मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
आपला मार्ग

आपला मार्ग

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- आता नाही आपल्याच्याने पुढे येववत... हुश्श !
- चल बाबा, चल असे नको करूस.
- आपले तर हे हातपाय अगदी मोडून गेले आहेत बुवा ! नको आता.
- चल ऊठ रे ! एकदा निघालो आहोत खरे...
- कुठे चल कुठे ! जो जो पुढे जावे तो तो जास्तच खाचा खळगे आणि काटेकुटे !
-  मग आता काय करायचे ?
- चल आपले परत जाऊ झाले.
- परत जाऊन काय करणार ?
- असे का म्हणतोस ? परत जाता जाता, एखादा चांगला रुळलेला, सपाटीचा मार्ग सापडेल, त्याने आपले सुखाने पुढे जाऊ झाले.
- नको बीवा तो आता परत फिरणे... आणि पुनः सोसलेल्याच अडचणी पुनः सोसायच्या, म्हणजे किती लाजिरवाणे आहे ! त्यापेक्षा पुढे जाणे, नवीन अडचणी सोसणे, हे किती माणुसकीचे आहे !
- मला नाही वाटत आपण कधी महाराष्ट वाड्मयसेवेच्या शिखराला जाऊन पोहोचू असे. ते किति दूर आणि उंच आहे.
- हे असे रडून चालायचे नाही. जन्माला आलो आहोत, तर महाराष्ट्राचा - मराठीचा महिमा जगात वाढवायला पाहिजे !
- ते खरे. पण मार्गात किती अडचणी आहेत. मी म्हणतो शिखर तर राहिलेच, पण पायथ्यापर्यंत तरी जाऊन पोहचू की नाही कुणाला ठाऊक ?
- उठ आधी चालायला लाग. आता मागे पुढे पाहू नकोस.
- बरे दुसरे असे. आपण इतकेही करून पायथ्याशी गेलो, आणि श्रमांनी व्याकुळ होऊन अगदी मरणोन्मुख झालो तर एकीकडे प्रत्यक्ष दिसणारे ते उच्च शिखर, आणि दुसरीकडे ते मिळत नाही म्हणून जीवाची होणारी सारखी तडफड... !
- काही हरकत नाही ! पायथ्याशी मरू येवढेच ना ? पण मरता मरता दृष्टीत तर शिखर राहील !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP