मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
गाधिजा पुसे श्रीरामा अहिल...

मानसगीत सरोवर - गाधिजा पुसे श्रीरामा अहिल...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गाधिजा पुसे श्रीरामा अहिल्याकाहणी ॥

कापते शिला का अवनी ॥धृ०॥

मार्गात नवल देखिले अकल्पित नयनी ॥

पाषाणामधुनी तरुणी ॥

मुनिराज दिव्य अंगना येतसे कुठुनी ॥

का शाप दिला इज म्हणुनी ॥

हा कबरिबार मस्तकी वल्कले कसुनी ॥

वनदेवी का मृगनयनी ॥

जशि चंद्रकला वाढते तशी ही सगुणी ॥

इज संनिध नाही कोणी ॥चाल॥

चतुराई खर्चुनी सारी हो ॥

केली कमाल विधिने भारी ॥

बनविता अमोलिक नारी ॥

निर्वैर सर्व श्वापदे विचरती भुवनी ॥

द्विज गुंजारवती मधुनी ॥गाधिजा०॥१॥

वदे राजऋषी रघुविरा सांगतो गोष्टी ॥

प्रसवला हिला परमेष्ठी ॥

इज ऐशी न मिळे दुसरि शोधिता सृष्टी ॥

इज बघता न पुरे दृष्टी ॥

तिज समान योग्य वर न मिळे होय मनि कष्टि ॥

करि खेद बहू परमेष्ठी ॥चाल॥

पण दुर्धर केला विधिने हो ॥

पृथ्विला प्रदक्षिण करुनी हो ॥

दोन यामामधि परतुनी हो ॥

ये प्रथम तया देईन सगुण गुणखाणी ॥

मम सत्य सत्य ही वाणी ॥गाधिजा० ॥२॥

स्त्रष्ट्याचे प्रतिज्ञा वाक्य सुरांना पटले ते शृंगारांनी नटले ॥

सजवुनी वाहने आपुली त्वरित ते उठले ॥

लंबोदर पळतचि सुटले ॥

मी जाईन सर्वांपुढे कुणी वटवटले ॥

कुणि पळता पळता हटले ॥चाल॥

त्यापुढे अमरपति गेला हो ॥

मनि भावित विधिकन्येला हो ॥

हा बेत तयाचा फसला हो ॥

त्या वेळि गौतमे धेनू द्विमुखी बघुनी ॥

तिज प्रदक्षणात्रय करुनी ॥गाधिजा०॥३॥

खुण कळलि विधात्या शीघ्र आणुनिया ऋषिला ॥

हा वृत्तांत त्याने पुशिला ॥

कळताचि अर्पुनी अपुली कन्या सुशिला ॥

मग समारंभ बहु केला ॥ वधुवरा बघुनिया इंद्र समूळचि फसला ॥

मनि खेद करित तो बसला ॥चाल॥

विपरीत गोष्ट कशि घडली हो ॥

ही सुंदर कन्या असली हो ॥

ह्या जरठा विधिने दिधली हो ॥

त्या दिवसापासुनि इंद्र द्वेष मनि धरुनी ॥

म्हणे भोगिन कपट मि करुनी ॥गाधिजा०॥४॥

तो धरुनि दुराशा इंद्र अहिल्या सदनी ॥

पातला कपट वेषांनी ॥

म्हणे प्राणप्रिये पीडिले मला मदनांनी ॥

आलिंगन दे सुखशयनी ॥

विपरित वाक्य हे काय सूर्य राहूनी ॥

ग्रासिला पहा नभि नयनी ॥चाल॥

नायके धरुर्नि दृढ सतिला हो ॥

करि तृप्त भोगुनी रतिला तो ॥

हे वृत्त अहिल्यापतिला हो ॥

कळताचि शीघ्र पातला स्नान सारोनी ॥

अतिरुषा हाक मारोनी ॥गाधिजा०॥५॥

विधिसुते उघडि तू द्वार कोण तुज संगे ॥

बोलतो शीघ्र मज सांगे ॥

रवि त्यजुनि राहु चालला गृहाप्रति ॥

कोण सदनि श्वान शिरलागे ॥

घाबरुनि अहिल्या वसन सावरित वेगे ॥

तू कोण होय सर मागे ॥चाल॥

स्वर्गिचा अमरपति आलो मी ॥

तुजसाठि कष्टि बहू झालो मी ॥

अधरामृत प्राशुन धालो मी ॥

रति झालि तुझी की पूर्ण जाय येथूनी ॥

उठे क्रुद्ध सती तेथूनी ॥गाधिजा०॥६॥

घाबरुनि अहिल्या द्वार उघडि त्या वेळा ॥

तो इंद्र पळुनिया गेला ॥

मुनि जाता जाता त्वरे शापि सुरपाला ॥

पडतील भगे तव तनुला ॥

अवलोकि दीन होउनी पतीमुखकमला ॥

तइ काळरूप तिशि दिसला ॥चाल॥

पापिणी जड शिळा होई तू ॥

एकटी वनी या राही तू मम शापा भोगी लवलाही तू ॥

थरथरा कापते नार लागे पतिचरणी ॥

मज नेणत घडली करणी ॥गाधिजा०॥७॥

नाकळत भोगिला इंद्र स्वामि म्या शयना ॥

पतिरूप दिसे मम नयना ॥

तुम्हि महाराज सामर्थ्यवान मम करुणा ॥

येउ द्या धरी दृढ चरणा ॥

रति झाली तुझी की पूर्ण वदसि तू वदना ॥

नच शाप देशि शचिरमणा ॥चाल॥

साठ सहस्त्र वर्षे नारी तू ॥

जड शिळेमधे संचारी ॥

युग त्रेत राम-अवतारी तू ॥

उद्धार करिल तो तुझा राम रजचरणी ॥

वदे गौत करुणा वचनी ॥गाधिजा०॥८॥

ती नार अहिल्या शिळेतून अलि रामा ॥

करि पावन मेघश्यामा ॥

तव चरणरजाचा असे अगोचर महिमा ॥

काय देउ तयासी उपमा ॥

कर जोडुन ही प्रार्थिते जपे तव नामा ॥

उद्धरुनी पाठवि धामा ॥चाल॥

तुज कथिलि कहाणी रघुनाथारे ॥

चल मिथिला नगरी आता रे ॥

हो वरुनी विजयी सीतारे ॥

निशिदिनी लागे मज ध्यास रघूविरचरणी ॥

करि कृष्णा विनती नमुनी ॥गाधिजा०॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP