शरण जाता एकदा ॥३९॥
मार्ग एवढा कठीण । कोण चालेल श्रद्धेवीण । नामघोषांत चालती चरण । भेटण्या शिवासी स्थाणुरुप ॥४०॥
केदारक्षेत्री आचार्य शंकर । पोचता सर्व शिष्यांसह । जाणती, ही शीतता दुःसह । इतरांना नाही सोसणार ॥४१॥
कोणी म्हणति शिष्या सोडून । गगनमार्गे कैलासी गमन । आचार्यांवर शिव प्रसन्न । दिधली पांच स्पटिकलिंगे ॥४२॥
तैसीच दिधली ‘ सौंदर्य लहरी ’ । रचना तंत्र मंत्र शास्त्रावरली । नंदीने जरी हिसकावली । आचार्यांनी पूर्ण केली ॥४३॥
केदारक्षेत्री परत जाता । स्थापिले वरलिंग नेपाळात । नेपाळ नृपावरी वरदहस्त । आचार्य ठेविती प्रेमभरे ॥४४॥
सोडिले केदार शिष्यांसहीत । गंगोत्रीस स्थापुनि गंगामंदीर । उत्तरकाशीस पोचले शंकर । तपोभूमी ती अति प्राचीन ॥४५॥
प्रसंग घडले रोमहर्षक । जे पुढील प्रवासात । त्या सर्वांचा अल्पवृत्तान्त । जाणावा पुढील अध्यायी ॥४६॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सोळावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४७॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP