मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
’आठ मार्चच कशाला आता प्र...

प्रज्ञा दया पवार - ’आठ मार्चच कशाला आता प्र...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


’आठ मार्चच कशाला
आता प्रत्येक दिवस
आमचा असतो’
असा करावा का शेवट
सदरहू कवितेचा ?
उदारीकरणाच्या या तिठ्यावरून
आणि अधूनमधून पेराव्यात ओळी
जालीम उपरोधाच्या
विद्रोही-बिद्रोही
लिहावेत तपशील हिंसेचे, भयाचे,
मारले जाण्याचे
जसे लिहीत आलो आम्ही
न जाणो कुठल्या तारखेपासून
डोमेस्टिक व्हायलन्स
ते वर्ल्ड कपसारखा
सार्वजनिक थरार बलात्काराचा !
तारखाच बदलल्या फ़क्त
किंचाळणार्‍या अंधारात
हात-पाय झाडणार्‍या
दिवसाउजेडात
वेदनेनं विव्हळणार्‍या.
या चिरव्याकुळ एकाकीपणच्या होर्डिंग्जवर
उभं राहून आम्ही पसरवतोय
आमच्या मोकळ्याढाकळ्या
हाडा-मांसाच्या प्रतिमा
प्रश्न हा नाहीये
की कुणी खाल्ली
मोहाची फ़ुलं पहिल्यांदा
सगळे भौतिक संदर्भ छाटून
त्या धूर्त लिओनार्दोनं करून टाकलं
आम्हाला गूढ वगैरे
सोपंच अस्तंय हे
एकतर मोनालिसात रूपांतरण करणं
नाहीतर बाजारपेठेच्या मुक्त वार्‍यावर
पाशवी रक्तानं भिजलेली
आमची अंतर्वस्त्रं
निर्ममपणे सुकायला टाकणं

आम्ही फ़ोडतोय
अजूनही तीच गुहा
तीक्ष्ण, धारदार हत्यारांनी
तू घुमव तुझा आवाज
शेवटच्या धापा टाकणार्‍या
या ग्लोकल रणधुमाळीत

राहिला मुद्दा आठ मार्चचा
जिवंत धडधडीचा
गुहा फ़ोडण्याचा
पुन्हा पुन्हा

N/A

References :
९८६९४८०१४१
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP