श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सतरावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
हिमालयामाजी आचार्य । कैसे करिती भ्रमण । भाष्यरचना आणि जीर्णोद्धार । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
उत्तरकाशी भूमी पवित्र । मोहित झाले आचार्यांचे मन । क्षुधा तृष्णेचे नुरले भान । सदा राहती समाधिमग्न ॥३॥
ध्यानांत प्रकटे जो गहन विचार । ‘ विज्ञान नौका ’ स्तोत्र साकार । मृत्यूहीन ज्योतिर्मय ओंकार । मीच ब्रह्म निराकार ॥४॥
सोळा वर्षांचे कोवळे वय । परी अंतर्बाह्य झाले ज्ञानमय । शिष्यांच्या मनी उपजे भय । होणार नाही ना समाधिस्थ ॥५॥
विचार करुन शिष्यगण । धरती आचार्यांचे चरण । सांगती जाऊन शरण । करावे भाष्याचे विश्लेषण ॥६॥
आवडीचाच तो विषय । शिष्यास शिकविणे शारीरक भाष्य । आनंदे मानिती आचार्य । झाले सुरु ज्ञानसत्र ॥७॥
एके दिवशी अकस्मात । येई वृद्ध तेजस्वी ब्राह्मण । विचारी सर्वासी करी कोण । भाष्य ब्रह्मसूत्रांवर ॥८॥
शिष्य करिती वंदन । देती त्या आदरे आसन । सांगती खंडनपूर्वक विवेचन । करितात आचार्य शंकर ॥९॥
ब्राह्मण पाही निरखून । म्हणे सांगा बरे समजावून । प्रथम सूत्राचे करावे विवरण । तृतेय अदेह्यायी प्रथम पद ॥१०॥
नमुनि बोलती आचार्य । प्रश्नावरुन आले ध्यानी । सूत्रांचा मर्मार्थ जाणोनि । आरंभिला आपण संवाद ॥११॥
जैसे जितुके मी जाणतो । आपणासमोर मांडितो । आपले समाधान होईतो । विचारावेत प्रश्न ॥१२॥
प्रथम देह सोडुनि जीव । प्रवेश करिता अन्य देही । सूक्ष भूतांनी वेष्टित जाई । ऐसे मूळ सूत्र ॥१३॥
आचार्य करिती विवेचन । छांदोग्यातील संदर्भ योग्य । उद्धृत करोनि करिता भाष्य । मान डोलवि ब्राह्मण ॥१४॥
जरी तोषला मनी ब्राह्मण । आचार्यास करी प्रतिप्रश्न । विचेचन राहता अपूर्ण । म्हणे उद्यां येईन ॥१५॥
ब्राह्मण करी प्रश्न । आचार्य देती उत्तर । चर्चा ऐसी ब्रह्मसूत्रांवर । चालली कांही दिवस ॥१६॥
कोण असावेत हे ब्राह्मण । पदम्पाद विचारी आचार्यास । असतील कां वेदव्यास । शंका मनी येते रोज ॥१७॥
आचार्य म्हणती पद्मपादास । मजही वाटते हे वेदव्यास । उद्या करु शंकेचा निरास । येईल ब्राह्मण तेव्हाच ॥१८॥
दुसरे दिवशी येई ब्राह्मण । विचारी पुन्हा गहन प्रश्न । आचार्य करुनि सादर नमन । विनविती सांगा आपण कोण ॥१९॥
वेदव्यास कृष्ण द्वैपायन । परीक्षा घेण्या आला आपण । ऐसे मानितो आम्ही सर्वजण । सत्यरुप प्रकट करावे ॥२०॥
ब्राह्मण बोले हासून । खरेच आहे हे अनुमान । विवेचनाने पावलो समाधा । प्रकट होती महर्षि व्यास ॥२१॥
मनी मावेना आनंद । आदि गुरुंचे धरुनि चरण । आचार्यासह शिष्यगण । गेले व्यास गुरुंना शरण ॥२२॥
ऐसी आपली ओळख । देऊन स्विकारिती आसन । वदति शंकरा कल्याण । तुजकरवी साधणे जगात ॥२३॥
प्रथम देतो आशीर्वचन । अल्पायुष तुझे वर्ष षोडश । वाढो आणखी सोळा वर्ष । कार्य जाण्या सिद्धीस ॥२४॥
आवडे तुज समाधीयोग । परी अनुमति देईल कोण । जीवनकार्य पूर्ण केल्याविण । करण्या तुज आत्मसमर्पण ॥२५॥
येथवरी संपादिलेस ज्ञान । आता करणे परिभ्रमण । पंथोपपंथांचे वादे खंडन । सुप्रतिष्ठित करणे वैदिक धर्म ॥२६॥
त्याचसाठी देवाधिदेवे । वाढविले तुझे आयुष्यमान । या गोष्टीचे राखून भान । करावे पूर्ण कार्य महान ॥२७॥
एकाग्र करुनि चित्त मन । आचार्य ऐकती व्यास वचन । म्हणती झाले धन्य जीवन । गुरु व्यासांनि दाविला मार्ग ॥२८॥
सद्गुरुंची मान्यता लाभली । पूर्वतयारी पूर्ण झाली । आता पाहिजे संधी साधली । शास्त्रार्थ करण्या पंडितांसवे ॥२९॥
उत्तरकाशी सोडून शंकर । निघाले शिष्यांसहीत भराभर । हिमालयचे सोडून पठार । गाठती क्षेत्र प्रयाग ॥३०॥
करुनि बौद्धांचा पराभव । कुमारील भट्ट पंडीत । कर्मकांडासी प्रतिष्ठित । करिती अनन्य भक्तिनें ॥३१॥
त्याच भट्टांच्या शोधात । आचार्य गाठति प्रयाग क्षेत्र । तीन नद्यांचे संगम तीर्थ । ज्ञान भक्ति वैराग्य ॥३२॥
देहशुद्धीचे सोपे साधन । आचार्य करिता संगमी स्नान । तेजःपुंज काय अपाहून । जन म्हणति हा पुरुष कोण ॥३३॥
कुमारील भट्ट येथेच जवळ । निघाले आम्हां सोडून । त्यांचेच करण्या कार्य पूर्ण । अवतरले कां हे विभूतिमत्व ॥३४॥
आचार्यांच्या पडता कानी । कुमारील भट्ट घेती तुषाग्नि । त्वरित धावले त्या स्थानी । सोबतीस मोठा समुदाय ॥३५॥
दृश्य मोठे करुणामय । अलौकिक सदाचरणी भट्टाचार्य । तुषाग्नित बैसले दृढनिश्चय । अग्नि लावलेला तळाशी ॥३६॥
सामान्य जनांचा सुरु विलाप । का सोसावा सज्जनांनी ताप । ऐसे काय घडले पाप । त्यासाठी हे प्रायश्चित्त ॥३७॥
कुमारील भट्टांचे शिष्य । सांगती हे धर्मपरायण । निर्णय करिती स्वये आपण । गुरुवधास्तव स्वशिक्षा ॥३८॥
लोक करिती आश्चर्य । स्वतः स्वतःसि शिक्षा देणे ।  धर्मपरायणांचे हे जगणे । वेदनिष्ठा हे जीवन ॥३९॥
शंकराचार्यांसि कुमारील भट्ट । नेत्रभावे करिती नमन । आचार्यहि करिती वंदन । शिष्यांसह त्या वेदरक्षका ॥४०॥
भट्ट बोलती गद्गद स्वर । माझा आला जवळ शेवट । घडली आचार्य तुमची भेट । झालो मी कृतार्थ ॥४१॥
बौद्ध गुरुसी केले पराभूत । जीवननाश त्यांचा घडला नकळत । त्याचेच घेण्या प्रायश्चित । केला तुषाग्नि प्रवेश ॥४२॥
घडला आणखी एक प्रमाद । मीमांसेचा एकान्तिक पुरस्कार । ईश्वराचे अस्तित्वास नकार । नको होते हे घडावया ॥४३॥
असो आलात कां आपण । कोणता हेतू मनांत धरुन । सांगावे निःशंक होऊन । काय अपेक्षा आपली ॥४४॥
आचार्य जणूं झाले मूक । काय बोलावे कळेना क्षणैक । चित्त म्हणे विझवून टाक । जलसिंचने हा तुषाग्नि ॥४५॥
भावना वेग आवरुनि घट्ट । म्हणति विनवतो तुम्हां भट्ट । जीवित संपविण्याचा हट्ट । सोडून द्यावा आम्हास्तव ॥४६॥
लिहिले अद्वैत सिद्धीसाठी । प्रस्थानत्रयीवर मी भाष्य । आपण लिहावे त्यावर वार्तिक । विनवितो मनापासून ॥४७॥
भट्टपाद सांगती समजावून । फिरते कालाचे सदा चाक । वेदोक्त धर्माचा सहज परिपाक । अटळ आता तुषानल प्रवेश ॥४८॥
तुझ्या भाष्यावर वार्तिक लिहिणे । तसेच कांही अन्य लिहीणे । हे तर माझे भाग्य फळणे । परी आलास उशीरा ॥४९॥
परंतु तुझे साधावे कार्य । ऐसा कांही सांगतो उपाय । मंडनमिश्रा जिंकिणे अनिवार्य । हेच मान तुझे ध्येय ॥५०॥
मंडनमिश्र तर माझा शिष्य । हरला तर तुझा शिष्य । लिहील वार्तिक जाणुनि भाष्य । त्यास मागावी वाद भिक्षा ॥५१॥
स्वतः मंडन खराच पंडीत । त्याची पत्नीहि जाणते शास्त्रार्थ । तिलाच करावे मध्यस्थ । निःपक्ष जी उभयभारती ॥५२॥
बोलता बोलता भट्टपाद । तुषाग्नित झाले तेजोमय । आदरे वदति आचार्य । “ आपला आदेश शिरोधर्य ” ॥५३॥
भट्टांचे मुख उजळले । सर्वास आशीर्वाद दिधले । बघता बघता अग्निने वेढिले । कुमारील भट्ट झाले अग्नीमय ॥५४॥
अग्नी जाळित होता देह । तरीहि दावोनि मार्ग सुयोग्य । जीवनात झाले कृतकृत्य । कुमारील भट्ट अद्वितीय ॥५५॥
आठवीत तयांचे जीवन । आचार्यांचे सुरु भ्रमण । अचंबित झालेला शिष्यगण । चाले त्यांच्या मागोमाग ॥५६॥
कळली तितिक्षेची अपूर्वता । भट्टपादांची धर्मपरायणता । तुषाग्निप्रवेशाचा प्रसंग पाहतां । ठसली प्रत्येकाच्या मनांत ॥५७॥
कैसा झाला शास्त्रार्थ । मंडनमिश्र आणि आचार्यात । त्या घटनेचा वृत्तांत । जाणावा पुढील अध्यायी ॥५८॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सतरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५९॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP