मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७१६१ ते ७१६९

लळतें - ७१६१ ते ७१६९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७१६१॥
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥२॥
निराकारी ओस दिशा । येथ इच्छा पुरवसे ॥३॥
तुका ह्मणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥४॥

॥७१६२॥
न कळे माव मुनी मागे एकी अंतुरी । साठी संवत्सर जन्म तया उदरीं ॥१॥
कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक हरि सकळ वो ॥२॥
हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रुपा सत्ताभामेच्या ॥३॥
द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ऋषि फळवनीं देंठी लावितां ठायीं ॥४॥
अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥५॥
भावभक्ती सत्वगुण झाला दुर्जना । तुका ह्मणे सकळां छंदें खेळे आपणा ॥६॥

॥७१६३॥
उदारा कृपाळा अगा देवाच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिलें संसारा पाणी ॥२॥
अवघीं आवरुनी तुझे लाविली पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥३॥
तुका ह्मणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मां आह्मांसी तुटी ॥४॥

॥७१६४॥
झाली होती काया । बहु मळिन देवराया ॥१॥
तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥२॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥३॥
तुका म्हणे देह पायीं । ठेऊनि झालों उतराई ॥४॥

॥७१६५॥
आनी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदुरे ॥१॥
विठोबाची वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाहूं टाळी रंजवूं गोविंदा ॥२॥
सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भय आमचा कैवारी बळी ॥३॥
तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक ॥४॥

॥७१६६॥
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारी । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारी ॥१॥
हेंचि साधन रे तुज सर्व सिद्धीचें । नाम उच्चारी पां गोपाळाचें वाचे ॥२॥
उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाग्नितापन ॥३॥
फुकाचें सुखाचें कांहीं न वेचे भांडार । कोटी यज्ञांपरिस तुका म्हणे हें सार ॥४॥

॥७१६७॥
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती ॥१॥
तेंचि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥२॥
बैसोनी हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥३॥
तुका ह्मणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवक्रम ॥४॥

॥७१६८॥
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥
न करीं रें तैसें आपआपणा । नित्य राम राम तुम्ही सकळ म्हणा ॥२॥
राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमाहातीं जाचविती चौर्‍याशी ॥३॥
मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥४॥

॥७१६९॥
थडियेसी निघतां पाषाणाच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥
न करी रे तैसें आपआपणिया । पतंग जाय वांयां जीवें ज्योति घालुनियां ॥२॥
सावधपणें सोमल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥३॥
तुका म्हणे करीं ठायींचाचि विचार । जंव नाहीं पातला यमाचा किंकर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP