मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ६३५४ ते ६३९५ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ अभंग - ६३५४ ते ६३९५ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत तुकारामबावांनीं वारकर्यां बरोबर पंढरीनाथास पत्र पाठविलें ते अभंग. Translation - भाषांतर ॥६३५४॥कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरीनाथ बोलावितो ॥१॥मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥२॥निरांजलें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळें ॥३॥तुका ह्मणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥४॥॥६३५५॥कां कोणी न ह्मणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटें ॥१॥तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व सीण जन्मांतर ॥२॥तुका ह्मणे माझी होईल माउली । वोरसून घाली प्रेमपान्हा ॥३॥॥६३५६॥कां माझा विसर पडिला मायबापा । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥कैसा कंठुनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥२॥नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥३॥तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥४॥॥६३५७॥कांहीं माझे कळों आले गुणदोष । म्हणऊनि उदास धरिलें ऐसें ॥१॥नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥२॥कळावें तें मना आपुलिया सवें । ठायीचें हें घ्यावें विचारुनि ॥३॥तुका म्हणे मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्त्तव्यें बुद्धीचिया ॥४॥॥६३५८॥जायाचें शरीर जाईल क्षणांत । कां हा गोपीनाथ पावेचि ना ॥१॥तुम्ही संत सारे कृपेचे सागर । माझा निरोप फार सांगा देवा ॥२॥अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्याला । पायांपे विठ्ठला ठेवी मज ॥३॥तुका म्हणे जाणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करील माझें ॥४॥॥६३५९॥नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥२॥नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥३॥तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥॥६३६०॥आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥१॥काय करुं आतां न गमेसें झालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥२॥घर लागे पाठी चित्ता उभे वार । आपुलें तें झुरे पाहावया ॥३॥तुका म्हणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥४॥॥६३६१॥विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥२॥जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥३॥जैसे तैसे माझे बोल अंगिकारीं । बोबडया उत्तरीं गौरवितों ॥४॥तुका म्हणे विटेवरि जीं पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥५॥॥६३६२॥देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्मे महादोष ॥२॥सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । ऋद्धि सिद्धि ठायीं मुक्ति चारी ॥३॥इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥४॥तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥५॥॥६३६३॥काय झालें नेणों माझिया कपाळा । न देखिजे डोळां मूळ येतां ॥१॥बहु दिस पाहें वचनाची वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥२॥नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठुर न पाहिजे ॥३॥पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरुरसा ॥४॥तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥५॥॥६३६४॥एवढा संकोच तरि कां व्यालासी । आम्ही कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुम्हीं देवा ॥२॥कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जिवलग ॥३॥कोण जाणे माझे जीवींचे सांकडें । उगवील कोडें संकटाचें ॥४॥तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥५॥॥६३६५॥देई डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्निशीं नाम घेतां थोडें ॥२॥फार थोडें कांहीं करुनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥३॥आहे माझी ते चि सारीन शिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥४॥तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥५॥॥६३६६॥सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रुप उरी नुरे ॥१॥इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान ॥२॥माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥३॥आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटें आपणासी ॥४॥तुका ह्मणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥५॥॥६३६७॥धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥२॥प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥३॥जातें तळा येतों मागुताला वरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥४॥तुका ह्मणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥५॥॥६३६८॥कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पापा यांचें ॥१॥पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥२॥कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पावती ॥३॥कां या इंद्रियांचि न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥४॥तुका ह्मणे कई जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥५॥॥६३६९॥काय पोरें झाली फार । किंवा न साहे करकर ॥१॥ह्मणऊनि केली सांडी । घांस घेऊं न व्हां तोंडीं ॥२॥करुं कलागती । तुज भांडणें भोंवतीं ॥३॥तुका ह्मणे टांचें । घरीं झालें सेवरोचे ॥४॥॥६३७०॥कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥तरी हा पडिला विसर । माझा तुह्मां झाला भार ॥२॥आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां माठीं ॥३॥तुका ह्मणे घरीं । बहु बैसले रिणकरी ॥४॥॥६३७१॥निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥परि हे नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥२॥सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥३॥न लगे निरोपासी मोल । तुका ह्मणे वेचे बोल ॥४॥॥६३७२॥जोडिच्या हव्यासें । लागे धनाचें चि पिसें ॥१॥मग आणिक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥२॥पाहे रुक्याकदे । मग अवघें ओस पडे ॥३॥तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥४॥॥६३७३॥मविलें मविती । नेणों राशी पडिल्या किती ॥१॥परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥२॥अवघ्या अवघा काळ वाटा पाहाती सकळ ॥३॥तुका म्हने नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥४॥॥६३७४॥न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥ऐसे झाले बहुत दिस । झालीं युगें अठ्ठाविस ॥२॥नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥३॥तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥४॥॥६३७५॥जोडी कोणासाठीं । एवढीं करितोसी आटी ॥१॥जरी हें आम्हां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥२॥करुनि जतन । कोण देसील हें धन ॥३॥आमचे तळमळे । तुझें होईल वाटोळें ॥४॥घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥५॥तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥६॥॥६३७६॥करुनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥२॥येथें न करीं काम । मुखें नेघें तुझें नाम ॥३॥तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥४॥॥६३७७॥समर्थाचे पोटीं । आम्हीं जन्मलों करंटीं ॥१॥ऐसी झाली जगीं कीर्ति । तुझ्या मानाचे फजिती ॥२॥येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥३॥तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥४॥॥६३७८॥पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥मज सांगोनियां धाडीं । वाट पाहातों बराडी ॥२॥कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥३॥तुका म्हणे चिंत्ता । बहु वाटतसे आतां ॥४॥॥६३७९॥कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर ॥१॥जें या मनासी आवरुं । आंत पोटीं वाव धरुं ॥२॥कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥३॥तुका ह्मणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥४॥॥६३८०॥समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥आता भावें करुनि साचा । पायां पडलों विठोबाच्या ॥२॥न कळे उचित । करुं समाधान चित्त ॥३॥तुका ह्मणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥४॥॥६३८१॥येती वारकरी । वाट पहातों तोंवरी ॥१॥घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥२॥पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें॥३॥तुका ह्मणे येती । जाइन सामोरा पुढती ॥४॥॥६३८२॥रुळे महाद्वारीं । पायां खालील पायरी ॥१॥तैसें माझें दंडवत । निरोप सांगतील संत ॥२॥पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥३॥तुका ह्मणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ ॥४॥॥६३८३॥माहेरासी जैसा धाडीना सुनेला । मनीं जावयाला आवांकी ते ॥१॥माझा हेत असे जावें पंढरीसी । परीया ज्वरासी काय करुं ॥२॥सासू ती सासरा चांडाळ माहेरा । धाडीना दातारा काय करुं ॥३॥तुका ह्मणे विठो गरुड आहे द्वारीं । न्या मज पंढरी कृपावंता ॥४॥॥६३८४॥तुह्मीं संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥२॥भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥३॥न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥४॥॥६३८५॥होईल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटी ॥२॥रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥३॥तुका ह्मणे ताप । हरती देखोनियां बाप ॥४॥॥६३८६॥परिसोनि उत्तर । जाव देईजे सत्वर ॥१॥जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥२॥नाणीं कांहीं मना । करुनि पापाचा उगाणा ॥३॥तुका ह्मणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥४॥॥६३८७॥ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥२॥बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥३॥तुका ह्मणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥४॥॥६३८८॥किती करुं शोक । पुढें वाढे दु:खे दु:ख ॥१॥आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥२॥पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥३॥तुका ह्मणे बळ । माझी राहिली तळमळ ॥४॥॥६३८९॥करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥२॥घरीं लागे कळह । नाहीं जात तो शीतळ ॥३॥तुका ह्मणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥४॥॥६३९०॥आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसीं माझीं बाळें ॥२॥दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥३॥नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥४॥॥६३९१॥आतां हे सेवटीं । माझी आईकावी गोष्टी ॥१॥आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥२॥आतां करकर । पुढें न करीं उत्तर ॥३॥तुका ह्मणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥४॥॥६३९२॥बोलिलों तें आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥२॥स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥३॥तुका ह्मणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥४॥॥६३९३॥माझें जडभारी पंढरीचे पारीं । लज्जा नानापरी निवारावी ॥१॥लिहिल्या पत्रका धाडूं कोणा हातीं । सांगावी विनंती माझी कोणी ॥२॥घोडि याचेखुरें उधळिली माती । यावें रातोराती नारयणा ॥३॥तुका विष्णुदास संतांचें पोसणें । वाग्पुष्प तेणें पाठविलें ॥४॥॥६३९४॥पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवे नको दीन गांजों देऊं ॥२॥ग्रासिलें भुजंगे सर्पे महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥३॥कामक्रोध सुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥४॥मृगजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥५॥तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥६॥॥६३९५॥कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सगा काकुलती ॥२॥अनाथ अपराधी पतिता आगळा । परि पायां वेगळा नका करुं ॥३॥तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षिना ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP