श्री शंकराचार्य वंदना - अध्याय चौदावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
समुदाय वाढे नित्य शिष्यांचा । अधिकार जाणुनि प्रत्येकाचा । आचार्य करिती बोध कैसा । वर्णिले तेराव्या अध्यायी ॥२॥
श्रवण मनन निदिध्यासन । वेदान्त मार्गाचे साधन । नित्य स्वतः आचरुन । आचार्य शिकविती इतरा ॥३॥
श्री शंकराचार्यांचे दर्शन । सर्वास करी प्रसन्न । स्वतः काहीसे खिन्न । भवानी देईना साक्षात्कार ॥४॥
अन्नपूर्णेचे करुनि पूजन । तिच्याचपाशी भिक्षा मागून । म्हणति दे वैराग्य ज्ञान । दावी आता मार्ग पुढचा ॥५॥
प्राप्त जाहले जरी ज्ञान । तैसेच वृत्तीत वैराग्य । परी हवे सातत्य । साधाया मुक्ति सायुज्य ॥६॥
घेतला जरी संन्यास । पुरुषार्थ नुरले काम अर्थ । परी सतत लोकसंग्रहार्थ । श्रेष्ठांनी जपावा धर्माचार ॥७॥
तैसाच हा शंकरावतार । आचार्यरुपे या धरणीवर । अन्नपूर्णेचे ठोठाविती दार । घडो आई साक्षात्कार ॥८॥
नित्याप्रमाणे पहिल्या प्रहरी । स्नानास्तव घाटावरी । आचार्य जाती घाई घाई । एकलेच शिष्याविना ॥९॥
स्पष्ट कांही दिसेना । मार्गात कोण आहे कळेना । जाणले, करी कोणी रुदना । करुणावतार थांबले ॥१०॥
निरखुनी पाहती आचार्य । पतीचे शव घेऊनि मांडीवर । कोणी स्त्री बैसली वाटेवर । खिन्न शोकमग्न बिचारी ॥११॥
तिजला विनविती मृदुशब्दे । मार्गातून जरा दूर होणे । मोकळी होईल वाट जेणे । मजसि आहे स्नान करणे ॥१२॥
नाही कोणती हालचाल । मिळाले ना कांही उत्तर । आचार्य विनविती हळुवार । बाहूस घ्यावे शव थोडे ॥१३॥
न पाहता आचार्यांकडे । म्हणे ‘ तुम्हीच शवास सांगावे । आपले आपण त्याने हलावे । वाट द्यावी तुम्हां सत्वरे ” ॥१४॥
‘ पतिवियोगाचा आघात । तेणे ही स्त्री शोकार्त । बोलते ऐसे विपरीत । शवास सांगे हलावे ’ ॥१५॥
ऐसा करुनि विचार । कळवळले श्री आदिशंकर । आधीच ते करुणासागर । कळेना काय सांगावे ॥१६॥
कैसी झाली हिची स्थिती । पतिनिधनानें भ्रष्ट मति । हळुवारपणा आणुनि चित्ती । आचार्य करिती समजावणी ॥१७॥
“ माये, दुःखाने भांबावलीस । कैसे कोणी सांगावे शवास । ते तर आहे चेतनाहीन । कैसे ऐकेल वा हलेल ? ॥१८॥
येणार्‍या जाणार्‍या सोयीचे व्हावे । आई, शव जरा बाजूस करणे । अंत्यसंस्कार जेव्हा करणे । तेव्हा करावे शांतपणे ” ॥१९॥
क्षणभर वातावरण पूर्ण स्तब्ध । उठे ना कोणताहि शब्द । एकाएकी म्हणे “ भगवत्पाद । तुम्हीच सांगा समजावून ॥२०॥
कां बरे शक्ति नसावी शवास । मीच कां हलवावे तयास । तुम्ही सांगता ज्या तत्वास । गेले कां सारे फोल ? ॥२१॥
शक्तिनिरपेक्ष जे ब्रह्म । सर्व जर त्याचेच कर्तृत्व । दूर सरावे हे शव । आपुले आपण एकटेच ” ॥२२॥
ऐकता ते सारे शब्द । वृत्तीत झाले स्फुरण । जाणले मूळ विवेचन । प्रकृति - पुरुष, माया ब्रह्म ॥२३॥
कोण असावी बरे ही स्त्री । ऐसे कूट प्रश्न विचारी । या गंगेच्या घाटावरी । दुःखार्त शोकार्त असूनहि ॥२४॥
नकळत आचार्य पुढे झाले । स्त्री पुढे मस्तक नमविले । मनोगत बोलाया उठले । परी काय आश्चर्य ॥२५॥
नव्हते घाटावर कोणीच । नाही स्त्री वा नाही शव । मोकळी होती वाट सर्व । पुढे जाण्या ना अटकाव ॥२६॥
आचार्य जाणति मनोमन । आई भवानी झाली प्रसन्न । अन्नपूर्णेनें देऊन दर्शन । ब्राह्म मुहूर्ति घडविला साक्षात्कार ॥२७॥
शंकराचार्य भावविभोर । मनी दाटली भक्ति अपार । शब्द झाले साकार । भवानी अष्टक स्तोत्ररुपे ॥२८॥
सदा शरण मी तुझिया चरणी । शरणार्थी गे तुजपाशी । सर्वस्वचि तूं आई भवानी । तूच गति गे तूच गति ॥२९॥
शब्दाशब्दामधुनि प्रकटे । सामान्यसहि जे भय वाटे । संसारातील विविध संकटे । परी भवानी तारी तूं गे ॥३०॥
कुंठित होते जेव्हा मति । काय कैसी होईल गति । कोणती दैवते मज रक्षिती । नाशी भवानी भवभिती ॥३१॥
भवानीसी भावे भजता । चित्तांत भरे प्रसन्नता । आत्मविश्वास उजळे पुरता । मार्ग पुढचा स्पष्ट झाला ॥३२॥
कोणी म्हणेल कैसी कथा । भवानी तेथे प्रकटता । कां न दिसली इतरा । चमत्कार की रंजकता ? ॥३३॥
अंतर्यामीचे चैतन्य । जेव्हां होते प्रगटीत । तेव्हाच घडते अघटित । लोक म्हणति चमत्कार ॥३४॥
जड चैतन्याच्या मननांत । भवानी प्रकटे बुद्धीत । आचार्यांच्या गहन चिंतनात । निष्पन्न झाले सत्यतत्व ॥३५॥
आचार्यांसि कळली खूण । अद्वैताचे करिता समर्थन । कोणतेहि न रहावे न्यून । मातेने घातली ज्ञानभिक्षा ॥३६॥
शव म्हणजे तरी काय ? । शक्तिविरहित ऐसा शिव । शक्ति प्रकटता शिवात । शिवास मिळे जीवरुप ॥३७॥
स्वतःशीच करिता गूढचिंतन । घाटावरती जो झाला भास । स्पष्ट झाले आचार्यांस । प्रातिभासिक सत्तेचे रुप ॥३८॥
प्रसन्न झाले शंकराचार्य । आनंदे आळविती अन्नपूर्णेस । रचुनि अन्नपूर्णाष्टकस्तोत्रास । भक्तिभाव प्रकटे यथार्थ ॥३९॥
भक्तिमार्गास्तव देवता वंदन । स्पष्ट करिण्या वेदान्तवचना । घडल्या कोणत्या रचना । जाणावे पुढील अध्यायी ॥४०॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । चौदावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४१॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP