मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|

अगत्य

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- अहो केशवराव.
- अरे ते आता घरात नाहीत.
- गप रे ! तुला नाही त्यातले समजत.... केशवराव..... काय
घरात नाहीत ? बरे मी आलो होतो म्हणून सांगा.... ठीक
आहे, चला आता.
- हं: विचित्र आहेस ! त्यांनी कालच नव्हते सांगितले की,
’ मी उद्या या वेळेला घरी नसेन म्हणून ? ’
- आता काय सांगावे ! नाही आपल्याला समजत तर गप्प
बसावे.
- अरे पण त्यांनी आपल्याला काल सांगितले होते ना !
- हो; मला ते सगळे ठाऊक आहे.
- मग हाक कशाला मारलीस ?
- अरे भाई, हा व्यवहार आहे.
- म्हणजे ? मी नाही समजलो.
- माणूस घरात नाही हे ठाऊक असून मुद्दाम त्याला हाक
मारली, तर त्यात आपले नुकसान तर काही नाही उलट
झाल तर थोडा काय फायदाच -
- तो कसा बोवा ?
- अरे माणूस वजनदार आहे. तेव्हा आपले, संधान असावे,
सहज घरावरुन जाता जाता हाक मारली, तर तितकेच
अगत्य दाखविल्यासारखे होते.....
- आणि तो जर म्हणाला की, मी सांगितले असून तुम्ही
कशाला उगीच हाक मारलीत .... ?
- तर आपला ’ विसरलो बोवा ’ म्हणून मंत्र आहेच. आणि
नाही तरी तो कुठे मला आता भेटायला पाहिजे होता !
- शाबास ! म्हणजे माणूस घरात नाही हे माहीत असून....
- शिवाय तो भेटू नये अशी इच्छा असून मुद्दाम त्याला हाक
मारणे, याला म्हणतात सहजासहजी व्यवहार आणि
अगत्य ! आले लक्षात ?
- ये:

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP