अध्याय १४ वा - श्लोक ३३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एषां तुं भाग्यमहिमाच्युत तावदास्तामेकादशैव हि वयं तव भूरिभागाः ।
एतद्धृषीकचषकैरसकृत्पिबामः शर्वादर्योऽघ्र्युदजमध्वमृतासवं ते ॥३३॥
 
ब्रह्मा म्हणे जी अच्युता । व्रजौकसांची भाग्यमहिमा । कोणही वर्णूं न शकेचि पुरता । हें असो आतां वक्तृत्व ॥३३॥
परंतु महासभाग्यपण । आम्हां अकरांचें म्हणे द्रुहिण । तेचि अकरा कोण कोण । विचक्षण परिसोत ॥३४॥
तरी अंतकरण आणि चित्त । यांचा अधिष्ठाता तूं अच्युत । त्या तवांघ्रिपद्मामोदामृत । आम्हां प्राप्त अकरांसी ॥७३५॥
मनःस्वामी राकापति । ब्रह्मा मी तो धिषणापति । अहंतास्वामी तो पशुपति । तीन्ही मूर्ति कर्तृत्वीं ॥३६॥
दशधा चेष्टा जो कां पवन । तो एथ चौथा त्वगभिमान । दिग्देवता श्रवणाभिमान । हें पांचवें जाण दैवत ॥३७॥
चक्षुःस्वामी तो दिनकर । जिव्हास्वामी पाशधर । घ्राणपति ते अश्विनीकुमार । ऐसे सुरवर अष्ट हे ॥३८॥
आणि वाग्देवता कृशान । पाणिदेवता संक्रंदन । निरृति तो गुह्याभिमान । अकरा जाण हे अवघे ॥३९॥
आपुला अंश प्रजापति । तो दुसरेनि न गणी देवतापंक्ति । उपेंद्र श्रीप्रभूची मूर्ति । त्या न करी व्यक्ति पृथक्त्वें ॥७४०॥
कर्तृकरणांमाजील त्रय । पंचक चेष्टादि ज्ञानेंद्रिय । कर्मकरणां माजी तृतीय । एवं गणना होय अकरांची ॥४१॥
सभाग्य आम्ही हे एकादश । जे तवांघ्रिपद्मामोद सुरस । बोधें मादक स्वादें पीयूष । सेवूं अशेष गोचषकीं ॥४२॥
प्रत्यक्ष साकार डोळ्यांपुढें । व्रजौकसांसि तव रूपडें । फावे तेथ आम्हाही घडे । यथाविभागें सुखलाभ ॥४३॥
तव सान्निध्यें परमानंदु । तेणें सुखावे कुमुदबंधु । तव संपादे माजे बोधु । तेणें अगाध मज सुख ॥४४॥
तवाभिमानाचा उद्देश । तेणें सुखावें श्रीमहेश । लीलाकीर्तिश्रवणें तोष । दिग्देवता पावती ॥७४५॥
तुझेनि स्पर्शें तोष पवना । दर्शनोत्साह चंडकिरणा । तव रसपानें होय वरुणा । आनंदाचा सुखलाभ ॥४६॥
तव सौगंध्यें नासत्यांसी । मिळणें घडे विश्रांतीसी । तव भाषणें हृषीकेशी । पावेंकासी आल्हादु ॥४७॥
शक्र सुखावें तव हस्तकें । निरृति कर्में क्षरणात्मकें । प्रेम दाटे हर्षोत्कर्षें । एकादशें करणें पैं ॥४८॥
अंतःकरण चित्तोपेंद्र । तो तूं चाळक आनंदप्रचुर । प्रजापति तो मन्मथागार । मी साचार तव जठरीं ॥४९॥
इंद्रियरूप इंद्रियद्वारा । म्हणसी फावें मी सुरवरां । तरी व्रजौकसांचे विस्तारा । अगाध महिमा किमर्थ ॥७५०॥
तरी आम्ही एकैक करणद्वारां । तूंतें सेवूं पीतांबरा । त्या या गोपी तुज समग्रा । सुखनिर्भरा सेविती ॥५१॥
मशका पीयूषलेशचवी । लागतां रंगे सुखानुभवीं । त्या तुज अमृतोदा अथावीं । वीचिवैभवीं क्रीडती ॥५२॥
याचा भाग्यमहिमा आतां । कोणा वदवे जी अच्युता । यास्तव वांछा माझ्या चित्ता । उपजे अनंता तें ऐका ॥५३॥
पूर्वीच प्रार्थिलें म्यां स्पष्ट । योनि पावोनि कनिष्ठ । त्वन्निष्ठांचा होईन इष्ट । हें भाग्य वरिष्ठ मज ओपीं ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP