मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - निरोप देतांना

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


जावई राजस नाही पाहयेलें डोळयानं । नेणंती मैना मव्हरं मोजली तोळयानं ॥
ईहिनी सवंदरी पाया पडते पटापटा ।
नेणंत्या मैनासाठी उचलला हलका वाटा ॥
बोलले इठ्ठल जनीले नाही कोणी ।
तुळसी बनात आग उकलती येनी ॥
माहूर गडावरी अनुसयाले परसराम तान्हा ।
मांडीवर घेऊन पाजे पान्हा ॥
मावलीची मया सर्व बाळावरी ।
केळीची सावली बत्तीस केळावरी ॥
नवस बोलले पाण्याले जाता जाता ।
देव मारवती पायरीशी उभा व्हता ॥
मांडीवर बाळ माता यशोदा पाह्यती ।
बाळाच्या मुखातून त्रिभूवनी देखती ॥
बोलली सुभद्रा नाव घ्या वहिणी ।
द्वारकेचा चक्रपाणी वरला म्या मनी ।
नको घालू देवा जन्मा झाडाझुडाचे पोटी ।
सुटलं वारं-वावधन जीवाले तसदी मोठी ॥
नको घालू देवा जन्मा सरपाचे पोटी ।
काटया-कुटयातून जाणं जीवा तसदी मोठी ॥
काळया वावरात सर्प चालला ताजा ताजा ।
नको मारू दादा सार्‍या पिरथमीचा राजा ॥

किंवा
जंगलाच्या पाखराची माय न मरावी ।
ह्याच्या चोचीत चारा कोण भरवी ॥
राजहंस पाखराची पाण्यामंधी मढी ।
कावळा बेईमान चोचीनं बंद तोडी ॥

किंवा
बैल गणेशाची मोठी चालजी चंचळ ।
जोंधळया राजाची झाली पेरणी पातळ ॥
आरुण्याच्या ठाई झुरतो मोर राया ।
साळूंक्या बाईनं पाय नेले त्याचे गावा जाया ॥
लाडकी मैना खेळायले गेली दूर । चाँद सूर्याची फडकी अंगावर ॥
भरल्या राजनात बाळ डव्हळतं पाय । मामी करे राग मामा कवतीकानं पाह्ये ॥

किंवा
राग मव्हा तव्हा इस्त्यावानी उतू गेला ।
नेणंत्या मह्या बाळानं शांत केला ॥
राघो मैनाचा पिंजरा मह्या घरी ।
राघो पाळण्यात मैनाचे हाती दोरी ॥
झाली सवसांज गाई आल्या गोठयामंधी ।
नेणंता राघो दुध मागे वाटी मंधी ॥

किंवा
लोकाच्या लेकराले कसं म्हणूनी कतवार ।
त्याच्यात उभा महा बाळ गं सकवार ॥
दंडी ग दंडवाळया नार हिणवती मले ।
चाल मह्या वाडया हिरे दाखवते तुले ॥
कोन पुसतं धनसंपत्ती मालाले ।
पुसती कन्या, पुत्र लालाले ॥
महादेवापुढे नंदी घागर माळाचा ।
धनसंपत्तीचा राजा याले नितांत बाळाचा ॥
लोकाचं लेकरु आलं तसं परतलं ।
पोटच्या बाळानं मनं मव्ह रिझवलं ॥
बोबडया बोलाची मले वाटते मौज ।
कोण्या गल्लीनं खेळती मही तेलंगी फौज ॥
बस्तीस धारांचा पान्हा पिले कोण्यारंग ।
काशिबैयानं मांडीचा केला चौरंग ॥
मायची माया सर्व बाळावरी ।
चिमणी घाले खोपा जाईचे कळीवरी ॥
खेळ खेळ बाळा अंगण भरून सावली ।
दारी त्रिगुन तुह्या आज्यानं लावली ॥
आईतवार दिवस बाई । गर्भ सामवला राती ।
जन्मले चिलेबाळ पाणी । देती हंडा भर ।
म्हणती चौरंगावर निजून । निजून देती पलंगावर ।
भरतार हौशीदार यानं । लावली, तुप-साखर ।
गेला पुण्याच्या बाजारी । जरी टोपरं घेऊन ।
साज घुंगराचे लावून । यानं केलं बाळलेणं ।
जडीताचं पिंपळपान । शनिवारी दिवस बाई ।
मोठा कष्टानं चांडाळ । कण कण तपलं बाळ ।
इल्हाळाचे शेजारणी । ह्या घरालोक येवं येवं ।
आडवं बाळ घेतं बाळ घेतं । नेत्र लावले बाळानं ।
उघडेना काही केल्यानं । पाणाची दुरडी ।
आणली बारणीनं । तेलाची घागर आणली तेलणीनं ।
मोराचं खेळणं आणलं झिलकरानं ।
चंदनाचा पाळणा आणला सुतारानं ।
करदोडयाचं मेज बाई नेला सोनारानं ।
वाजंत्री वाजेरे सुरत ताशाबाई ।
किल्हयाले देवू जावळं । जेजूरीच्या खंडेराया ।
नवस बाई तुले शेंडीचं नारळ ।
माहूरचे आंबाबाई सुखी ठेव माझं बाळ ।
गुण दिला अंबिकेना उघडले नेत्र बाळानं ।
पहिल्या दिवशी जन्मले बाळा ।
दोन्ही नेत्र झोपूनी डोळा ।
झाला भक्तीचा परतपाळ झु बाळा झू ।
दुसर्‍या दिवशी दुसरीचा रंग ।
नागीण पद्मीण झाल्या दंग ।
येडया गवळणी कृष्णाच्या संगं, झु
चौथ्या दिवशी चवथी तारीख ।
पाळणा बांधोनी यशोदा दारी ।
सतरा रंगाच्या बोलावल्या नारी ।
नाव ठेविले श्रीकृष्ण हरी । झु बाळा झू
पाचव्या दिवशी पाचवी पेरण ।
बाळ गेले देवांचे रन ।
सांडले मोती घ्यावे भरुन झु बाळा झू
सहाव्या दिवशी कलीचा वारा ।
पोटी जन्मला मोत्याचा हिरा ।
त्याच्या टोपीला मोत्याच्या तारा, झु बाळा झू
सातव्या दिवशी सातवा मान ।
चारी बाजुला चारीही लाल, झु बाळा झू
आठव्या दिवशी आठवीचा थाट ।
गौळण चालली पाण्याच्या वाटं ।
तिची हुकली मथुरा पेठ ।
नको जावू क्रिशनाच्या वाटं. झु बाळा झू
नवव्या दिवशी नवल बाळाचे
फुल उगवले वनी कमळाचे
प्रसुत झाली त्याच वेळेशी, झु बाळा झू
दहाव्या दिवशी उभी होती राधा ।
हाती घेऊन गोल चक्र गदा ।
इंद्रजिताच्या उडविल्या भुज्या, झु बाळा झू
गांधी महराज कोण्या माऊलीचा हिरा ।
उभारले झेंडे वर मोतीयाचा तुरा ॥
मारले गांधीबाबा रक्ता भरली कढई ।
काँग्रेस सरकारनं जितली लढाई ।
मारले गांधीबाबा दोन्ही सडका सोडून ।
पोलीसाच्या आल्या गाडया भरुन ।
निजास सरकारचं सैन्य झालं दानादिन ।
जितलं राज्य काँग्रेस पहिलवानानं ॥
निजाम सरकारचा झाला नास ।
जितलं राज्य कांग्रेस झाली पास ॥
मारले जगदेवराव रक्ता भरला हाऊद ।
पळाली वैर्‍याची फवूज ।
मारले जगदेवराव रक्ताभरली पायरी ।
बोलली ह्याची राणी जयदेवराव नाही कोणाचा वयरी ॥
मारीले जयदेवराव बातमी कोसोकोसी ।
ह्याच्या लढाईले मुसलमान किती?
मारला इंद्रजीत रक्ता भरली कढई ।
रावणाचे लंकेवर रामाने केली चढाई ॥
मारला इंद्रजीत रक्ता भरली पायरी ।
बोलली सीतामाई बरा मारला वयरी ॥
रामाचं सैन्य म्हणती मारा मारा ।
रावणाचा भाऊ कुंभकर्ण जागी करा ॥
वानराच्या लंकेला पल्डा येढा ।
बोलली मंदोदरी राम आले लढाईला ॥
रामापरीस लक्ष्मण सराईत ।
रावणाचे लढाईत मारला इंद्रजीत ॥
मारला इंद्रजीत मागे पुढे टाका बाज ।
बोलली मंदोदरी गेला कुंकाचा साज ॥
शाम कर्णाचं बाशिंग अंकुश पाह्यतो वाचून ।
घेईन म्हणतो मातेचं ऊसनं ॥
बाणावरी बाप बाणाचं आंथरुण
रामबोले रथातून तुमचे गुरु कोण?
बाणावरी बाण, बाण चालले चढाया चढाया ।
बाप लेकाच्या लढाया लढाया ।
बाणावरी बाण, बाण चालती झपझप ।
नाही वळखले लहू अकुंसानं बाप ।
लहू अंकुश सीतेचे कैवारी ।
जोडले बाण रामचंद्र पित्यावरी ॥
बाणावरी बाण, बाण मारला दुमता ।
लहू बाळानं धरणी पाडला चुलता ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP