मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
ताजमहाल

प्रकाशित कविता - ताजमहाल

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति प्रणयप्रभा]

जें स्वप्न आजवर मनिं तरळे
त्याहून रम्य हें आज कळे. ध्रु०

यमुना काळी, काळें अम्बर,
वातावरणहि होऊ धूसर,
तटीं शान्त हें पाण्डुर सुन्दर
जगत्किल्मिषें हें न मळे. १

अस्पष्टच हें तिमिरामधुनी
दिसे दिसे ज्यापरी सुरधुनी,
घ्येयवादिजननयनापुढुनी
भविष्य मोहक जें न ढळे. २

ढगाआडचा पूर्ण चन्द्रमा
न दिसे फाके परि तत्सुषमा,
पतिव्रतेची प्रीति निरुपमा
स्मृतीमधे जैशी अजळे. ३

प्रेमाशेचें प्रभातवैभव
पवित्रतेचें निधान अभिनव,
काळ - सागरीं बुडे, विरे तंव
फेसमिषे वर की असळे. ४

कालिदास कवितेंतुनि विलसे
अजविलाप तो मधु करुणरसें
वास्तुरूप घे अमर का असें
अदात्त सुन्दर गूढ बळें. ५

प्रेमाश्रु तुझा वा जगदीश्वर
पडतां पडतां थिजला सत्वर.
विभवहिमाचल झाला भूवर
- का मरणोत्तर हें सगळें ? ६

सुधांशु आता नभीं अनावृत
कुमुद यशाचें तुझिया प्रसृत
करी वरुनि अभिषेकुनि अमृत
मरणाचें मरणत्व गळे. ७

हें का लोकोत्तर जनमानस
का मृत्युञ्जय मूर्त शान्तरस,
प्रेम अनिर्वचनीय अलालस
काळ पळे पण जें न पळे ! ८

दिसे दिशीं ही सुमनोवेधक,
काय बरें हें ? हाय काळनख !
शाश्वति पुण्यस्मृतीसहि न मग
शल्य हेंच ह्रदयांत सले. ९

१८ मे १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP