मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६४६ ते ६५०

पदसंग्रह - पदे ६४६ ते ६५०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६४६. [राग काफी.]
मनीं भरला रंग झाला विठ्ठलसंग रे ॥ध्रु०॥
एकचि तंतू सोहं स्मरणाचा वाजतो जैसा चंग रे ॥ मनीं० ॥१॥
चिन्मयमूर्ति परात्पर आहे पाहुनि झालों मनीं दंग रे ॥ मनीं० ॥२॥
रंगातीत निजरंगीं रंगला जाहालासे भवभयभंग रे ॥ मनीं० ॥३॥

पद ६४७.
अवघा तूंचि हरी तूंचि हरी ॥ तूं जीवन मी लहरी ॥ध्रु०॥
जननी जनक तूं बंधू ॥ सखा जिवलग करुणासिंधू ॥१॥
सद्विद्या निजधन तूं ॥ देउनि तोडिसि भवबंधन तूं ॥२॥
निजरंगा तूं पाहीं ॥ अवघा तूंचि तुं मी नाहीं ॥३॥

पद ६४८.
मुळींच ते नाहीं ते नाहीं ॥ अनादि सिद्ध मी पाहीं ॥ध्रु०॥
माया साच असावि ॥ तरि म्यां विवेकें उगवावी ॥१॥
भवरोगीच असावें ॥ तरि म्यां रामरसायन ध्यावें ॥२॥
निजरंगीं रंगेला ॥ आपुले उगमीं संगम झाला ॥३॥

पद ६४९.
गुरुपदीं जडलों मी जडलों मी ॥ द्वैतभया सुटलों मी ॥ध्रु०॥
जें जें भासे द्दष्टी ॥ तें तें ब्रह्मचि वेष्टि समेष्टी ॥१॥
व्यतिरेकान्वय दोनी ॥ मजमीवांचुनि नाहीं कोणी ॥२॥
गुरुमय झालों आतां ॥ अभंग रंगां मिनलों स्मरतां ॥३॥

पद ६५०. [चाल-बोलणें फोल झालें.]
एक मीच प्रियकर ज्याला ॥ माझें हो आयुष्य त्याला ॥ध्रु०॥
कृष्ण म्हणे अर्जूनातें ॥ माझें मद्भक्तांसीं नातें ॥
जैसा मत्स्य जळीं जिवनातें ॥ जीवे भावेंन विसंबे ॥१॥
मजवेगळें आन कांहीं ॥ त्रिभुवनीं जयासि उरलं नाहीं ॥
त्याविण मज लवपळ पाहीं ॥ उदास हीं ब्रह्मांडें ॥२॥
इंद्रपदींचे उपभोग ॥ त्याचे द्दष्टीतें क्षयरोग ॥
माझे स्वरुपीं अखंड योग ॥ वियोग नाहीं मज त्यासी ॥३॥
ऋद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ द्वारीं वोळंगति कामारी ॥
देखुनि वांतीचियेपरी ॥ अखंडतर हरि गुरुभजनीं ॥४॥
काया वाचा मनें चित्तें ॥ अनन्य भावें भजती मातें ॥
त्यांचे सर्वहि मीं अच्युतें ॥ योगक्षेम वाहावे ॥५॥
विश्वात्म्याचे आत्मे झाले ॥ पूर्णनिजानंदिं रंगले ॥
त्यांसि म्हणती मेले गेले ॥ ते भ्रांतिचे शिरोमणी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP