मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४१ ते ४५

पदसंग्रह - पदे ४१ ते ४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४१.
स्वरूपीं संत झाले वो स्वरूपीं संत झाले ॥ संत झाले ह्मणुनि संत ह्मणावे या लक्षणें जे युक्त ॥
जगदोद्धारी पतीतपावन मूर्तिमंत सगुण ब्रह्म जीवन्मुक्त ॥धृ०॥
अतिशयेंसि मन चंचळ पळभरी स्थीर न राहे एके ठायीं ॥ नाना कल्पना संकल्प विकल्प करुनियां पाडी अपायीं ।
ऐसें दुर्निवार दुर्जय दुस्तर तें मन सदुरुपायीं ॥ ठेवोनियां निजानंदघन झाले याचि डोळां याचि देहीं ॥१॥
अनित्य भाग आसुरि संपत्ति इंघन पडिलें ज्ञानाग्नीआंत ॥ सोहमस्मि बोधाग्नि धडाडिला तेणें झालें सर्व हुत ॥
अग्नि शांत होउनि विझोनि जाय उरलें भस्म ते संत ॥ विभूतीचें चर्चन पुण्यपावन सर्वांगें शीतळ होत ॥२॥
मानापमानी लाभालाभीं त्यांचा हर्षामर्ष तोचि विषेप ॥ ऐशा आहुतीचीं अवदानें होमितां नुपजेचि तेथें संताप ॥
रक्षा झाली हेही भावना निमाली उरला प्रारब्धाचा जल्प ॥ सहज पूर्ण निजरंगिं रंगले संत माझे मायबाप ॥३॥

पद ४२.
माझें कोंपट काय झालें ॥ ऐसा कोण कैंचा आला होता कायू तेणें उडवुनियां नेलें ॥धृ०॥
पांच तुळवट पंचवीस वांसे त्रिगुण गुणाच्या मेडी ॥ चित्त चतुष्टय चारी भिंती त्या केल्या होत्या कडोविकडीं ॥
संचित क्रियमाण भूमिका समान प्रारब्धाची घडमोडी ॥ ऐसें होतें माझें तृण झोंपडें त्याची उरली नाहीं एक काडी ॥१॥
सुवर्णाचें सर्व अक्षयीं अपूर्व रत्नखचित जेथें तेथें ॥ दिव्य दामोदर सायुज्यमंदिर सुंदर कैंचें येथें ॥
एकाहुनि एक वाटतें आगळिक चोज केलें कृष्णनाथें ॥ विस्मित होउनि भीतरीं प्रवेशला सुदामा महाद्वारपंथें ॥२॥
चहूंकडे चार्‍ही पुरुषार्थ मंडप निजतेजें झळकती पूर्ण ॥ कैवल्य डोल्हारा सद्वृत्ति सुंदरा शोभली सुवर्ण वर्ण ॥
अवलोकितां पती उजळोनि आरती धांवुनि धरियले चरण ॥ वोवाळितां निजानंद रंगला हरलें जन्म जरा मरण ॥३॥

पद ४३. चाल - उद्धवा शांतवन कर जा. (वैद्य)
सद्नुरु सद्वैद्याची घे पूर्ण मात्रा वेगीं ॥धृ०॥
कां रे तुजला ही गोष्टि सुचेना; अणुमात्र कांहीं रसने; नामामृत तेंहि रुचेना ॥
भवरोगें तापत्रय ज्वर पाहीं; संतप्त सवंदांहो; नैराश्य पथ्य पचेना ॥१॥
झालें अहंममता कुपथ्य ह्रदयीं; तूं उपाय पुससी तरि हा; अनुताप ढाळ घेईं ॥
आसुरी गुण मळ हे झडतिल तेणें; शुद्ध सत्व अंत:करणें; नित्यानित्य विचारीं ॥२॥
वर्णाश्रमधर्मीं विहिताचरणें; अनुपान याचें सत्संगयोगें; शास्त्रश्रवणें ॥
ज्ञानाभिमान तोचि हारे; पाचाव होइल पाहारे एकांत सेवुनि राही ॥३॥
संकल्प - सन्निपातें भलतें बरळसी मिथ्या मी मी ह्मणतोसी या देहातें ॥
नयनीं गुरुकृपा अंजन लेईं; आरोग्य सत्वर होईं; मी ब्रह्मावबोध कषायीं ॥४॥
आतां सहसा तूं काम्यनिषेधें वावडें वर्जित स्नेह सोडुनि देईं विविध ॥
अभंगरंगें सहजिं सहज; अखंडनिजीं नीज; घेउनियां नवविध चूर्ण ॥५॥

पद ४४. (गारुडी)
श्रीगुरु गारुडिया तूं येई रे दीनदयाळा ॥धृ०॥
भवसर्पे दर्पे दंशुनि पाही भुलविलें मजला विषय विषलहरी येती देहीं ॥
मी कोण काय करितों ऐसें स्मरणही गेलें कैसें प्रज्वळिल्या अग्निज्वाळा ॥१॥
परमामृत विषवत्‌ लागे मजला सेवितां रसने संसार कटुतर मधुरस गमला ॥
सत्संग शीतळ उष्ण वाटे तृष्णा झेंडू दाटे सर्वदां कंठनाळीं ॥२॥
तरि तूं सत्वनळें सत्वर मातें निर्विष करिं आतां निज तेजें अंधतमातें ॥
प्रकृतिचा पल्लवहि न लागावा श्रीहरि जागर गावा ममता स्नेह हरुनी ॥३॥
सर्वांगीं भरलें हें विष उतरीं आब्रह्मस्तंभ नि:संशय समुळीं निवारीं ॥
नि:संगा निजरंगा श्रुतिसारा निर्गुणा निर्विकारा करुणाकर बीद नुपेक्षीं ॥४॥

पद ४५. (पंचाक्षरी)
देशिकराणा आणा पंचाक्षरी ॥ परब्रह्ममूर्ति माझा कैवारी ॥धृ०॥
महा पंचभुतांचच्या सांपडलों मेळीं ॥ पांचांची पंचविस झालीं ते काळीं ॥
अहंकार येथें वेताळ महा बळी ॥ येणें मजला पाडिलें भवजाळीं ॥१॥
कल्पना मुख्य मूळमाया जननी ॥ आशा तृष्णा या दोघी यक्षिणी ॥
यांची मजला होतां वो झडपणी ॥ विसरलें आप आपणालागुनी ॥२॥
कामादि साही झोटिंग दारुण ॥ यांनीं मजला छळियलें संपूर्ण ॥
मोह महिषासुर येउनी आपण ॥ मनबुद्धिसहित मोहिलें अंत:करण ॥३॥
रगद्वेष मुंजे हे दुर्धर ॥ अश्वत्थवृक्षीं वसती निरंतर ॥
लागले माझे पाठीसीं निष्ठुर ॥ यांनीं एवढा वाढविला संसार ॥४॥
श्रीगुरुनें करुणावचन ऐकुनी ॥ अभय हस्त मस्तकीं ठेवुनी ॥
महावाक्य मंत्न श्रवणीं सांगुनी ॥ स्वरूपीं सावध केलें वो साजणी ॥५॥
सहज पूर्ण निजरंग रंगला ॥ तेव्हां भवभ्रम हा भंगला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP