मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - इनाई गाणे

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


घडं घालूया काई ह्या घडा नावं काई?
ह्या घडाचं नाव कारागिर गोसाई ।
कारागीर उठले सुतारवाडया गेले ।
अरे तू सुतारदादा मव्हा सजन होशील ।
मह्या इनईले भरीव कांडया देशील ।
घडं घालूया घडाई ह्या घडा नाव काई?
ह्या घडाचं नाव कारागीर गोसाई ।
अरे तू लव्हारदादा मव्हा सजन होशील ।
मह्या इनाइचे मातीले भरीव कुदळ देशील ।
घडं घालूया घडाई ह्या घडाचं नाव काई?
ह्या घडाचं नाव कारागीर गोसाई ।
कारागीर उठले पारध्याच्या वाडया ।
अरे पारधीदादा मव्हा सजन होशील ।
मह्या इनाईचे घडाले भरीव सिंघटं (शिंग) देशील ।
हाना हाना कुदळी । खंदा खंदा माती ।
आना आना घागरी । चिंबा चिंबा माती ।
आधी घडवा इनाई । मग घडवा शंकरदेव पती ।
मंग घडवा दलाई बांदल । मंग घडवा मुकन्या हत्ती ।
मंग घडवा इधाटया (सासरा) ।
मह्या लाडाचे इनामाई तुले देवू व कोणापरी?
बामनापरी मी लाजीन । महारा घरी मी साजीन ।
महार मपले भाऊ चंदन टिळे लेतील ।
महारनी मह्या भावजया हळद कुंकू देतील
महे लाडाचे इनाई तुले देवू व कोणाघरी?
कुणब्याघरी मी लाजीन । महारा घरी साजीन ।
कुणब्याच्या घरी मी लाजीन । महारा घरी मी साजीन
इनाई पाव्हणी नेसली सोनं साडी ।
चालून आली ह्यो महाराचा वाडा ।
महारानं देखली बसाया टाकला चंदनपाटं ।
बसा बाई बसा । काय बसू दादा आमच्या रुखवती कुंकू नाही ।
आंजनगावची पेठ । बाजार भरे कुंकाचा ।
इनाई पाव्हणी नेसली सोनं साडी ।
महारानं देखली बसाया टाकला चंदनपाटं ।
बसा बाई बसा । काय बसू दादा आमच्या रुखवती हळद नाही ।
लोणार गावची पेठ । बाजार भरे हळदीचा ।
माहेरी जाईन इनाईचे वानी ।
दिडा-दिसाची पाव्हणी ।
सांग सांग इनाबाई सासर घरच्या गोठी ।
काय सांगू माय वं इतल्या मध्यम राती ।
पाणी भरता भरता झोपी जात व्हते ।
सांग सांग इनाबाई सासरघरच्या गोठी ।
काय सांगू माय वं इतल्या मध्यम राती ।
साळी कांडता कांडता झोपी जात व्हते ।
सांग सांग इनामाय सासरघरच्या गोठी ।
काय सांगू माय वं इतल्या मध्यम राती ।
दळण दळण व्हते । दळता दळता झोपी जात व्हते ।
आवळी सावळी दिवाळी । मायची लाडकी इनाई ।
आजचा दिवस राहाय वं । दुध पिवून जाय वं ।
कशी राहू माय वं । संगती शंकर हाय वं ।
आवळी सावळी दिवाळी । मायची लाडकी इनाई ।
आजचा दिवस राहाय वं । सरी लेवून जाय वं ।
कशी लेवू माय वं । संग शंकर हाय वं ।
शंकर हाय संगती । मजला सोडून जाती ।
आवळी सावळी दिवाळी । माय वं लाडकी इनाई ।
आजचा दिवस राहाय वं । जेवून तरी जाय वं ।
कशी जेवू माय वं । शंकर संगती मजला सोडून जाती ।
गरम तव्यावर उभं करतील वं । पैशाचे चटले देतील वं ।
बाप पडे पाया माय पडे पाया । कधी येशील गौराई ।
काळया वं रानाचे हिरवं रान व्हतील ।
कोरडया नदीले पूर जातील । तव्हा व्हईल येनं मपल्या बापू ।
आडवी लागली गंगा । धूरीवर देजो पाय वं ।
झटकन निघून जाय वं गौराई ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP