मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संकीर्ण

संकेत कोश - संकीर्ण

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकशें बावन्न मूर्ख - समग्र यादी दासबोध दशक २ समास १ पाहा . यांत क्रमांक १ चा अधिकारी म्हणजे " जन्मला जयांचे उदरीं ।

तयाशीं जो बिरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक xx !" ( दासबोध २ - १

दोनशेंसहा अस्थि ( मानव शरिराच्या )- मस्तक , ८ , मुख १४ , कानाच्या अस्थि ६ , पाठीच्या कण्याच्या अस्थि २६ , उरोस्थि व फासळ्यांच्या अस्थि २५ , कंठिकास्थि १ , हातांच्या अस्थि ६४ व पायांच्या अस्थि ६२ एकूण दोनशेंसहा अस्थि मानव शरिरांत आहेत . सुश्रुतांत ही अस्थिसंख्या तीनशें मानिली आहे .

दोनशें सत्तर दिवसांनी मानव प्राणी जीवात्म्याशीं सख्य पावतो - मानवाच्या उप्तत्तीचा गर्भ , बीजारोपण झाल्यापासून बरोबर नऊ महिन्यांनीं म्हणजे दोनशें सत्तर दिवसांनीं आपला सजीव देह आणतो . ( अंक शास्त्र )

तीनशें शास्त्रें - शास्त्रांचें परिगणन प्राचीनांनीं तीनशें शास्त्रें व सत्तर महतन्त्रें असें केलें आहे .

शतानि त्रीणि शास्त्राणां महातन्त्राणि सप्ततिः ।

व्यास एव तु विद्यानां महादेवेन कीर्तिताः ॥ ( म . भा . शांति अ १२२ )

सातशें शिरा - मानव शरिरात एकून सातशें शिरा आहेत . ( अंक शास्त्र )

सातशें ब्याऐशी बोली ( भाषा ) भारतांतल्या - १५ घटनेनें मान्य केलेल्या , १ हिंदी , २ उर्दू , ३ हिंदुस्तानी , ४ पंजाबी , ५ तेलगु , ६ मराठी , ७ तामीळ , ८ बंगाली , ९ गुजराथी , १० कन्नड , ११ मल्याळम् ‌, १२ उरिया , १३ असामी , १४ काशिमरी व १५ संस्कृत .

२३ संताळी , गोंडी , भिल्ली , लंबाडी , वंजारी इत्यादि जमातींच्या भाषा . एक लाखाहून अधिक लोकांकडून बोलल्या जाणार्‍या .

२४ मारवाडी , मेवाडी , जयपुरी , सिंधी , राजस्थानी इत्यादि इतर पोटभाषा एक लाखाहून अधिक लोकांकड्‌न बोलल्या जाणार्‍या .

७२० अहिराणी , अवधी , बिहारी , मागधी , माहेश्वरी इत्यादि एक लाखाहून कमी लोकांकडून बोलल्या जाणार्‍या .

७८२ अशा एकूण ९८२ बोलीभाषा कमीअधिक प्रमाणांत भारतांत वापरांत आहेत . संपूर्ण यादी

( Census of India Paper No. I 1954 )

अठराशें जाति - भारतांत एकूण अठराशें जाति आहेत असें मानलें जातें . ( आपला महाराष्ट्र )

नऊशें स्नायु - मानव शरीरांत एकंदर नऊशें स्नायु म्हणजे दोर्‍यासारखीं बंधनें आहेत . ( सुश्रुत शारीर ५ - २९ )

दोनशें सहस्त्र दोनशें दोन योजनें सूर्यभ्रमण - सूर्यभ्रमण निमिषार्धांत दोन सहस्त्र दोनशे दोन योजनें होते .

" मना कल्पवेना जपाच्या त्वरेशी " ॥ ( सूर्य स्तुति )

एकवीस हजार सहाशें दैनिक श्वास - मानवी प्राण्यांचे श्वासोच्छ्‌वास अहोरात्रांतून २१६०० होतात असा संकेत आहे . म्हणजे दर मिनिटांस १५ श्वासोश्वास होतात . ( कल्याण योगांक )

साठ सहस्त्र बालखिल्य ऋषि - या सर्व ऋषींचे देह आंगठया एवढेंच उंच होते . हे सर्व ब्रह्माच्या शरीरापासून उत्पन्न झाले . ते सूर्याच्या रथाला वेष्टून असतात अशी कथा आहे . ( रघु , १५ - १० )

बहात्तर सहस्त्र नाडया - मानव शरीरांत नाभिस्थानाच्या जवळ मूळकंद आहे . तेथून बहात्तर सहस्त्र नाडया निघून सर्व देहांत व्यवस्थेनें पसरल्या आहेत . ( प्रश्नोपनिषद ‌‍ )

अठ्ठयाऐशी सहस्त्र ऋषि - गृहस्थाश्रमी ऋषी अठ्ठयाऐशी हजार वारंवार उत्पन्न होऊन प्रलयकालपर्यंत धर्मसंस्थापनार्थ या लोकांत वावरत असतात .

एवमावर्तमानास्ते वर्तन्त्याभूतसंप्लवम् ‌ ।

अष्टयशीति सहस्त्राणि ऋषीणां गृहमेधिनाम् ‌ ॥ ( मत्स्य )

एक लक्ष तीन हजार सहाशें ऐशी ह्रदयाचे ठोके - अहोरात्र मिळून मानवाच्या ह्रदयाचे ठोके पडतात , ( अंकशास्त्र )

नवलक्ष तारे - आकाशांत नवलक्ष तारे आहेत अशी गणना आहे .

चौर्‍यांशी लक्ष योनि - जलचर ९ लक्ष , पक्षी १० लक्ष , कीटक सृष्टि , ११ लक्ष , वनस्पति २० लक्ष , पशु ३० लक्ष व मानव ४ लक्ष अशी एकंदर चौर्‍यांशी लक्ष योनींची ( प्राणिजाति ) गणना प्राचीनांनीं केली आहे .

जलजा नवलक्षास्तु दशलक्षास्तु पक्षिणः ।

रुद्रलक्षास्तु कृम्याद्याः स्थावराणां च विंशतिः ॥

त्रिंशल्लक्षं गवादीनां चतुर्लक्षास्तु मानवाः ॥ ( योगरत्नाकर भाग १ ला )

साडेतीन कोटि केश - मानव शरीरावर साडेतीन कोटि केश असतात असें परिगणन धर्मशास्त्रांत मानलें आहे .

तिस्त्रः कोटयोऽर्धकोटी च यानि लोमानि मानवे ( धर्मसिंधु तृतीय परिच्छेद ).

चार कोटि छिद्रें मानवी शरीराचीं - मानव शरीराला चार कोटि छिद्रें आहेत . ( अनुमवामृत अमृतवाहिनी टीका )

सात कोटि महामंत्र - महामंत्र सात कोटि आहेत असें कपिल गीतेंत सांगितलें आहे . ’ सप्तकोटिर्महामन्त्रः ’ ( क . गी . ३ - ६३ ).

पन्नास कोटि योजनें भूमंडळाचें क्षेत्रफळ - भूमंडळाचें क्षेत्रफळ पन्नास कोटि योजनें आहे असें पुराणांत सांगितलें आहे .

" पंचाशत्कोटिविस्तारा सेयमूर्वी महामुने ( इति विष्णु पुराणे )

चाळीस अब्ज तारका - आकाशगंगा हें एक विश्वचक्र आहे . यांत सुमारे ४० अब्ज तारका आहेत असे ज्योतिषशास्त्रात मानलें आहे .( केसरी २४ जानेवारी १९५४ )

अठरा पद्में वानर - श्रीरामाच्या साह्यार्थ अठरा पद्में वानरसेना होती . ( रामायण )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP