मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५५६ ते ५६०

पदसंग्रह - पदे ५५६ ते ५६०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५५६.
घेतलें रे या षड्‌वर्गीं देहदुर्ग ईक्षणमात्रें ॥ध्रु०॥
शिस्नेंद्रियद्वारीं काम राहे ॥ निर्वाण योद्धा तिळतुल्यहि विहिताविहित न पाहे ॥
न ह्मणे आपपर हें अणुहि प्रमाणें । मारितां कटाक्षबाणें ॥ सर्वांगीं भेदला रे ॥१॥
नेत्रीं राहिला क्रोध सदांही ॥ घातली पाही न विचारी सारासार कदांही ॥
वधिली रेणुका-शांति-विवेकी ॥ दुर्निवार हा तिहीं लोकीं ॥ बुडविले थोर थोर ॥२॥
पाहा हो बैसला दुर्मद माने ॥ वरि ताठा चढला न लवे विधिचेंहि ज्ञान न माने ॥
ह्रदयीं मत्सरें वस्ती केली ॥ परमार्थीं घाला घाली ॥ परदोषदर्शन रेखे ॥३॥
सर्वांगीं दंभ त्वचेवरि भरला ॥ वरी वरी अवलोकीं नेणो दशदिशा भरूनि उरला ॥
अहंकार बैसला याचे ॥ मीपणें गर्वें नाचे ॥ देहाभिमानी मोठा ॥४॥
ऐसीं अवरोधुनी साही अंगें या षड्‌वैर्‍यांनीं दैवी संपदा हरिली वेगें ॥
यांतें निर्दाळिल गुरु निजरंग ॥ तरिच हा सांगोपांग ॥ भयभंग होइल याचा ॥५॥

पद ५५७.
गोवर्धनधारी आला आला वो दीनबंधू ॥ध्रु०॥
ह्रदयीं रुक्मिणी चरण धरुनी ॥ संवाहन करितां उठिला पीतांबर सांवरुनी ॥
गरुडा मनपवना टाकनि मागें ॥ धांवला लागवेगें ॥ भक्तकामकल्पद्रुम तो ॥१॥
गगनीं झळकला पीतांबर सये ॥ स्वप्रकाश घन तो वोळी बोलतां नये नये ॥
तेजोमय मंडित आयुधें चारी ॥ श्रीरंग चतुर्भुज शौरी ॥ मनमोहन मदनजनक तो ॥२॥
श्रवणीं कुंडलें तळपति दोन्ही ॥ हरिवदनसरोजीं भ्रमतां स्थिर झाले रविशशि नयनीं ॥
मिरवे कस्तुरीतिलक ललाटीं ॥ शुकचंचु नाशिक निकटी ॥ वसविलें सदन वसंतें ॥३॥
दिव्य शोभला मुकुट ललामीं ॥ फांकली प्रभा पाहतां दशदिशा अंतर्यामीं ॥
देखे अवचीता नवल करी डोळां ॥ सुमती द्रौपदि बाळा ॥ हरिचरणीं सु-मन समर्पी ॥४॥
मिळणी मिळतां भवसंकट नाशी ॥ हरि करुणार्णव तो झाली मती समरस सरिता जैसी ॥
रंगीं रंगली निजानंदें ॥ क्रीडतां निजसुखछंदें ॥ स्वस्वरुपीं निश्वळ राहे ॥५॥

पद ५५८.
तो तूं विसरसि कैसा मजला श्रीरंगा रे ॥ध्रु०॥
जेणें त्वां येणें पशु गजेंद्रासाठीं रे ॥ तेथेंहि नक्रासह त्या नेलें वैकुंठीं रे ॥
युद्धीं भारतीं पक्षां घंटेंत संरक्षी ॥ करुणेचा सिंधू रे ॥१॥
धर्मयागीं मंडुकबाळ सानुलें रे ॥ होता कढईंत उदक उष्ण जाणवलें रे ॥
ह्मणतां तें कृष्ण कृष्ण जळ न करुनियां उष्ण ॥ हरिला प्रबंध रे ॥२॥
दोघं स्त्रीपूरुषें पक्षी कपोत वृक्षीं रे ॥ वरि श्येन फिरतां व्याधबाणीं गुण लक्षी रे ॥
निजबाणें श्येन निमाला ॥ अहिदशें तोहि मेला ॥ पक्षी वांचविले रे ॥३॥
व्याधें कोंडिला मृग वधुबाळेंसह वनीं रे ॥ स्मरतां तुज तेव्हां पाश जाळितो वन्ही रे ॥
शशकापाठीं श्वानें नेलीं ॥ अवकाळीं वृष्टी केली ॥ अनाथबंधू रे ॥४॥
ऐसा शरणागत प्रतिपाळक तूं निजरंगा रे ॥ सच्चित्सुखसारा निर्विकारा नि:संगा रे ॥
मागें बहु तरले पापी ॥ तरती पाहूं अद्यापी ॥ ज्याच्या नामें रे ॥५॥

पद ५५९.
इंदिरावर हरी आणा मंदिरा यादवराणा ॥ध्रु०॥
सुमति राधिका मदगजगमना ॥ सखियांसी बोले विरहें लक्षितसे कैठभदमना ॥
वेगीं घेउनियां नव घननीळा ॥ साजणी गोकुळपाळा ॥ प्राणाच्या जिवलग प्राणा ॥१॥
वैराग्य वसंत माधव मासीं ॥ तापलें तापें असतां सोज्वळ मन चंद्रप्रकाशीं ॥
नाना उपचारें तनु संतप्त ॥ करणार्थीं चित्त विरक्त ॥ जाणवा वृत्त सुजाणा ॥२॥
हरीबांचुनि वांचुनि काय काम ॥ श्रम सर्व निरर्थक प्राणेंविण जैसा इंद्रियग्राम ॥
ऐसें बोलतां तव निजशेजे ॥ श्रीरंग सहज विराजे ॥ जो अगम्य निगम पुराणा ॥३॥
स्वस्वरूपीं ऐक्य बोधें बोधली सुमती बाळा ॥ध्रु०॥

पद ५६०.
रातली मती परपुरुषीं ॥ मातली स्वात्म विलासीं ॥ध्रु०॥
झाली नि:शंक निर्भय चित्तीं ॥ अच्युतानंतीं रमतां लक्षुनि मति सज्जन संतीं ॥
अनुमोदन देउनि ते उफराटी ॥ धाडिली अनंत कोटी ॥ ब्रह्मांडनायक शेजे ॥१॥
शेजे अनुभविला आत्माराम ॥ अवाप्तकाम करुनि घेतला मुनिविश्राम ॥
समूळीं बुडविले धर्माधर्म ॥ उडविलें स्वरुप नाम ॥ लौकिक लज्जा त्यजुनी ॥२॥
पहिल्या पतिलागीं अनावर झाली ॥ देह अहंकारा न गणी; परपुरुषीं जडोनि ठेली ॥
रंगीं रंगली पूर्ण रंगीं ॥ शोभली नित्य निजांगीं ॥ भोगुनियां स्वात्मसुखातें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP