अध्याय १४ वा - श्लोक १४ ते १६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नारायणस्त्वं न हि सर्वदेहिनामात्माऽ‍स्यधीशाऽखिललोकसाक्षी ।
नारायणोंऽगं नरभृजलायनात्तच्चापि सत्यं न तवैव माया ॥१४॥

कैसा नारायण मी, म्हणसी । तरी ऐकें स्वामी हृषीकेशी । सर्वगत तूं आत्मा होसी । कैसा न होसी नारायण ॥२३॥
नार म्हणिजे जीवसमूह । अयन म्हणिजे त्या आश्रय । तो तूं जगदात्मा यदूद्वह । विगतमोह विश्वदृक् ॥२४॥
नारायण मी नव्हें म्हणसी । तरी तूं ऐकें एतद्विशीं । तुजविण प्रवृत्ति इंद्रियांसी । कोठें कैसी केधवां ॥३२५॥
जीवसमूहा प्रवर्तक । नारायण तो नव्हेसि मुख्य । कां कुव्याख्येचा विवेक । तूं निष्टंक जगदात्मा ॥२६॥
अधीश म्हणिजे प्रवर्तक । दोन्ही मिळूनि कैसे एक । ऐसें म्हणसी तो विवेक । ऐक सम्यक परमात्मा ॥२७॥
नारं अयसे हें व्याख्यान । जीवसमूह मायिक जाण । त्यातें जाणसी म्हणोन । प्रवर्तन तूं कर्ता ॥२८॥
तस्मात् अखिललोकसाक्षी । लोकां कृपेच्या कटाक्षीं । इक्षूनि प्रवृत्तिनिवृत्तिपक्षीं । उभय लक्षीं रक्षिता ॥२९॥
नारायणपदव्युत्पत्ति । म्हणाल न घडे ऐशे रीति । तरी ज्या प्राचीन कवींच्या युक्ति । त्या प्रस्तुतीं अवधारा ॥३३०॥
नरापासूनि उत्पन्न होये । तो नारा म्हणूनि नाम लाहे । तरी चतुर्विंशतितत्त्वसमूहें । युक्त देह नारायण ॥३१॥

“ नराज्जातानि तत्त्वानि नाराणीति विदुर्बुधाः । तस्य तान्ययनं पूर्वं तेन नारायणः स्मृतः ॥१॥ ”

कीं नरापासूनि तत्त्वमेळ । तोचि ज्याचें वसतिस्थळ । म्हणोनि नारायण केवळ । कवि प्रांजळ बोलती ॥३२॥

“ आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसूनवः । अयनं तस्य ताः पूर्वं तेन नारायणः स्मृतः ॥२॥ ”

नरापासूनि झालिया आपा । त्या तयाच्या संततिरूपा । त्या नारा म्हणतां अर्थ सोपा । कळे स्तनपादिकांसी ॥३३॥
पूर्वीं नारा अयन ज्याचें । तो तूं नारायण बा हें साचें । व्याख्यान प्राचीन कवींचें । श्रुतिस्मृत्यर्थसंमत ॥३४॥
जरी तूं म्हणसी जनार्दना । मज निर्गुण अपरिच्छिन्ना । करिसी जलाह्रयत्वकथना । तरी हे रचना मायिक ॥३३५॥
तेचि माया म्हणसी कैशी । आपुले पूर्वप्रतीतीसी । निवेदितसें चरणापाशीं । हृषीकेशी तें ऐका ॥३६॥

तच्चेज्जलस्थं तव सज्जनगद्वपुः किं मे न दृष्टं भगवंस्तदैव ।
किं वा सुदृष्टं हृदि मे तदैव किं नो सपद्येव पुनर्व्यदर्शि ॥१५॥

अचिंत्य ऐश्वर्य गुणसंपन्ना । श्रीभगवंता नारायणा । म्हणसी रूपा जलायतना । साच कां ना मानिसी ॥३७॥
तरी जें वपु जगदाश्रय । तें म्यां नाहीं देखिलें काय । ऐकें तयाचा प्रत्यय । वदता होय विरिंचि ॥३८॥
तैं मी तेचि प्रळयजळीं । जन्मूनि तुझिये नाभिकमळीं । देऊनि शताब्द बुडकुळी । नाभिनाळीं रिघालों ॥३९॥
नाभिनाळाचा लावूनी पथ । शताब्द धांडोळितां तेथ । नाहीं देखिलें जलस्थ । केंवि यथार्थ मानावें ॥३४०॥
हॄदयीं चिंतितां तेंचि पुढती । कीं नाहीं देखिलें जगत्पति । नाहींच म्हणोनि देतां झडती । तेही अघडती होतसे ॥४१॥
तुवां उपदेशितां तपोनिष्ठें । तपाचरणें परम कष्टें । सुष्ठु दृश्यत्वें प्रतिष्ठे । तैं नास्ति न घटे स्वरूपाची ॥४२॥
एवं अस्ति नास्ति मायामय । तूं अगोचर अज अव्यय । हाचि करूनि दृढनिश्चय । तुझे पाय वंदिले ॥४३॥
देशकाळपरिच्छेदा - । तीत अद्वया गोविंदा । मायानाट्य घेऊनि मुग्धां । बोधूनि वरदा तूं देशी ॥४४॥
प्रत्यक्ष येथेंचि मुकुंदा । मायालाघवें यशोदा । बोधूनि माझियाही दुर्मदा । छेदूनि वरदा वोपिसी ॥३४५॥
हें तीं श्लोकीं निरूपण । ब्रह्मा करील आपण । तेथ होऊनि सावधान । श्रोतीं श्रवण करावें ॥४६॥

अत्रैव मायाधमनावतारे ह्यस्य प्रपंचस्य बहिः स्फुटस्य ।
कृत्स्नस्य चांतर्जठरे जनन्या मायात्वमेव प्रकटीकृतं ते ॥१६॥

तरी ऐकें गा मायाशमना । तेचि अवतारीं मधुसूदना । बाह्य प्रकट फावसी करणा । धरूनि सगुणा या रूपा ॥४७॥
यास्तव प्रपंचाचे जठरीं । यशोदेप्रति त्वां श्रीहरि । माया दाविली विश्वाकारीं । काय ते खरी कीं लटकी ॥४८॥
जरी तूं म्हणसी शुद्धमुकुरीं । बिंबिजे बाहीरूनि चराचरीं । तैसें विश्व मज माझारीं । देखे नारी नंदाची ॥४९॥
त्यासि मायामय कां म्हणिजे । ऐसें मानित अधोक्षजें । तेथ विधीनें बोलिलें जें जें । बरवे वोजें तें ऐका ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP