मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६९५१ ते ६९५४

गोंधळ अभंग - ६९५१ ते ६९५४

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६९५१॥
राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिंबीं बिंबोनि ठेली । माझी परब्रह्म वेल्हाळा वो ॥
कोटि रविशशि माझी । परब्रह्म वेल्हाळा वो ॥१॥
राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो ॥ त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोई वो ॥२॥
सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो ॥ कंठी तुळसी माळा । उभी भीवरेच्या तिरीं वो ॥
दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥३॥
निर्गुण निराकार ॥ वेदां न कळेचि आकार वो ॥ शेषादिक श्रमले । श्रुती न कळे तुझा पार वो ॥
उभारोनी बाहे ॥ भक्तां देत अभयकर वो ॥४॥
येऊनी पंढरपूरा । अवतरली सारंगधरा वो ॥ देखोनी भक्ति भाव । वोरसली अमृतधारा वो ॥
देऊनी प्रेम पान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥५॥

॥६९५२॥
सुदिन सुवेळ । तुझा मांडिला गोंधळ वो ॥ पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥
पंढरपुरनिवासे । तुझे रंगीं नाचत असें वो ॥ नवस पुरवीं माझा । मनींची जाणोनियां इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो ॥ चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरीवो ॥३॥
बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो ॥ उद्गारें गर्जती । कंठीं तुळसीचीं भूषणें वो ॥४॥
स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो ॥ ओवाळिली माता । विठाबाई पंचभूतीं वो ॥५॥
तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो ॥ तुका ह्मणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥६॥

॥६९५३॥
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें ॥ ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवऊनि खावें ॥
रे विठ्ठल ॥१॥
टिळे माळा करंडी सोंग । धरुनी चाळविलें जग ॥ पसरी हात नाहीं त्यास । दावी दगड पूजी भग ॥ रे विठ्ठल ॥२॥
राख लावुनी अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ॥ वासने हातीं बांधवी नळी । त्यासी येऊनी गिळी ॥ रे विठ्ठल ॥३॥
कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ॥ करवी पीडा भोगवी दु:ख । पडे नरकीं परि न पळे चि मूर्ख ॥
रे विठ्ठल ॥४॥
सिकला फाक मारी हाका । रांडापोरें मेळवी लोकां ॥ विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघेंचि फुका ॥ रे विठ्ठल ॥५॥
कळावें जनां मी एक बळी । उभा राहुनी मांडी फळी ॥ फोडोनी गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनी आपणचि तळमळे ॥ रे विठ्ठल ॥६॥
फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनी सोंग बोडक्या डोया ॥ शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विडंबिली काया ॥
रे विठ्ठल ॥७॥
धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका ॥ आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाचि महिमा फजिती फुका ॥ रे विठ्ठल ॥८॥
बहुत दु:खी झालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें ॥ पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें ॥
रे विठ्ठल ॥९॥
काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका ॥ चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका ॥ रे विठ्ठल ॥१०॥

॥६९५४॥
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें ह्मणऊन ॥१॥
मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसी ॥२॥
सांगतें गुण जीवींची खूण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥३॥
बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥४॥
आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भाव करी साह्य चहुं अठरांच्या बळें ॥५॥
करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥६॥
कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥७॥
तुका ह्मणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP