श्री शंकराचार्य वंदना - अध्याय विसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
उभयभारतींचा पराभव । श्री यंत्री वास्तव्याचे आश्वासन । क्रकच उग्रभैरवाचे कारस्थन । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
उग्रभैरवासि अत्यानंद । म्हणे ‘ फसले पूर्ण आचार्य । अमावस्येला होईल साध्य । मनोरथ गुरु क्रकचाचे ॥३॥
आचार्य झाले स्वतः तयार । करण्या स्वतःचेच बलिदान । आता सोपे होमहवन । मार्ग होईल पूर्ण निर्विघ्न ’ ॥४॥
आमावस्येच्या रात्री भैरव । म्हणे आचार्यांस “ आता चला । सर्व परिसर शांत झोपला । वेळ नका घालवू ” ॥५॥
आचार्य निघती सत्वर । टाकती पावले भराभर । जागा न होवो शिष्यवर । साधू दे भैरवाचे मनोगत ॥६॥
परी राखता परमेश्वर । कोण करु शकेल घात । सिद्धान्त हा त्रिकालबाधित । सदा सांगती सज्जन ॥७॥
जाग आला पद्मपादा । एकाएकी उठून बसला । आसपास बघू लागला । नकळत झाला अस्वस्थ ॥८॥
शंकराचार्य दिसेनात जागेवर । एवढ्या रात्री कुठे जाणार । निरखून पाहे सभोवार । झाला चिंताग्रस्त पद्मपाद ॥९॥
जाणवले कांहीसे विपरीत । उग्रवैभवही नाही दिसत । नाना शंका उठति मनांत । लावले ध्यान एका क्षणांत ॥१०॥
म्हणे झाला पुरा घात । यातून कोण वाचविणार । केवळ एक नरसिंहावतार । त्यालाच घालावे साकडे ॥११॥
पद्मपाद करी स्मरण । लक्ष्मीनृसिंहासी जाई शरण । म्हणे धावा न लागता क्षण । उग्रभैरव मारील आचार्यास ॥१२॥
भक्तीनें कळवळे श्री नृसिंह । पद्मपादासी देई आश्वासन । घेतले रुप पंचानन । धावला करीत गर्जना ॥१३॥
उग्रभैरवासह कापालिक । भांबावले गर्जनेने सकळिक । पाहती आला अचानक । सिंह क्रूर भयानक ॥१४॥
आचार्यांसी नाही भान । लावून बैसले होते ध्यान । करो केव्हाही भैरव हवन । ब्रह्मानंदी पूर्ण मग्न ॥१५॥
जैसा हिरण्यकश्यपू मारिला । तैसाच उग्रभैरव फाडिला । कापालिकांचा नाश केला । साक्षात् नृसिंहा अवतरला ॥१६॥
पद्मपाद सर्व शिष्यांसहीत । आला धावत, शोधत । पाहोनि दृश्या भयचकित । उठवी आचार्यांस ध्यानांतून ॥१७॥
आचार्यांनी जाणले सर्व । अमावस्येचे हे आगळे पर्व । कापालिकांचा गळाला गर्व । प्रकटे साक्षात् श्री नृसिंह ॥१८॥
आदरे करिती त्याचे पूजन । लक्ष्मीनृसिंहपंचरत्न स्तोत्र रचून । घडल्या प्रसंगाचे मर्म जाणून । शिष्यास देती परमबोध ॥१९॥
शांत झाला अवतार । पद्मपादास आनंद अनावर । टळले संकट महाघोर । नृसिंहोपासनेचे प्राप्त फल ॥२०॥
प्रवास पुढे सुरुं झाला । मनांत नव्हत्या आता शंका । ईश्वर आहे पाठीराखा । रक्षितो, पोषितो तोच सर्वा ॥२१॥
सोडूनि श्री शैल क्षेत्र । गाठती गोकर्ण महाबळेश्वर । जेथील मूर्ती अर्धनारीनटेश्वर । पाहतां चित्त आनंदविभोर ॥२२॥
उत्तम स्तोत्र सहज रचून । महाबळेश्वराचे करिती स्तवन । सर्वांचे मन राही प्रसन्न । मुक्काम केला तीन दिन ॥२३॥
घेऊनि ध्यानी मतमतांतरे । विवेचन करिती साधार । यशाची वार्ता पसरे दूर । आणि कीर्ति दिगंत ॥२४॥
श्रीवल्ली गांवी असेच । जमले अनेक विद्वान । आचार्यांचे ऐकता विवेचन । मुग्ध झाले सर्वजण ॥२५॥
तेथेच प्रभाकर नामे कोणी । धर्मज्ञ ब्राह्मण मुलास आणी । जड बालक नाही बाणी । मातापित्यांचे डोळा पाणी ॥२६॥
आचार्य बघति पुत्राकडे । जाणती, नाही जड मूक । हा तर ब्रह्मज्ञ कोणी एक । विचारती ‘ कोठून आलास ॥२७॥
पाहून बाला तुजकडे । संतोष मनी अतीव वाढे । संतोषाचे मूळ गाढे । तुझ्या वृत्तीत आनंदे ’ ॥२८॥
बालकास जणूं खूण पटली । अंतर्यामे उर्मी प्रकटली । वाग्देवता साकारली । बोलू लागला मधुर शब्दे ॥२९॥
एकटक बघत आचार्याकडे । बाळ प्रश्नांचे गूढ उलगडे । मुखांतून वेदान्त बाहेर पडे । म्हणे “ मी नित्योपलब्ध आत्मा ” ॥३०॥
आचार्य ऐकति देऊन लक्ष । झाला वक्ता, मूळचा मूक । स्तोत्र बनले ‘ हस्तामलक ’ । प्रभाकर झाला आनंदित ॥३१॥
आचार्य विनविती मातापित्यास । द्यावे मजकडे पुत्रास । हा जन्मला धर्मकार्यास । पूर्वजन्मीचा सिद्ध पुरुष ॥३२॥
बाळ बोले मातापित्यास । “ कळले नां मी आतां कोण । मजसि करावे गुरुस अर्पण । शंकराचार्यासि मी अनन्यशरण ” ॥३३॥
मातापित्यांनी सम्मती देता । जाणुनि बालकाची योग्यता । संन्यसदीक्षेची करुनि सिद्धता । नाम दिले हस्तामलकाचार्य ॥३४॥
श्रीवल्ली सोडून पुढे प्रवास । शृंगेरीत पोचले आचार्य । सत्ताधीश होता वंशचालुक्य । शरणभावे करी स्वागत ॥३५॥
शृंगेरी म्हणता स्मरणात । येती शब्द उमाभारतीचे । स्वप्न मठ मंदीर बांधण्याचे । लागले आचार्य कामास ॥३६॥
धर्मोपदेश त्यांचा अति सुंदर । झाले जनमानस तयार । उभाराया मठ मंदिर । प्रत्येकाचा पुढे हात ॥३७॥
न लागता थोडाही उशीर । होऊ लागला मठ तयार । स्थापून शारदेचे मंदीर । आचार्य बसविती श्री यंत्र ॥३८॥
वाढला शिष्य - परिवार अपार । कळावे त्या वेदान्तसार । आचार्यांच्या रचना मनोहर । आत्मबोध प्रप्चसारादि ॥३९॥
रचना असो लहान मोठी । अद्वैत वेदान्ताची त्यात महती । अभ्यासिता साधक दृढमती । एकात्मता पाहती अनेकात ॥४०॥
भेद पाहणे हे अज्ञान । अभेद मानणे हेचि ज्ञान । समतेचे तत्व महान । आचार्यांनी केले प्रस्थापित ॥४१॥
सामान्य शिष्य आनंदगिरी । नव्हती विद्वत्ता वा चतुराई । गुरुमाऊलीचे होण्या उतराई । सदा सेवेत तत्पर ॥४२॥
सर्वतोपरी भासे दीन । नाही पांडित्य अथवा ज्ञान । गुरुसेवा हेच साधन । साध्यहि जीवनी गुरुसेवा ॥४३॥
सेवाव्रतानें चित्त पवित्र । शुद्ध चित्त, निर्मळ मन । जरी बाह्यांगी वाटे हीन । अंतर्यामी खरा धनवान ॥४४॥
एके दिवशी पाठासाठी । आचार्यांपाशी जमले सर्व । आनंदगिरी सेवेत गर्क । भान नुरले वेळेचे ॥४५॥
‘ येवो अथवा न येवो गिरी । सुरु करावा पाठ आपण । जमलो आम्ही सर्वजण । तो तर आहे मंद जड ’ ॥४६॥
आचार्य म्हणति, “ थांबा थोडे । येईल गिरी आता इकडे । भरतोच ना तोहि घडे । त्याच्या वाचुनि सर्व अडे ” ॥४७॥
इतरांचा विचार वेगळा पडे । बुद्धिमान आम्ही या अंहंगंडे । गुरुबंधुची अवहेलना घडे । गिरीसाठी नको थांबणे ॥४८॥
सिद्ध करण्या सेवेचा अधिकार । गिरीस आज्ञापिती दे पाठ । जरी समजसी स्वतःस मठ्ठ । कष्ट हेच तुझे तप ॥४९॥
आचार्यांची ऐकता आज्ञा । जागृत झाली गिरीची प्रज्ञा । जिव्हेवरती सर्व विज्ञा । दिधला पाठ उत्कृष्ट ॥५०॥
गिरीचा झाला तोटकाचार्य । तत्व जणूं प्रकटे साकार । चित्तशुद्धीनें मिळतो ज्ञानाधिकार । सर्वांस मिळाला अनुभव ॥५१॥
पद्मपाद, हस्तामलक, सुरेश्वर । तोटक हे पट्टशिष्य चार । आचार्यांची कृपा अपार । धर्मप्रचारार्थ शिष्य तयार ॥५२॥
शृंगेरीहून कुठे जाणार । आचर्य म्हणती चला सत्वर । कालडीस आता परतणार । वाट पाहते आर्याम्बा ॥५३॥
झाली कां मायलेकराची भेट । कालडी ग्रामी घडले काय । प्रसंगाचे सर्व गांभीर्य । जाणावे पुढील अध्यायी ॥५४॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । विसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५५॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP