मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २६१ ते २६५

पदसंग्रह - पदे २६१ ते २६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २६१. (चाल-(भक्तांसि भगवद्भ०)
साजणी गे लिहिलें भाळीं अक्षर तें कोण टाळी ॥ वदती विधि हरि हर वाहुनि टाळी ॥धृ०॥
हाचि हा केला केला निश्वय वो न टळे माये ॥ पातकी गे गेला गेला संशय हा पुढती ॥
नये निरतीशय जाहला जाहला निज लाभ सांगों काय ॥ माझें दैवत श्रीगुरुचे पाय ॥१॥
साजणी गे आतां घन वो वर्षला पीयूषाचा ॥ साजणि गे आतां दिन वो सार्थक या आयुष्याचा ॥
साजणि गे ज्ञानसोहाळा डोळां देखिला भविष्याचा ॥ महिमा न वदवे या हर्षाचा ॥२॥
साजणी वो सत्कर्में ब्रह्मार्पण केलीं असती ॥ साजणी वो क्रम-योगें साधनें झालीं दिसती ॥
साजणि वो मानवि भावें पूजिले साधू नसती ॥ तरीच गुरुचरणीं घडली वसती ॥३॥
साजणि गे करणें उरलें नाहीं वो सरलें सरलें ॥ साजणि गे चित्सौख्याचें अक्षयी तारुं भरलें ॥
साजणि गे जाणिव सरली जाणणें मात्रचि उरलें ॥ श्रुतिंहिं उन्मन वो मौन धरिलें ॥४॥
साजणी गे आतां विचरों गिरिशिखरीं कीं गृहद्वारीं ॥ साजणि गे गेली भय लज्जा ममता चिंता दूरी ॥
साजणी गे निजानंदें रंगला सचराचरीं ॥ उरली बोलाया नाहीं उरी ॥५॥

पद २६२. (चाल-सदर)
राघवारे धावें पावें सत्वरा दीनबंधु ॥ मज तो न तरवे भवसिंधु ॥धृ०॥
राघवारे ममतायोगें चंचळ मी निजहित न कळे ॥ राघवारे विषयवियोगें व्याकुळ मन इंद्रियें विकळें ॥
राघवारे क्षयरोगें पारखी जाहलिं सकळें ॥ दुर्घट संसृति हे न टळे न टळे ॥१॥
राघवारे रजतमसंगें भ्रमतां दिनरजनी गेली ॥ राघवारे साधुसेवा जाणपणें नाहीं केली ॥
राघवारे विद्यावय-साधन मोहानें पडली भूली ॥ मति हे परदोषीं संयुक्त जहाली ॥२॥
राघवारे भाग्य विशेषें हिंसकहि उपमे नसरे ॥ राघवारे जपतप लेशें फळ आशा अहंमति पसरे ॥
राघवारे तनु-उद्देशें मन विधि शासनही विसरें ॥ स्वहिताचें पडलें मन उध्वस रे ॥३॥
राघवारे धन सुत दारा संसारा विटलों नाहीं ॥ राघवारे जगदुद्धारा मन वारा झालें पाहीं ॥
राघवारे व्यर्थ पसारा विश्रांती न दिसे कांहीं ॥ निकरें जाचिति हे वैरी साहीहि ॥४॥
राघावरे त्निभुवनपाळा सहसा मम दोष न लक्षीं ॥ राघवारे दुर्जय काळा निर्दाळुनि मज संरक्षीं ॥
राघावरे दीनदयाळा करुणाकर ब्रीद नुपेक्षीं ॥ चरणीं रंगवी तूं अंतरसाक्षी ॥५॥

पद २६३. (गोविंदा तूं राहि उ०)
चिद्भुवनीं योगिराज विराजतो ॥धृ०॥
चिन्मय छत्र विचित्र सुशोभित दैवी संपत्ति सेनाहो ॥
ईक्षणमात्रें शत्रुपराजय तदुपरि द्वैत दिसेनाहो ॥१॥
सारासारविचारपरा वितरागविरां सम्मानितो ॥
नित्यानंदपदीं मन उन्मन निगम पराक्रम वानितो ॥२॥
भक्त चकोर तया निज जीवन चिन्मयचंद्र अनुपम तो ॥
त्रिविध भेद विवर्जित तत्पदीं रंग अभंग सुखें रमतो ॥३॥


पद २६४. (चा. सदर.)
तारी श्रीराम सोयरा भवसागरीं ॥धृ०॥
वैभव तो परिवार सुखावह दावी भाव सदैव नरा ॥ अंतकाळिं यमकिंकर जाचिति सोडविता न दिसे दुसरा ॥१॥
दर्पणिचें धन कीं मृगजीवन इंद्रजालवत्‌ मानि बरा ॥ करुनि पान मोह-मदिरा अति उन्मत्त कां अविचार परा ॥२॥
सावध सावध पाहे बरा क्षणभंगुर किं तव देह खरा ॥ तारक एक गुरू निज रामपदांबुजीं रंग करूनि त्वरा ॥३॥

पद २६५.
करीं दया मजवरी श्रीगुरुराया ॥धृ०॥
गुणमयी वैष्णवी दुर्जय माया ॥ न तरवे मज करूं काय उपाया ॥१॥
थोर तापत्रयीं तापावलि काया ॥ कृपाकरें निववीं शीतळ छाया ॥२॥
भवभयत्राता निजसुखदाता ॥ चरणीं रंगवीं शरण आलों तव पाया ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP