मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६९८० ते ७००५

लळित अभंग - ६९८० ते ७००५

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६९८०॥
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥
झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥२॥
रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥३॥
तुका ह्मणे आला । चवी रसाळहा काला ॥४॥

॥६९८१॥
तुह्मी तरी सांगा कांहीं । आह्मांविशीं रखुमाबाई ॥१॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवूनी देई ॥२॥
टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥३॥
प्रेम देउनि बहुडा झाला । तुका ह्मणे विठ्ठल बोला ॥४॥

॥६९८२॥
वाट पाहें बाहे निढळीं ठेवूनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलें चित्त ॥१॥
कई येता देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥२॥
डावा डोळा लवें उजवी स्फुरते बाहे । मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥३॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणिक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥४॥
तुका ह्मणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥५॥

॥६९८३॥
तुझें दास्य करुं आणिकां मागों खावया । धिग झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आतां ह्मणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोरांच्या दैवें ॥२॥
संसाराचा धाक निरंतर आह्मांसी । मरण भलें परि काय अवकळा ऐसी ॥३॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हे कां नेणसी ॥४॥

॥६९८४॥
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥२॥
घेतलें नुतरी । उचलूनी कडियेवरी ॥३॥
तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥४॥

॥६९८५॥
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥
नको जाऊं देऊ भंगा । गात्रें माझी पांडुरंगा ॥२॥
आयुष्य करी उणें । परि मज आवडो कीर्तन ॥३॥
तुका ह्मणे हाणीं । या वेगळी मना नाणीं ॥४॥

॥६९८६॥
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥२॥
नाना उपचारी । सिद्धि वोळगती कामारी ॥३॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥४॥

॥६९८७॥
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥
कोटि चंद्रलीळा ॥ पूर्णिमेच्या पूर्ण कळा ॥३॥
दोन्ही बाही संत सभा । सिंहासनीं राजा उभा ॥४॥
नारद तुंबर गाती । प्रेम आल्हादें गर्जती ॥५॥
तुका ह्मणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥६॥

॥६९८८॥
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥
परि तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥२॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥३॥
अपराधाचा केलों । तुका ह्मणे किती बोलों ॥४॥

॥६९८९॥
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥२॥
एकाच्या कैवाडें । बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥२॥
एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥३॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥४॥

॥६९९०॥
जीवेंसाटीं यत्न भाव । त्याची नाव बळकट ॥१॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाही भवनदी ॥२॥
विश्वासाची धन्य जाती । तेथे वस्ती देवाची ॥३॥
तुका ह्मणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥४॥

॥६९९१॥
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥
कल्याण तें असें क्षेम । वाढें प्रेम आगळें ॥२॥
भक्तिभाग्य गांटीं धन । त्या नमन जीवासी ॥३॥
तुका ह्मणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥४॥

॥६९९२॥
तया साठीं वेचूं वाणी । आइको कानीं वारसा ॥१॥
क्षेम माझे हरीजन । समाधान पुसतां त्यां ॥२॥
परत्रीचें जे सांगाती । त्याची याती न विचारीं ॥३॥
तुका ह्मणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवी तीं ॥४॥

॥६९९३॥
अभय उत्तर संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें ॥१॥
आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥२॥
आलें जे उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभीं असों ॥३॥
तुका ह्मणे करी पूजन वैखरी । बोबडा उअतरीं गातों गीत ॥४॥

॥६९९४॥
असो मंत्रहिन क्रिया । नका चर्या विचारुं ॥१॥
सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥२॥
विचारुनी ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥३॥
आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥४॥

॥६९९५॥
झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेऊनी ॥२॥
अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारुं मुळा ॥३॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं बाळा विडिया विनोदा ॥
तुका विनंति करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥५॥

॥६९९६॥
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥
जोडोनियां कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥
तुका ह्मणे काय पढियतें तें मागा । आपुलालें सांग सुख दु:ख ॥४॥

॥६९९७॥
करुनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसे वाटतें पायीं । साहोनी संकोच ठाव थोडासा देई ॥२॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥३॥
तुका ह्मणे तुझीं वेडीं वाकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोंडीं ॥४॥

॥६९९८॥
घडिया घालूनी तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥२॥
पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं न बोलावें ॥३॥
तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥४॥

॥६९९९॥
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥
न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥२॥
करुनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥३॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥४॥
करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥५॥
तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती चित्तीं ॥६॥

॥७०००॥
द्या जी आह्मां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥
टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥२॥
येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आह्मी दातारा ॥३॥
प्रेम देऊनियां बहूदा आतां दिला । तुका ह्मणे आतां विठ्ठल बोला ॥४॥

॥७००१॥
बहुडविले जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥२॥
घेऊनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसी चरणा स्वामीचियां ॥३॥
तुका ह्मणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥४॥

॥७००२॥
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥
तुह्मां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरुनी जिवें जाईन लोण ॥२॥
एकाएकीं बहू करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥३॥
तुका ह्मणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एक वेळे ॥४॥

॥७००३॥
सिणलेती सेवकां देउनी इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥
अहो दीनानाथा आनंदसुरती । तुह्मांसी शोभती ब्रीदें ऐसीं ॥२॥
बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥३॥
तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥४॥

॥७००४॥
पावला प्रसाद आतां उठोनी जावें । आपला तो श्रम कळों येतसें जीवें ॥१॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥२॥
तुह्मांसी जागवूं आह्मी आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष वाराया पीडा ॥३॥
तुका ह्मणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आह्मां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥४॥

॥७००५॥
उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळामाजी देव ॥१॥
निउल झालें सेवका स्वामीचें । आज्ञें करुनी चित्त समाधान ॥२॥
पहुडलिया हरी अनंतशयनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥३॥
अवघी बाहेर घालूनी गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP