मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३०६ ते ३१०

पदसंग्रह - पदे ३०६ ते ३१०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३०६. (चा. सदर.)
आतां चोज सांगों काय कैसा हरविला डाय रे ॥ बुडविली नौका पालवीं नावाडा गुरुराय रे ॥धृ०॥
लटिकें लटिकें होय तयाचा शोक तुज कां लागे रे ॥ साचपणें तुजमाजीं विलासे तेथ मन न जागे रे ॥१॥
शुक नळिकेसा पडला त्यातें काय किजे कोणे रे ॥ फिरतसे दश दिशा मृग नाभींचा सुवास नेणें रे ॥२॥
या खुणा जाण सुजाणा तये लक्षण उमाणु रे ॥ निजानंद तो मुळिंचा रंग दुजा कोठुनि आणूं रे ॥३॥

पद ३०७. (चा. सदर.)
बोलि फळ ते काय खोली विचार करूनि पाहीं रे ॥ अमृत म्हणतां अमर होइजे स्वप्नींहि न साह रे ॥धृ०॥
लटिकें म्हणती परि लटिकें त्याला ठाउक जाहलें नाहीं रे ॥ लटिकींयाचा शोक विराला त्यासिच कळलें पाहीं रे ॥१॥
स्वप्नींचा प्रतिभास लटिका जागृतिसी होय रे ॥ तैशी द्दश्य पदार्थीं मिथ्या प्रतिती तरि निज सोय रे ॥२॥
आत्मविलासीं राहे महिमा वर्णी कोण वाचे रे ॥ संगविना निज रंग तयाशींच निजानंद सुख साजे रे ॥३॥

पद ३०८. (चा. सदर.)
सादर परिसा माय वो सुंदर गुरुचे पाय वो ॥ निववीलें सर्वांगें मीं उतराई होऊं काय हो ॥धृ०॥
घेतां याचें नाम वो नि:शेष गेला शीण वो ॥ न बोलवे मज बोलें अनुभविये जाणति खूण वो ॥१॥
सिद्धि गेलें काज माझें सरलि लोकलाज वो ॥ सहजसमाधीयोगें सखिये हातां आलें नीज वो ॥२॥
बोधिं भेद निमाला सरला भावाभावसंग वो ॥ निजानंदभुवनीं जाहला मतिविण वृत्तिक रंग वो ॥३॥

पद ३०९. (चा. सदर.)
औट हात ह्मणवितसें तो मी ब्रह्मांडीं न माय वो ॥ केलें या गुरुरायें विपरित विपरित सांगों काय वो ॥धृ०॥
अस्ति भाति प्रिय रुप या बोधें जग हें द्दष्टिसि नाणी वो ॥ वारंवार तनु हे वागे तव मी गुरु नाम वाखाणी वो ॥१॥
नेति नेति या द्दश्य विभागीं अधिष्ठाना आलें वो ॥ मुळिंचें सुखरूप माझें या निज विर्वाहींच ठेलें वो ॥२॥
शोधनक्रम श्रुतिसार सिद्धिपद अनिर्वाच्य साजे वो ॥ रंगींल ये मीं निजानंद-पद साम्राज्य वीराजें वो ॥३॥

पद ३१०. (बाळा जु जु जू० या चा.)
विचित्र लाघवि हा गुरुराणा ॥ अगम्य वेदपुराणा ॥धृ०॥
पल्लव सारियला मस्तकींचा ॥ रमणीय हा हस्तकींचा ॥१॥
निर्णय कर्णपुटीं मज बोले ॥ तें गुज वर्णित शिव डोले ॥२॥
लाऊनि पदभजनीं निज गोडी ॥ ह्रदयग्रंथी सोडी ॥३॥
अलक्ष लक्षें नाम जपकर्णी ॥ कोटि लोपले तरणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP