मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७१४७

येकाखडी अभंग - ७१४७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७१४७॥
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥
स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनियां भाव ॥२॥
खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥३॥
गजर नामाचा । करा लवलाहें वाचा ॥४॥
घरटी चक्रफेरा । जन्ममृत्यूचा भोंवरा ॥५॥
नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥६॥
चरणीं ठेवा चित्त । ह्मणवा देवाचे अंकित ॥७॥
छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥८॥
जगाचा जनिता । भुक्तिमुक्तीचाही दाता ॥९॥
झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥१०॥
यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥११॥
टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥१२॥
ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१३॥
डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१४॥
ढळों नये जरी । लाभ घरींचिया घरीं ॥१५॥
नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१६॥
तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१७॥
थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१८॥
दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१९॥
धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥२०॥
नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२१॥
परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२२॥
फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२३॥
बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२४॥
भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२५॥
माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२६॥
यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२७॥
रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२८॥
लकार लाविला । असतांनसतांचि उगला ॥२९॥
वासनेची धाडी । बंद खोडया नाडया बेडी ॥३०॥
सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३१॥
खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३२॥
सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३३॥
हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३४॥
अळंकार लेणें । ल्यारे तुळसीमुद्राभूषणें ॥३५॥
ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP