मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
परिशिष्ट ६ वे

संकेत कोश - परिशिष्ट ६ वे

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


विविध संकेत

१ . उपनिषदें वेदान्तसूत्रें आणि भगवद्नीता या प्रस्थान त्रयीवर भाष्यें लिहिल्याखेरीज आचार्य पदवी प्राप्त होत नसे .

२ . तत्त्वज्ञान आणि विनोद यांचें साहचर्य असत नाहीं ,

३ . धंदेवाईकानें आपल्या व्यवसायबंधूचें काम विनामूल्य करावें असा संकेत आहे .

४ . मालमत्तेचें वाटप करणें झाल्यास वडिलानें समान वाटे करावयाचे , पण धाकटयानें प्रथम स्वीकारावयाचा व राहिलेला मोठयानें घ्यावयाचा .

५ . भूगर्भातील ज्या पदार्थांचें विशिष्ट गुरुत्व जास्त आहे . जे धनवर्धिष्णु अपारदर्शक व एक प्रकाराची चकाकी देतात त्या पदार्थांना धातु म्हणावें असा संकेत आहे . ( सराफ - परिचय ).

६ . भूमिगत धनाचें महासर्प संरक्षण करीत असतात .

७ . षट्‌कर्णीं झालेली गोष्ट सहसा गुप्त राहात नाहीं . " षट्‌‍कणों मिद्यते मंत्रः । "

८ . पवित्र स्त्रियांनीं तळतळाटानें दिलेले शाप सहसा वाया जात नाहींत " पतिव्रतानां नाकस्मात्पतन्त्यश्रूणि भूतले " ( वा . रा . युद्ध . सर्ग . ११ - ६७ . )

९ . गांवाला जातांना किंवा कोणाचा निरोप घेतांना ’ जातो ’ म्हणूं नये ; येतों म्हणावें .

१० . गांवास निघाल्यावेळी वा कामासाठीं बाहेर जात असतां कोठें जातां असें विचारूं नये .

११ . वयमानाबरोबर मनुष्याच्या आवडीनिवडी तसेंच विचारांतही बदल होतो .

१२ . काव्य आणि व्यवहार यांचा नेहमीअच छत्तीसाचा आंकडा असतो .

१३ . आपणहून दिलेल्या दुधास नाहीं म्हणावयाचें नसतें .

१४ . चांगल्या कामांत विघ्नें फार " श्रेयांसि बहु विघ्नानि "

१५ . संकटें कधीं एकेकटीं येत नसतात .

१६ . मित्राच्या घरीं राजमार्गानें जावें आणि शत्रूच्या घरी ( जाणें असेल तर ) आड मार्गानें जावें . ( म . भा . सभा . २१ - ५६ . )

१७ . गांवाला गेल्यास घरीं नववे दिवशीं परतूं नये .

१८ . लंडनमध्यें हाईड पार्कमध्यें वाटेल त्यानें वाटेल तें मनःपूत बोलावे व श्रोत्यांनींही मोकळेपणानें प्रश्न विचारावेत असा संकेत आहे .

१९ . ’ न्यायसंस्या ’ ही दंडविधानाच्या सोयीसाठीं मानवानें निर्माण केलेला एक संकेत .

२० . कुटुंबसंस्था व त्यामधील निर्बंध हे मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठीं अस्तिवांत आलेले संकेत होत . ( प्रसाद मे १९६१ )

२१ वैद्यानें स्वतःचे आजारीपणांत स्वतःचें औषध घ्यावयाचें नसतें कारण बुद्धीचा गोंधळ उडतो .

२२ . लांच हवेप्रमाणें सर्वगामी आहे . एवढेंच नव्हे तर ती चिरंजीवहि आहे . ( अलौकिक अभियोग )

२३ . " अतिशिष्टत्वं चौर्यलक्षणाम् ‌ "

२४ कोणाचेंही बरें दिसलें कीं त्याला कांहींतरी खरे खोटें जोड चिकटविण्यांत जगाला समाधान वाटतें .

२५ . कन्येला पुत्र झाल्याखेरीज तिचे घरी म्हणजे जांवयाचे घरीं भोजनास जावयाचें नसतें .

२६ . देव व पिशाच्चें यांना सावल्या नसतात . ( ऋतुचक्र )

२७ . श्री आणि सरस्वती यांच्यामध्यें बहुधा छत्तीसाचा आंकडा असतो .

२८ . कलहावांचून प्रेमाला गोडी नाहीं .

२९ . सामान्य माणसांचीं मतें बहुधा परिस्थितीच बनवीत असते .

३० . विशाल कल्पना या उगमरहितच शोभतात आणि उगमहित असूं शकतात .

३१ . संकल्प आणि सिद्धि यांच्यांत बहुधा छतीसाच्या आंकडयाचा आढळ होतो .

३२ . जीवनदर्शन युगसंकेतानुसार असलें पाहिजे .

३३ . चराचर सृष्टींतील देवत्वाचें संशोधन व संवर्धन करणें हा भारताभूमीचा संकेत आहे . ( केसरी २७ सष्टेंबर १९५९ )

३४ . इंग्लंडमध्यें कोणतीहि गोष्ट असो ती फुकट कोणी देणारहि नाहीं आणि कोणी फुकट घेणारहि नाहीं असा संकेत पाळतात .

३५ . प्रतिपदेच्या चंद्राला वस्त्राची दशी अर्पण केली कीं आयुष्य वाढतें असा समज आहे .

३६ देवलोकींच्या अप्सरा या अमर , अजर तशाच अनपत्यहि असतात . ( स्वैरविचार )

३७ . देवाचे नेत्र मिटत नाहींत कारण त्यांना ज्ञानचक्षु असतात .

३८ . भुतें बहिरीं असतात .

३९ . कावळा दारांत ओरडला म्हणजे पाहुणा येतो असें म्हणतात .

४० . एकदां चिमटा रोंवला कीं मग एक दिवस रात्र तेथून हलायचें नाहीं असा वैरागी ( नागा ) लोकांत संकेत आहे . ( आम्ही भगीरथाचे पुत्र )

४१ . भूमिगत द्रव्य पायाळू लोकानांच दिसतें . पाताळींचें निधान । दावील पैं अंजन । परि व्हावें लोचन पायाळूचे ( ज्ञा . अ . १५ )

४२ . वालगुंजांच्या बियांना पांखरें टोकरीत नाहींत .

४३ . विषारी बचावाच्या साधानाशिवाय मूल पाडणारें सौंदर्य चिरंजीव होऊंच नये असा निसर्गाचा संकेत आहे . ( ऋतुचक्र )

४४ . कार्तिकेयाच्या दर्शानास स्त्रियांनीं जावयाचें नसतें .

४५ . अप्सरांचे चरण भूमीला लागत नाहींत .

४६ . मृगाचे किडे आषाढांत दिसले कीं पृथ्वी ऋतुस्नाता झाली असें समजतात .

४७ . प्रयाणकालीं , स्वगृहीं प्रवेश करतांना व विवाहार्थ गमन करतांना उजवा पाय पुढें टाकून जावें .

४८ . भोजनाचे वेळी पदार्थांचे स्वादाविषयीं चिकित्सा करूं नये , ’ पूजयेदशनं नित्यम् ‌ .’

४९ . दिवसा बिब्याच्या झाडाची छाया आणि रात्रीं पिंपळाची छाया दुष्ट असते . " दिवा विभीतकच्छाया रात्रौ बोधिद्रुमस्य च " ( सु . )

५० . वडवानळ नांवाचा समुद्रांत असलेला अग्नि रोज समुद्राचे बारागांव पाणी पितो . ( जाळतो ) असा संकेत आहे . ( ज्ञानेश्चरी विवरण अ . १ )

५१ उर्दू भाषेंत गर्मवतीला " उमेदवार " म्हणण्याचा संकेत आहे . ( उर्दू काव्याचा परिचय )

५२ . " जीवो जीवस्य जीवनम् ‌ " हा जीवसृष्टीचा संकेत आहे .

५३ . अनुभूतीसाठी साहित्यिकांना विशाल निरीक्षण करण्याची अत्यधिक जरूर असते असा सर्वमान्य संकेत आहे .

५४ . सूत्र वाङ्मय म्हणजे अनुभूतींचे संकेत . ( माऊली )

५५ . एकादा मनुष्य आस्तिक व नास्तिक आहे या संबंधीचा त्याच्या त्याच्या जीवनांत होणारा आविष्कार त्याच्या त्याच्या पूर्वसंचिताचा निर्देश करीत असतो .

५६ . विवाह लवकर जमत नसल्यास रुक्मिणीस्वयंवर हा ग्रंथ विशेषतः त्यांतील रुक्मिणीनें श्रीकृष्णास लिहिलेली पत्रिका कुमारिकांनीं पठण करावी असा संकेत आहे .

५७ . अग्नि हा प्रसिद्ध पारदारिक स्त्रीजनांचा आद्यवल्लभ आहे असा संकेत आहे .

५८ . मनुष्य शपथेवर कांहीं सांगूं लागला म्हणजे तें खोटें आहे असें खुशाल समजावें ,

५९ . आकाशातूअन भ्रमण करणार्‍या बलाका पंक्तीचें दर्शन शुभ मानतात .

६० . दैव अनुकूल असलें म्हणजे जें अमंगल असतें तेंही मंगल होतें .

६१ . शब्द स्थिर असतात पण कालांतरानें अर्थ बदलतात .

६२ . सहस्त्र योजनांचा प्रवास देखील पहिल्या एकाच पावलानें सुरू होतो . ( चिनी तत्त्वज्ञ )

६३ . प्रियेच्या अथवा प्रियकाराच्या अप्राप्तीचेंच नव्हे तर हृदय काठिन्याचेंहि वर्णन करणें उर्दू - फारशी काव्याचा एक संकेत आहे .

६४ . मुग्धतेंत संमति असतें व नसतेंहि .

६५ . मुलीचे लग्नांत ज्येष्ठ जामाताचे पूजन म्हणजे त्याच्या बायकोच्या धाकट्या बहिणीवरचा अधिकार संपला याचें दर्शक असा संकेत . ( मराठी लोकांची संस्कृति )

६६ . चोरी कशाची केव्हां व कशी होईल याचा नियम नाहीं . हा अनादि संकेत आहे . ( केसरी २२ - ४ - ६३ )

६७ . तुळसीविवाहापूर्वी आंवळा खाऊं नये असा संकेत आहे . ( संस्कृतिकोश )

६८ . सत्यापेक्षा कल्पितच अधिक मनोरंजक असतें .

६९ . डाकोरला गेल्यावांचून द्वारकेची यात्रा सफाल होत नाहीं . ते आधी डाकूरास येऊन । घेऊनी श्रीकृष्णदर्शन । मगाअ पुढें गमन करिताती . ( भक्तविजय अ . ३१ )

७० . पुरुषोत्तम क्षेत्रांतील ( जगन्नाथपुरी ) संकर्षण . कृष्ण आणि सुमद्रा यांच्या मूतीं अनुक्रमें श्वेत , श्याम आणि पीत असाव्यात असा संकेत आहे . ( ब्रह्मपुराण )

७१ . साधूंनीं मंत्रशास्त्राचा अभ्यास करावयाचा नसतो .

७२ . पत्नीनें पतीस वा पतीनें पत्नीस नांवानें संबोधूं नये त्यामागें आयुष्य क्षीण होते असा संकेत आहे .

७३ . हत्ती हा इछामरणी आहे . पाळीव हत्तीकडून उत्पत्ति करविणें अशुभ मानलें आहे .

७४ . विद्याधर रक्ताला स्पर्श करीत नाहींत . ( लोकसाहित्याची रूपरेषा )

७५ . सोनें अग्नींतून उत्पन्न झालें म्हणून सोनें पवित्र मानलें जातें . म्हणून निद्नासमयीं सुवर्णालंकार घालून झोपूं नये असा संकेत आहे . ( केसरी २० - १ - ६३ )

७६ . झांकल्या मुठीचें मोल सव्वा लाख असतें .

७७ . मुलें जगता नसल्यास त्याचें पाळण्यातलें नांवानें हांक न मारतां धोंडू भिकू अशा टोपण नांवानेंच संबोधावें .

७८ . संक्रांतीचा तिळगूळ हा मोठयांनीं लहानांना द्यावयाचा तसें दसर्‍याचें सोनें हें तरुणांनीं वडीलधार्‍यांना द्यावयाचें असतें असा संकेत आहे . यांत पराक्रमाला आव्हान आहे .

७९ . थोर पुरुष हे परमेश्वरी संकेत साकार करणारे असतात .

८० . पुत्रसंतति होत नसल्यास हरिवंशाचे पठण करावें असा संकेत आहे .

८१ . सण म्हणजे जीवनांतील आनंदाचे प्रसंग . अशा प्रसंगीं माणसानें सर्व दुःखें विसरून आनंद , उत्साह यांत रममाण व्हावयाचें असतें ( श्रीज्ञानेश्वर वाङ्मय आणि कार्य )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP