मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४४६ ते ४५०

पदसंग्रह - पदे ४४६ ते ४५०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४४६.
धांवें पावें निजमूर्ति रामाई कां वो उशीर लाविला ॥ कोठें गुंतलीस वेल्हाळे कैसा विसर पडिला ॥ध्रु०॥
अभिमान वैरी हा जाचितो कांहीं केल्या नवजे ॥ तुजवीण कोण सोडवि सांगें तूं महाराजे ॥१॥
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार वैरी ॥ नेउनि घालूं पाहाती या भवसागरीं ॥२॥
आशा ममता कल्पना तृष्णा मगरी जाणा ॥ मुख पसरुनि धांवती तुज नये करुणा ॥३॥
चिंता हे शफरी अति दीर्घ घेऊं नेदी उमस ॥ ममता पिसारे मारिति कवण निवारी ईस ॥४॥
मोह भुजंगें धांउनि गळां घातली मिठी ॥ पुढें कांहीं मज न स्मेर कळ लागली मोठी ॥५॥
लोभावर्तीं पडियलों मार्ग न दिसे कांहीं ॥ सत्वर येउनि काढीं वो वेगीं हात तूं देईं ॥६॥
ऐसें करुणेचें उत्तर ऐकुनि निजमूर्ती पावली ॥ माथां कृपाकर ठेवुनि नाभी नाभी बोलली ॥७॥
पावली सद्नुरु माउली घाली ब्रह्मसुकाळीं ॥ध्रु०॥
ते वेळें सावध करुनि म्हणे होई सुचित ॥ महा वाक्य कानीं सांगोनि केलें ब्रह्मस्वतंत्र ॥८॥
मग जें जें पाहे तें तें स्वरूप दुजें न दिसे कांहीं ॥ मिथ्या प्रपंच मृगजळ निजरामचि पाहीं ॥९॥
सुवर्णीं अलंकार वस्तुता मुळीं नाहींच झाला ॥ रंगीं निजानंद निश्वय वेदे न बोलोनि केला ॥१०॥

पद ४४७. [चाल-सखया रामा विश्रामा०]
नाहीं मागत संपत्ती धनें तूज ॥ एक वेळ भेटि दे रामा मज ॥ध्रु०॥
धांवें पावें राघवा निजमूर्ती ॥ माझें अंतर सांगों मी कवणाप्रती ॥
आतां येऊं कोणासि काकूळती ॥ मायबाप तूं माझा निजमूर्ती ॥१॥
मागें बहुतां भक्तांसी पावलासी ॥ उडी घालोनि सोडविलें गजेंद्रासी ॥
वसनें हरितां रक्षिलें द्रौपदीसी ॥ तैसा मज पावें भेटी दे अनाथासी ॥२॥
अति संकटीं रक्षिलें प्रर्‍हादास ॥ अंबरिषाचे सोसिले गर्भवास ॥
लाक्षाजोहरीं रक्षिलें पांडवांस ॥ तैसा मज पावें भेटी दे अनाथास ॥३॥
गर्भीं रक्षिला सद्भक्त परिक्षीती ॥ गोकुळ रक्षिलें गोवर्धन घेउनि हातीं ॥
पार्थालागीं लपविला त्वां गभस्ती ॥ तैसा पावें भेटी दे मजप्रती ॥४॥
भक्तवत्सला ऐसीं हीं तुझीं ब्रीदें ॥ तरी त्वां आतां पावावें निजानंदें ॥
भेटी देउनी आलिंगी पूर्ण बोधें ॥ पदीं रंगवीं मागतों निजानंदें ॥५॥

पद ४४८.
दिक्‌पाळक नभधरणी ॥ जळनिधितरणी ॥ समग्र नभभरणी ॥
सप्तावरणी करणी ॥ चाळकपाळक हरि सर्वाभरणीं ॥१॥
सच्चिन्मय सुखराशी भेद त्रयासी ॥ विरहित अविनाशी ॥
सज्जनजन ह्रत्कोशीं चिंतिति ज्यासी ॥ दिननिशीं मंगळघोषीं ॥२॥
पदशाश्वत जैं व्हावें ॥ तरि सद्भावें गुरुपद वळवावें ॥
अहंममत्व त्यजावें विण मींपण (-) निजरंगें रंगावें ॥३॥

पद ४४९. [चाल-सखया रामा विश्रांति]
आर्ते आरती उजळूं सद्नुरुपायीं ॥ तनु मन धन वोंबाळुनि सांडिन ल वलाहीं ॥ध्रु०॥
गुरुस्नानें चिद्नंगा पावन झाली ॥ सहजासनीं शुद्ध शोभे गुरु माउली ॥१॥
निजांगीं सुवास तेचि वास अर्पिलें ॥ सर्वांगीं सुवर्ण गुरुरुपें शोभलें ॥२॥
काष्ठत्व दाहकत्व जाळुनि शांती विभूति ॥ चर्चूनि सर्वांगीं सहज शोभे निजमूर्ति ॥३॥
द्वैताचि संधि सरली ते संध्या पूर्ण ॥ त्रिकाळ गणना बुडुनि सहज साधलें मौन ॥४॥
सत्पात्रीं निजजीवनीं जीवन चरण क्षालन ॥५॥
वो रंग ना रंग तेचि अक्षयीं अक्षता ॥ अनुसंधान सुमनमाळा गळां अखंडिता ॥६॥
बह्माग्नी दशेंद्रियें दशांग जाळुनि पाहीं ॥ दशेंद्रियातीत सुवास ठायिंच्या ठायीं ॥७॥
ऐक्यत्वें एकारती ऐक्यें सहज उजळली ॥ द्वैतपणा बोळवण न करितां झाली ॥८॥
नवविधा नैवेद्य भाव माझा अर्पण ॥ निरांजनीं निरंजन गुरुराज संपूर्ण ॥९॥
निजानंदें पूजाविधि संपूर्ण झाला ॥ सकर्पूर तांबुल मुखीं सुरंग रंगला ॥१०॥
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सुवर्ण दक्षिणा ॥ आब्रह्मस्तंभ अवघा सद्नुरुराणा ॥११॥
नामघोषें मंत्रपुष्पें सुमन अर्पिलें ॥ हेतूविरहित लोटांगण चरणीं घातलें ॥१२॥
निजीं निज निजानंद निजरूप पाहीं ॥ शेष घेउनि रंगीं  रंग रंगला पायीं ॥१३॥

पद ४५०. [कवण तुम्ही कवणाचे या चालीवर]
भाव लागला निजरामीं ॥ मन हें अखंड नामीं ॥ध्रु०॥
श्रीराम जय राम जयजय राम हें अक्षर ॥ माझें जिव्हेवरी ऐसें लिहिलें निरंतर ॥
जाळीत नाना वृत्ती केला अविद्येसी मार ॥ निजबोधें अंतरीं रिघतां पळे अहंकार ॥१॥
भजनापरतें सार आणिक नाहीं तरिजे ऐसें ॥ म्हणवुनि मन हें भजनीं भावें लावावें सायासें ॥
भवनदि तरावया उपाय यापरता न दिसे ॥ निजानंदीं मन हें धाल्या रंगपणहि नसे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP