पदे ६१६ ते ६२०
पद ६१६.
सावध होईं वेगीं तूं मना ॥ सांडीं दु खरूप कामना ॥ध्रु०॥
मनुजा मी माझें मानितोसी साच रे ॥ परि हें मृगजळ आहाच रे ॥
गुंतुनीयां विषयभोगीं रातला करिती यमदूत त्या जाचे रे ॥१॥
पाहतां सर्वही संसार हा क्षणिक रे ॥ वायां वाढविसी शोक रे ॥
अंतीं तुझीं तुज होती पारखीं सेखीं भोगविती नरक रे ॥२॥
अझुनि सांडीं मायामोहसंग ॥ सेवीं स्वसुख अभंग रे ॥
मिथ्या स्वप्नवत् सर्व मानुनि पूर्ण निजानंदें रंग रे ॥३॥
पद ६१७.
अंतरीं ध्यावा श्रीहरि सप्रेमें गावा ॥ध्रु०॥
दोषदहन करी नाम जपावें तो हरि नयनीं पाहावा ॥१॥
नवविध भजन निरंतर तत्पर प्राणप्रिय हरि व्हावा ॥२॥
श्रवण मनन निजध्यास विचारें गुरुमुखें उमजावा ॥३॥
दैवी संपति यजुनि प्रयत्नें ॥ आसुरी समूह त्यजावा ॥४॥
सत्संगें निजरंगप्रभावें ॥ दूरि करुनि देहभावा ॥५॥
पद ६१८.
संकट वारिल हा श्रीहरी ॥ध्रु०॥
संकट वारिल षड्रिपु मारील ॥ भवनिधि तारील हा ॥१॥
पतित मी परि पावन श्रीहरि ॥ पूर्ण स्विकारील हा ॥२॥
निजराज्यपदीं मज बैसवुनि वरि ॥ छत्र उभारील हा ॥३॥
हा निजरंग नि:संग निरामय ॥ चिद्रस चारील हा ॥४॥
पद ६१९.
माझा कैवारी हरि तूं ॥ध्रु०॥
भक्तकामकल्पद्रुम ऐसें गर्जति अठरा चारी ॥ अष्टदिशा तुजविण मज उद्वस कोण संकटीं तारी ॥१॥
जीवन जळ सकळांचे परि तो मीन जसा अवधारी ॥ दधि मधु पय घृत मानुनी तृणवत् उदकीं होय विहारी ॥२॥
तापत्रयसंतापें तापें छळिलों या संसारीं ॥ ह्रदयीं रंग पूर्ण निजानंदें तूं झडकरी ॥३॥
पद ६२०. [काशीबाअण्णा कृत.]
शिव शिव शिव शिव आतां मी ऐसें न करीं न करीं ॥ध्रु०॥
पुनरपि जन्म जरा मरणें ॥ पुनरपि जननीजठरों भरणें ॥
पुनरपि नानारूपें धरणें ॥ करणें दुष्कर्मावारी ॥१॥
अतर्बाह्म एक रूप ॥ तेंही नाहीं अल्पस्वल्प ॥
अवघा संकल्प विकल्प ॥ मिथ्या वाद चावुटी ॥२॥
नाहीं विरक्तीचा लेश ॥ मिथ्या मिरवी ब्राह्म वेष ॥
विषय भोगितां संतोष ॥ राग द्वेष अंतरीं ॥३॥
टाकुनि स्वात्मसुखामृतसिंधू ॥ सेवी विषयाचा विषबिंदु ॥
आत्मघातकी मतिमंदु ॥ जड मूढ प्राणी ससारी ॥४॥
याचें गुणदोषदर्शन ॥ होंतां षश्वात्ताप जाण ॥
श्रीरंगानुजात्मज पूर्ण ॥ निजानंदें रंगला ॥५॥
Translation - भाषांतर
N/A