मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
दावणीला बांधलेल्या गुरांच...

प्रा. कविता म्हेत्रे - दावणीला बांधलेल्या गुरांच...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


दावणीला बांधलेल्या
गुरांच्या डोळ्यांतल्या अगतिकतेला
साद घालायला
धजावत नाहीत शब्द आता

फडफडत राहते डाव्या पापणीवरची
अपशकुनाची छाया
अन् गावभर दुष्काळ घुमत राहतो
अमावास्येच्या रात्री
गावावरून उतरून टाकल्यासारखा !

पारावरल्या थकलेल्या सावलीची म्हातारी थाप
कुढत राहते दुपारभर
गेलेल्या माणसाच्या वाटेनं
खंगलेले दिवस डोळे लावून बसलेले....
पण फुटत नाहीत कुठल्याच आभाळाला
पाण्याचे कोंब...
पडक्या देवळातल्या घंटेसारख्या
नि:शब्द विरलेल्या
देवभोळ्या जगण्याच्या खुण...

पडजमिनीत गुदमरलेल्या
कोवळ्या नवतीच्या बीजासारखं
जळून जातं काळीज...आणि त्यातलं ओलं काहीबाही

तळ गाठलेल्या विहिरीची हतबलता
व्यापून राहते उभ्या पिकाच्या भकास डोळ्यांत

फिटतील सार्‍या जन्माचे पांग या समजुतीला
पारखी झालेली जन्माची घरघर
फिरत राहते दुष्काळभर...
गुरं - लेकरं - घरदार सोडून
इथली माती कपाळाला लावून...
परागंदा होण्याच्या मार्गावर

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP