मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६२९२ ते ६३१०

चमत्कार - ६२९२ ते ६३१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


लोहगावीं कीर्तनात मेलें मूल जीत झालें ते समयीं
स्वामींनीं अभंग केले ते.
============

॥६२९२॥
अशक्य तों तुह्मा नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामींचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥
थोर भाग्य आह्मी समर्थाचे कासे । ह्मणवितों दास काय थोडें ॥३॥
तुका ह्मणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थ्याचे ॥४॥

॥६२९३॥
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्याच्यानें ॥२॥
यावें तया काकुलती । जे दाविती सुपंथ ॥३॥
तुका ह्मणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥४॥
===============

चिंचवडचे देवांनीं तुकोबांस जेवावयास नेलें असतां त्यांस चमत्कार दाखविला ते अभंग.
============================================================

॥६२९४॥
वांजा गाई दुभती । देवा ऐशी तुझी ख्याति ॥१॥
ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥२॥
चातक पाखरुं । त्यासी वर्षे मेघ धारु ॥३॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास ॥४॥
तुका म्हणे देवा । कां ग खोचलासी जीवा ॥५॥

॥६२९५॥
आवडीचा हेवा सांगतों मी देवा । दोन्ही पात्रें ठेवा आम्हापासीं ॥१॥
तुह्मापाशी तैसीं ठेवावीं निरुती । सारुनी आइती भोजनाची ॥२॥
रागा आले देव म्हणती हा वेडा । तुका ह्मणे पुढां कळईल ॥३॥

॥६२९६॥
भोजन सारिलें आर्त न समाये । एकत्वचि होय भिन्न लीला ॥१॥
सगुणाची पूजा विधान सारिलें । घेतला तांबूल पडिभरें ॥२॥
देवभक्त स्तुती करिती अपार । तेणें होय भार शरीरासी ॥३॥
जोडुनियां कर ठेवियला माथा । तुका ह्मणे आतां क्षमा करा ॥४॥

॥६२९७॥
परतें मी आहे सहजचि दुरी । वेगळें भिकारी नामरुपा ॥१॥
नलगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भाका ॥२॥
पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आर्थ तेंचि देवें केलें ऐसें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥४॥

॥६२९८॥
चिंतामणि देवा गणपतीशी आणा । करावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥
देव म्हणती तुक्या एवढी कैंची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥२॥
वाडवेळ झाला शिळें झालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥३॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥४॥

॥६२९९॥
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥
भर्ता आणि भोक्ता कर्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥२॥
विश्वंभर कृपादृष्टि सांभाळितो । प्रार्थना करितो ब्राम्हणाची ॥३॥
कवळोकवळीं नाम घ्यावें गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका ह्मणे ॥४॥

॥६३००॥
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥
तुका ह्मणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥
=============

चिंचवडच्या देवास आपल्या स्वरुपाचा बोध व्हावा ह्मणून उपदेश केला.
================================================

॥६३०१॥
अणुरेणीयां थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥
गिळून सांडिलें कलिवर । भवभ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रीपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां । उरलों उपकारा पुरता ॥४॥
==============

अनघड सिद्धाच्या शब्दें करुन रामेश्वर भटाच्या शरीरीं दाह झाला तो या अभंगें शमला.
===========================================================

॥६२०२॥
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत आघात तें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२॥
दु:ख तें देईल सर्व सुखफळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥३॥
आवडेल जीवां जीवाचियें परी । सकळां अंतरीं एक भाव ॥४॥
तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणिजे ते येणें अनुभवें ॥५॥
===============
शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले त्यांस परत पाठवून राजास व अष्टप्रधानांस पाठविलेले अभंग.
=====================

॥६३०३॥
दिवटया छत्री घोडे । हें तों बर्‍यांत न पडे ॥१॥
आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥२॥
मान दंभ चेष्टा । हें तो शूकराची विष्ठा ॥३॥
तुका ह्मणे देवा । माझे सोडवणे धांवा ॥४॥

॥६३०४॥
नावडे जें चित्ता । तेंचि होसी पुरविता ॥१॥
कां रे पुरविसी पाठी माझी केली जीवें साटी ॥२॥
न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥३॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥४॥
जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥५॥
तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥६॥

॥६३०५॥
विरंचीनें केलेम ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ति ॥१॥
युक्तीचा बाळक ब्रह्मनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ति मनीं विश्वासेंसी ॥२॥
ऐसा तुझा प्रेमा कळे कांहीं एक । पाहूनियां लेख पत्रिकींचे ॥३॥
शिव तुझें नाम ठेविलें पवित्र । छत्रपति सूत्र विश्वाचें कीं ॥४॥
व्रत नेम तप ध्यानयोग कळा । करुनी मोकळा झालासी तूं ॥५॥
हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजि गोष्टी हेचि थोर ॥६॥
याचें हें उत्तर ऐक गा भूपति । लिहिली विनंति हेताचि हे ॥७॥
अरण्यवासी आह्मी फिरों उदासीन । दर्शनही हीन अमंगळ ॥८॥
वस्त्राविण काया झालीसे मळीन । अन्नरहित हीन फळाहारी ॥९॥
रोकडे हातपाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥१०॥
तुका ह्मणे माझी विनंति सलगीची । वार्ता हे भेटीची करुं नका ॥११॥

॥६३०६॥
ऐसी माझी वाणी दीनरुप पाहे । हे त्या करुणा आहे हृदयस्थाची ॥१॥
नहों कीविलवाणें नाहीं आह्मी दीन । सर्वदा शरण पांडुरंगीं ॥२॥
पांडुरंग आह्मा पाळिता पोसिता । आणिकांची कथा काय तेथें ॥३॥
तुझी भेट घेणे काय हें मागणें । आशेचे हें शून्य केलें आह्मी ॥४॥
निराशेचा गांव दिधला आह्मासी । प्रवृत्ति भागासी सांडियेलें ॥५॥
पतिव्रतेचें हें मन पति भेटो । तैसे आह्मी विठोमाजी नांदो ॥६॥
विश्व हें विठ्ठल नाहीं दुज कांहीं । देखणें तुझेंही तयामाजी ॥७॥
तुजही विठ्ठल ऐसेंचि वाटलें । परि एक आलें आडवें हें ॥८॥
सद्गुरुश्रीरामदासाचें भूषण । तेथें घालीं मन चळों नको ॥९॥
बहुतां ठायीं वृत्ति चाळले जेव्हां । रामदास्य तेव्हां घडे कैसें ॥१०॥
तुका म्हणे बापा चातुर्यसागरा । भक्तिभाव तारा भाविकांसी ॥११॥

॥६३०७॥
तुह्मांपाशीं आह्मी येऊनियां काय । वृथा सीण आहे चालण्याचा ॥१॥
मागावें हें अन्न तरी भिक्षा थोर । वस्त्रासी हे थोर चिंध्या बिदी ॥२॥
निद्रेसी आसन उत्तम पाषाण । वरी आवरण आकाशाचें ॥३॥
तेथें काय करणें कवणाची आस । वांयां होय नाश आयुष्याचा ॥४॥
राजगृहा यावें मनाचिये आसे । तेथें काय वसे समाधान ॥५॥
रायाचिये घरीं भाग्यवंता मान । इतरां सामान्यां मान नाहीं ॥६॥
देखोनियां वस्त्रें भूषणांचें जन । तात्काळ मरण येतें मज ॥७॥
ऐकोनियां मानाल उदासता जरी । तरी आह्मां हरी उपेक्षीना ॥८॥
आतां हेचि तुह्मा सांगणें कौतुक । भिक्षेऐसें सुख नाहीं ॥९॥
तपव्रतयाग महाभले जन । आशाबद्धहीन वर्तताती ॥१०॥
तुका ह्मणे तुझी श्रीमंत मानाचे । पूर्वीच दैवाचे हरिभक्त ॥११॥

॥६३०८॥
आतां एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानूं नये ॥१॥
जेणें योगें तुह्मां घडों पाहे दोष । ऐसा हा सायास करुं नये ॥२॥
निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ति चित्तीं आणूं नका ॥३॥
परिक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनियां ॥४॥
सांगणें न लगे सर्वज्ञ तूं राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावें ॥५॥
हेंचि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शनें चाड नाहीं ॥६॥
घेऊनियां भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ॥७॥
एकदोनी कर्मे जाणोनियां वर्मे । आपुलिया भ्रमें राहूं आतां ॥८॥
कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूतीं देख एक आत्मा ॥९॥
आत्मारामीं मन ठेवूनियां राहे । रामदासीं पाहें आपणेयां ॥१०॥
तुका म्ह्मणे राया धन्य जन्म क्षिती । त्रैलोकीं हे ख्याति कीर्ति तुझी ॥११॥

॥६३०९॥
राया छत्रपती ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगीं ॥१॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥२॥
मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागीं ॥३॥
रामनाम मंत्र तारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥४॥
उफराटें नाम जपतां वाल्मीक । झाला पुण्यश्लोक तात्कालीक ॥५॥
तेचि बीज मंत्र वसिष्टउपदेश । याहूनि विशेष काय आहे ॥६॥
आतां धरुं नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपाकरी ॥७॥
धरुं नको आशा आमुची कृपाळा । रामदासीं डोळां लावी आतां ॥८॥
तुझी चाड आम्हां नाहीं छत्रपति । आह्मी पत्रपति त्रैलोक्याचे ॥९॥
चारी दिशा आम्हां भिक्षेचा आधार । नेमिली भाकर भक्षावया ॥१०॥
पांडुरंगीं झाली आमुची हे भेटी । हातांत नरोटी दिली देवें ॥११॥
आतां पडूं नको आमुचीये काजा । पवित्र तूं राजा रामभक्त ॥१२॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हां वधीं हरी उपेक्षिना ॥१३॥
शरण असावें रामदासा लागीं । नमन साष्टांगीं घाली त्यासी ॥१४॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरु शरण राहे बापा ॥१५॥

॥६३१०॥
आतां हे विनवणी प्रधानअष्टक । प्रभूसी विवेक समजावा ॥१॥
प्रतिनिधी माननरक्षक चतुर । सात्विकाचें घर तुह्मापाशीं ॥२॥
मजुमुचे धणी लेखनकारक । पत्रींचा विवेक समजावा ॥३॥
पेशवे सुरनिस चिटणीस डबीर । राजाज्ञा सुमंत सेनापति ॥४॥
भूषण पंडितराय विद्याधन । वैद्यराजा नमन माझें असे ॥५॥
पत्राचा हा अर्थ अंतरीं जाणोनी । विवंचोनि श्रवणीं घाला तया ॥६॥
सात्विक प्रेमळ दृष्टांताच्या मतें । बोलिलों बहुत कळावया ॥७॥
यथास्थित निरोप सांगणें हा राया । अर्थ पाहा वांयां जाऊं नेदी ॥८॥
भिडेसाठीं बोला गाळूनी अर्थातें । अनर्थकारी तुमतें होईल तेणें ॥९॥
तुका ह्मणे तुह्मां नमन अधिकार्‍यां सांगणें तें राया पत्र माझें ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP