मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आपण घडवलेल्या दंगली आणि र...

नीरजा - आपण घडवलेल्या दंगली आणि र...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आपण घडवलेल्या दंगली आणि रक्तपाताचे संदर्भ
पुसून टाकायचे आहेत त्यांना कायमचे
जुन्या पुस्तकाच्या पानावरचे

लावायचा आहे स्फोटांना सुरुंग
आणि उखडून टाकायचे आहेत अवशेष
पानावर पसरून राहिलेल्या
भीषण शांततेचे

सर्वांगाला लागलेले रक्ताचे डाग
धुऊन गंगेच्या पाण्यात
मोकळे व्हायचे आहे करण्यासाठी गोष्टी पारदर्शकतेच्या

जादूई दुनियेत नेऊन भरभराटीच्या
ते पुसू पाहताहेत जुना अमंगळ इतिहास
त्यांच्या नावावरचा

किती सोपं असतं आपल्या हातानं मोडलेलं घर
पुन्हा उभारणं नव्यानं
त्याची रंगरंगोटी करून बुजवून टाकणं
भिंतीला पडलेली भलीमोठी खिंडारं

पण घराच्या पायात गच्च भरलेली प्रेतं
ओढू लागली घराचे पाय
आणि आली बाहेर जमिनीच्या
तर उसळेल एकच कल्लोळ

नव्या घराचं होऊन जाईल थंडगार शवागार
मग कितीही लावले दिवे तरी नाही उजळणार घराचा दिंडी दरवाजा
अवकळा आलेल्या घरात बसून लिहिताना इतिहास
कोणत्या रंगात रंगवणार तुमची लेखणी ?

उत्तरं सापडत नाहीत अशा प्रश्नांची
पाणी गढुळलं असेल आपणच आपल्या हातांनी तर...

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP