मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय बाविसावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय बाविसावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय बाविसावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥मातेस घडविले विष्णुदर्शन । शंकरस्मृति झाली निर्माण । शास्त्र थोर रुढीहून । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥शंकरस्मृतीचे होता वचन । खवळले रुढीप्रिय ब्राह्मण । आनंदले सर्व विद्वज्जन । सुरु झाल्या वादसभा ॥३॥आचार्यांचे शांत सौम्य वर्तन । विरोधी क्रुद्ध उद्विग्न । सामान्यास घडे जे दर्शन । तेणेच होई प्रथम निर्णय ॥४॥मुखी शास्त्र धर्म सारे । परी आचरणांत कांही नुरे । अशांना कैसे मानावे बरे । इतरांनी मार्तंड धर्मज्ञ ॥५॥आचार्यांचे सारेच न्यारे । बोलणे तैसेच वागणे । ब्रह्म सर्वत्र सदा पाहणे । तेणे सर्वत्र आनंद ॥६॥एकेक शास्त्री झाले पराभूत । शंकरस्मृतीस सम्मती देत । आचार्यांचे बनती भक्त । यात्रा चाले पुढे पुढे ॥७॥ केरळ प्रांताची यात्रा संपवून । शृंगेरीस करावे कार्य जाऊन । आचार्यांचा हेतू मनोमन । परी राजशेखराचे वेगळे मत ॥८॥आचार्यांस पुन्हां पुन्हां विनवून । बोलाविले सर्वास शृगेरीहून । म्हणे विजययात्रा यावी यावी घडून । अनेक शिष्य - भक्तांसह ॥९॥ दिग्विजय यात्रेचे साधन । धर्मनिष्ठा आणि आत्मबल । अद्वैत तत्वज्ञानाचे बोल । वेदमंत्रांचा उद्घोष ॥१०॥धीर गंभीर वृत्तीनें आचार्य । विरोधकांनी जरी केले कापट्य । अथवा पांडित्याचे खोटे नाट्य । सर्वांसी करिती पराभूत ॥११॥सोपी नव्हती पुढील वाट । कित्येकदा ओढवे प्राणसंकट । संन्यासधर्माचा लावुनि नेट । यात्रा चाले पुढे थेट ॥१२॥आचार्यांचे स्पष्ट विचार । मधुर वाणी सहजोद्गार । अद्वैतमताचा सर्वत्र प्रसार । धर्मयात्रेतून घडत राही ॥१३॥धर्म, सत्य, शांती, मैत्र । सर्वांचे मूळ तत्व अद्वैत । अविद्येने उपजे द्वैत । जे सोडूनि धरावे अद्वैत ॥१४॥जाणा तुम्हीच आहा भगवंत । तुमचे रुप सच्चिदानंद । आत्मस्वरुपाचा घेऊनि शोध । करावे सार्थक जन्माचे ॥१५॥ते परब्रह्म तूं आहेस । गुरुपदेशाचा घेऊनि ध्यास । मी ब्रह्म आहे तत्वास । अनुभवावे जीवनांत ॥१६॥मग राहील कसली खंत । आत्मविश्वास प्रगटेल धगधगीत । कार्य घडेल फलाशारहित । त्यासी जीवन्मुक्ति प्राप्त ॥१७॥या आत्मविद्येचा अधिकार । लिंग जात वर्ण भेदातीत । जो जो मनी मुक्ति इच्छित । त्या प्रत्येकासी आहे प्राप्त ॥१८॥ऐसे विचार कानी येतां । धर्मयात्रेचे दृश्य बघतां । दूर होई दुर्बलता । ऐक्य समाजी निर्मिले ॥१९॥दुःखाचा करुनि अंत । आपापल्या कार्यात होऊनि रत । आत्मतेजा करी जागृत । धर्मध्वजा उचली उंच ॥२०॥आचार्यांना कुठली विश्रांती । करण्या सर्वांची इच्छापूर्ती । कुठे स्थापिती देवता मूर्ती । कुठे मंदिराची उभारणी ॥२१॥जैसा समाज उभा पुढती । त्याच्या हिताचे कार्य करिती । आशीर्वाद कोणा देती । स्तोत्रे सुंदर कोणास्तव ॥२२॥केरळ, कर्नाटक, रामेश्वर । प्रवासामध्ये श्रीरंग, कांचीपूर । कलिंग गाठति आंध्रानंतर । चार्वाक जैन बौद्धांची हार ॥२३॥जगन्नाथपुरी, मगध, प्रयाग । वाराणसी, उज्जयिनी, गिरीनार । सोमनाथ, प्रभास, द्वारकानगर । सिंधू, काश्मीर, पेशावर ॥२४॥काश्मीर क्षेत्री होते प्रसिद्ध । सरस्वतीचे शारदा पीठ । मंदीरात उज्ज्वल सर्वज्ञ पीठ । अजिंक्य अनेकांसी तोवरी ॥२५॥ज्ञानसंपन्न व्यक्तिचा अधिकार । आरोहण सर्वज्ञ पीठावर । सर्व पंथांचे विद्वत्वर । जेव्हां देतील होकार ॥२६॥सर्व शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास । तत्वज्ञानाची धरुनी कास । समन्वयपूर्वक विवेचन खास । मान्य व्हावे सर्वांस ॥२७॥यासाठी चारी द्वारावर । बसती अनेक विद्वत्वर । गूढ प्रश्न पुसती सत्वर । जो चढू पाहे पीठावर ॥२८॥सर्व शास्त्री पंडित । जरी होतील पराभूत । खुद्द शारदेने द्यावे मत । तेव्हांच घडेल आरोहण ॥२९॥शिष्य विनविती आचार्या । विजययात्रेची संपन्नता । शारदा पीठाची मान्यता । घेऊनि करावी सार्थकता ॥३०॥नव्हता ज्ञानाचा अहंकार । नव्हती सन्मानाची हाव । गाजवावे आपुले नांव । हे ही नको आचार्यांस ॥३१॥परी हट्ट शिष्यांचा । वेदान्ताची वाढावी प्रतिष्ठा । शारदा चरणी सर्वांसि निष्ठा । आरोहणातून व्यक्त व्हावी ॥३२॥विचारपूर्वक उठती शंकर । उभे राहती पीठासमोर । पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर । प्रदक्षिणेचा धरती मार्ग ॥३३॥मार्गी बैसलेले तत्वज्ञ । कणाद, गौतम, नैयायिक । बौद्ध, जैन, मीमांसक । करिती नाना तर्हेचे प्रश्न ॥३४॥कोणी पाहती तपासून । खरेच कां हे सर्वज्ञ । माझ्या पंथाचेही तज्ज्ञ । तत्वाधिष्ठित वादविवाद ॥३५॥पदार्थतत्व नेमके काय । अस्तिकाय म्हणजे काय । आमच्या पंथाचे मर्म काय । वेदान्ताहून कसे भिन्न ॥३६॥सौम्य शांत मधुर स्वरे । आचार्य देती उत्तरे । ऐकूनि प्रसन्न होती सारे । सर्वशास्त्रविशारद खरेच हे ॥३७॥विनविती चलावे मंदीरात । शारदेचे काय मनोगत । दैवीवाणीचा अपूर्व स्रोत । येईल कां कानावर ॥३८॥आचार्य जोडुनि दोन्ही हात । उभे राहून मंदीरात । शारदेची विनवणी आर्त । करिती अत्यंत आदरे ॥३९॥शारदा होऊनि प्रसन्न । गंभीर दैवी वाणीनें बोलत । “ वत्सा, संतोषले माझे चित्त । खरोखर तूं सर्वज्ञ ॥४०॥करी पीठावर आरोहण । तूंच सर्वथा अससी योग्य । सर्वज्ञ म्हणूनि सर्वा मान्य । राहशील चिरंतन ” ॥४१॥नम्रपणे आदिशंकर । चढले सर्वज्ञ पीठावर । लोक करिती जयजयकार । वार्ता पसरे सर्वत्र ॥४२॥चारी दिशांच्या तीर्थयात्रा । संपन्न होई धर्मयात्रा । वैभव, आदर, वेदमंत्रा । लाभे आसेतूहिमाचल ॥४३॥आचार्यांचे अखंड भ्रमण । पंथोपपंथांचे मार्तंड शरण । वाद संपता धरिती चरण । प्रचारक होती वैदिकधर्माचे ॥४४॥जगन्नाथपुरीस गोवर्धन मठ । द्वारकेस कालिका पीठ । चार दिशांस चार मठ । चिदंबरक्षेत्री नटराज मंदीर ॥४५॥चालाए कार्य शतकानुशतके । म्हणोन व्यवस्था विचारपूर्वक । ग्रंथरचना जाणीवपूर्वक । ‘ मठाम्नायसेतू ’ नामक ॥४६॥जाणीव होती अल्पायुषाची । शिदोरी संपत आली बत्तीस वर्षांची । आता तयारी महासमाधीची । हवी कराया सत्वर ॥४७॥आचार्य राहू लागले मौन । कुणासही पडेना तेणे चैन । राजेश्वर सांगे विनवून । कांचीस चलावे आता आपण ॥४८॥आचार्यांचा मिळता होकार । राजशेखराच्या मनी विचार । आचार्यांनी चढावे सर्वज्ञ पीठावर । महोत्सव व्हावा कांचीस ॥४९॥शंकराचार्यांचे सर्वज्ञत्व । सिद्ध झाले जे काश्मीरांत । नोंदले राहावे इतिहासात । म्हणून स्थापावे कांचीत ॥५०॥सर्व भक्त आणि शिष्य । राजशेखरासी पूर्ण सहमत । आपापले सांगती मनोगत । कैसे असावे सर्वज्ञपीठ ॥५१॥ज्येष्ठ शिष्य सुरेश्वराचार्य । त्यांचा सल्ला मागे राजशेखर । जाणतां आचार्यांचे विचार । मिळेल कां त्यांचा होकार ॥५२॥सांगती सुरेश्वर मनापासून । “ आचार्यांस साजेसे सिंहासन । घ्यावेस तूं बनवून । होकार मिळविणे आमचे काम ॥५३॥काश्मीरांतील शारदा पीठ । सर्वांना करुन पराभूत । आचार्यांनी केले पादाक्रांत । त्याचीच करु पुनरावृत्ति ॥५४॥चढण्या सर्वज्ञ पीठावर । बनवल्या पायर्या चौर्याण्णव । त्यांचे सांगतो विवरण । सर्वांनी घ्यावे समजावून ॥५५॥चौसष्ट कलांच्या चौसष्ट । चौदा विद्यांस्तव चौदा पायर्या । षड्शास्त्राच्या सहा पायर्या । षडंग वेदांच्या आणि दहा ॥५६॥त्यावरी राजा हवे तैसे । सिंहासन रत्नजडित सोन्याचे । ठरेल वैभव तुच्छ साचे । श्रीमत् शंकराचार्यांपुढे ॥५७॥आचार्यांसह शास्त्रार्थ वाद । अजून करणे असेल कोणास । पंथोपपंथींच्या पंडितांस । आमंत्रित करावे कांचीस ॥५८॥वादसभेच्या अखेरीस । जो कोणी सर्वज्ञ ठरेल । तोच कांची पीठावर चढेल । सर्वांच्या सम्मती साक्षीने ॥५९॥आचार्य हे करतील मान्य । सत्तावैभवाचा जरी ना लोभ । वेदान्तप्रतिष्ठेचा परी लोभ । सांग कैसा सोडवेल ॥६०॥तेच त्यांच्या जीवनाचे ध्येय । त्यासाठी होते कष्ट अनिवार्य । तैसे पीठारुढत्वही अपरिहार्य । सांगू आम्ही आग्रहानें ॥६१॥चार दिशांत चार मठ । शिष्यांसाठी केले प्रतिष्ठित । आम्हां वाटते सदा खंत । नाही स्थापिले गुरुपीठ ” ॥६२॥सुरेश्वराचार्य झाले सद्गदित । अश्रू उभे नयनांत । शब्द अडकले कंठात । मौनेच संपले मनोगत ॥६३॥काय घडले भविष्यात । योजनेस मिळे कां होकार । झाले कां आरुढ पीठावर । जाणावे पुढील अध्यायी ॥६४॥इति श्री आदि शंकर लीलामृत । बावीसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । पूर्ण होवो ग्रंथ सार्थ ॥६५॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP